You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जामियातील गोळीबारावर अमित शाह काय म्हणाले?
दिल्लीतल्या जामिया भागामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काढलेल्या एका मोर्चात एका व्यक्तीने गोळीबार केला.
पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या माणसाला ताब्यात घेतलं आहे.
एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका युवकाला गोळी लागली असून तो जामियाचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची पोलीस चौकशी करत आहेत असं एएनआयने स्पष्ट केलं आहे.
या विभागाचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले, एका व्यक्तीने पिस्तुल दाखवत गोळीबार केला आणि त्यात एक तरुण जखमी झाला आहे.
बिस्वाल म्हणाले, "ही व्यक्ती गर्दीमध्येच होती आणि त्याने विद्यार्थ्यांच्या दिशेन पिस्तुल रोखले. एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तो आता सुरक्षित आहे. हा जखमी विद्यार्थी जामिया विद्यापिठाचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी गोळ लागून जखमी झाला की नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल."
"दिल्लीतल्या घटनेबद्दल मी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. अशी कोणतीही घटना मोदी सरकार खपवून घेणार नाही, दोषी व्यक्तीला सोडणार नाही", असं ट्वीट अमित शाह यांनी केलं आहे.
त्याआधी काँग्रेसने या घटनेचा निषेध करुन अमित शाह यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेसने ट्वीट केलं- "अमित शाह पोलीस दल कशाप्रकारे चालवत आहेत? तो माणूस शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळी झाडत आहे आणि दिल्ली पोलीस तिथं उभे आहेत. अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासारख्या भाजपा नेत्यांना हेच हवंय का?"
AIMIMचे अध्यक्ष असदुद्दिन औवेसी यांनीही दिल्ली पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, दिल्ली पोलिसांना गेल्या महिन्यात तुम्ही जामियामध्ये जे शौर्य दाखवलं होतं त्याचं काय? आजूबाजूला उभ्या असलेल्य़ा लोकांना असं वाऱ्यावर सोडण्यासाठी बक्षिस द्यायचं झालं तर ते दरवेळेस तुम्हाला मिळेल. गोळी लागलेल्या व्यक्तीला बॅरिकेडवर का चढावं लागलं हे तुम्ही सांगू शकाल का?तुमच्या सर्विस रुल्समध्ये माणूस बनण्यापासून रोखलं जावं असं लिहिलं आहे का?
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार गोळी झाडणारी व्यक्ती 'हे घ्या स्वातंत्र्य' (ये लो आजादी) असं ओरडत होती.
या घटनेवर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षा शहेला रशिद यांनी ही दहशतवादी घटना असल्याचे सांगितले आहे.
शहेला रशिद यांन ट्वीट केले, "जामियातला हल्ला केवळ हातात पिस्तूल घेऊन झालेला गोळीबार नाही तर हा दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला आरएसएसच्या विचारांनी प्रभावित झालेल्या उजव्या विचारंच्या व्यक्तीने केला आहे. तसेच तो अमित शाह, नरेंद्र मोदी आणि अनुराग ठाकूर यांनी केलेल्या हिंसा करण्याच्या आवाहनामुळेच प्रभावित झाला आहे."
तर जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी देश पूर्ण उद्ध्वस्त होण्याआधी जागं झालं पाहिजे असं ट्वीट केलं आहे.
कन्हैय्याने केला ट्वीटमध्ये, "पाहा द्वेषाची ही छायाचित्रं. द्वेषामध्ये आंधळे होत स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी नथूराम गोडसेने 72 वर्षांपूर्वी गांधीजींची अशीच हत्या केली होती. त्याला बापू देशातले गद्दार आहेत असं वाटत होतं. आज रामाचं नाव घेत सत्तेत आलेले लोक नथुरामाचा देश तयार करत आहे. देश पूर्ण उद्ध्वस्त होण्याआधी जागे व्हा."
अभिनेते झिशान अय्यूब लिहितात, "ज्या लोकांना हे धक्कादायक वाटत आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही झोपला होता."
या प्रकरणानंतर सीपीएमनं अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसंच ट्वीटरवर #ArrestAnuragThakur म्हणजेच अनुराग ठाकूर यांना अटक करा हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)