Ind vs NZ: शिवम दुबेला वारंवार का संधी दिली जातेय?

    • Author, आदेश कुमार गुप्त
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

वर्ष 2018. IPLच्या 12व्या सीझनच्या लिलावादरम्यान रॉयल चॅलेंजर्सने मुंबईच्या एका तरुण खेळाडूला पाच कोटी रुपयांना घेतलं.

खरंतर या खेळाडूची बेस प्राईझ होती 20 लाख रुपये. मध्यम गती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज असणाऱ्या शिवमने लिलावाच्या आदल्याच दिवशी बडोद्याविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारले होते.

या एका ओव्हरने शिवम चर्चेत आला. तेव्हा 25 वर्षांच्या या खेळाडूने लाँग-ऑन आणि मिडविकेटवरून चेंडू सीमेपार भिरकावला होता.

त्यानंतर दोन वर्षांनी आता पुन्हा शिवम दुबे एकाच ओव्हरमधल्या चौकार-षटकारांमुळे चर्चेत आहे. पण यावेळी त्याने हे शॉट्स टोलावले नाहीत तर त्याच्या बॉलिंगवर टोलेबाजी करण्यात आली.

माऊंट माँगनुईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात एकाच ओव्हरमध्ये त्याने 34 धावा दिल्या.

त्यानंतर भारतीय कॅप्टनने शुभमला दुसरी ओव्हर टाकायलाच दिली नाही. नंतर इतर गोलंदाजांच्या चांगल्या बॉलिंगच्या जोरावर भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.

न्यूझीलंडसमोर या सामन्यात जिंकण्यासाठी लक्ष्य होतं 164 धावांचं. हा सामना भारत हरला असता तर त्याचं सगळं खापर शिवम दुबेच्या डोक्यावर फुटलं असतं.

याच सामन्यात फलंदाजी करताना शिवमने फक्त 5 धावा केल्या. एकंदरीतच संपूर्ण सीरिजमध्ये शिवमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

पाच सामन्यांमध्ये त्याने 13, नाबाद 8, 3, 12 आणि 5 अशाच धावा केल्या. म्हणजे 5 इनिंग्समध्ये एकूण 41 रन्स. याशिवाय बॉलिंग करताना त्याने फक्त 2 विकेट्स घेतल्या.

त्याच्या या कामगिरीनंतर आता टीममधल्या त्याच्या अस्तित्त्वाविषयी चर्चा सुरू झालीय.

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना शिवम इतका का आवडतो?

पुन्हा पुन्हा संधी का?

शिवम दुबेला वेळेपूर्वीच संधी मिळाल्याचं क्रिकेट समीक्षक विजय लोकपल्ली म्हणतात.

ते सांगतात, "इतक्या मोठ्या पातळीवरील शिवम तयार नव्हता. तसंही टी-20 सारखं खेळाचं स्वरूप कोणत्याही खेळाडूसाठी एखाद्या दिवशी वाईट ठरू शकतं. शिवम दुबे भारताचं भविष्य असल्याचं कदाचित टीमच्या मॅनेजमेंटला वाटतंय. त्याने मुंबईसाठी चांगली खेळी केलेली आहे. निवडक करणाऱ्यांनी त्यात नक्कीच काही पाहिलं असेल, म्हणूनच त्याला संधी देण्यात यावी, असं त्यांना वाटतंय."

"अनेकदा खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये नसतात, किंवा फॉर्म असूनही चांगली गोलंदाजी करू शकत नाहीत, किंवा रन्स करू शकत नाहीत. शिवम दुबे अजूनही तरूण आहे पण त्याने थोडा संयम बाळगायला हवा."

"तो वाईट खेळाडू नाही. कर्णधार कोहलीही त्याचं कौतुक करतो. टी-20 मध्ये तो मोठे आणि उंच शॉट्स खेळू शकतो म्हणून शिवम दुबे उपयोग असल्याचं रोहित शर्मालाही वाटतं."

शिवाय हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमबाहेर असल्याचा फायदा शिवमला झाला. पण त्याची कामगिरी हार्दिक सारखी ऑलराऊंडर नाही.

शिवम दुबेने अपेक्षा पूर्ण केल्या नसल्याचं विजय लोकपल्लीही म्हणतात. ते सांगतात, "काही खेळाडू फारसं देशांतर्गत क्रिकेट न खेळता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येतात. सुरुवातीच्या सामन्यांत झळकले तर ठीक आहे नाहीतर त्यांना मोठ्या अपेक्षांचं ओझं पेलावं लागतं."

असं काय आहे शिवममध्ये?

उंच, मजबूत शरीरयष्टी आणि मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता हे शिवम दुबेचं वैशिष्ट्यं. शालेय वयापासूनच तो क्रिकेट खेळतो. मुंबईकडून अंडर 23 खेळताना शिवमने चांगली खेळी केली. 2018मध्ये तो मुंबई टीममधला एक महत्त्वाचा खेळाडू बनला होता.

विजय हजारे ट्रॉफी जिंकताना मुंबईसाठी शिवमची खेळी महत्त्वाची होती. मुंबई टी-20 लीगमध्ये शिवमने प्रवीण तांबेच्या एका षटकात 6 षटकार लगावले होते. त्यानंतर बडोद्याविरुद्ध खेळताना स्वप्निल सिंहच्या ओव्हरमध्ये 5 षटकार लगावले होते.

2019मध्ये बांगलादेशाच्या विरुद्ध शिवम भारतासाठी पहिली आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळला. यामध्ये पहिल्या सामन्यात त्याने 30 धावा देत 3 बळी घेतले आणि नाबाद 9 धावा केल्या. पुढच्या मॅचमध्ये त्याने फक्त गोलंदाजी केली पण तो विकेट घेऊ शकला नाही. तिसऱ्या मॅचमध्ये त्याने फक्त 1 रन केली आणि विकेटही घेतली नाही.

शिवम दुबे प्रभाव पाडू शकला नसल्याचं माजी क्रिकेटर आणि माजी निवड समिती सदस्य अशोक मल्होत्रा म्हणतात. ते सांगतात, "त्याने एका ओव्हरमध्ये 34 रन्स दिले म्हणून नाही तर तो बॅटिंग करताना फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. तो साधारण गोलंदाज असल्याचं सर्वात माहित आहे. फलंदाजी ही त्याची ताकद आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायची संधी मिळणार नाही आणि सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याला दबदबा निर्माण करता आलेला नाही.

शिवम दुबे आतापर्यंत भारतासाठी टी-20चे 13 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून यात त्याच्या सर्वोच्च धावा आहेत 54. त्याने एकूण 105 रन्स काढले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत.

पुढे काय?

आता प्रश्न असा आहे की शिवम दुबेचा आत्मविश्वास परत कसा येणार? त्याने कधी तिसऱ्या तर कधी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केलेली आहे. पण यात त्याची चूक नसून कर्णधार सांगतो ते त्याला ऐकावं लागत असल्याचं विजय लोकपल्ली म्हणतात. "तो टीमच्या गरजेनुसार खेळलाय. कर्णधाराने सांगितलं बॅट फिरव तर तो बॅट फिरवणार. म्हणूनच कॅप्टन त्याच्या पाठीशी आहे.

ऋषभ पंतनेही काहीसं असंच केलं. पण आता त्याने आपली टीममधली जागा गमावली आणि त्याला बाहेर बसून खेळ पहावा लागतोय. शिवम दुबेने जर एखादी चांगली खेळी केली तर त्याचा आत्मविश्वास परतेल आणि नवीन कोणालातरी संधी द्यायची म्हणून याला घेण्यात आलं नसून या खेळाडूत प्रतिभा असल्याचं टीमलाही जाणवेल."

बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय सीरिजमध्ये शिवमला संधी दिली जाते की नाही यावर आता सगळ्यांचं लक्ष आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)