You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Republic day: 'नरेंद्र मोदी भारताची लोकशाही कशी धोक्यात आणत आहेत': द इकॉनॉमिस्ट
भारत 71वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच 'द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकाने भारताची लोकशाही धोक्यात येत असल्याचं म्हटलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्याच आठवड्यात प्रकाशित झालेल्या 'द इकॉनॉमिस्ट' नियतकालिकाच्या अंकामध्ये 'Intolerant India - How is Modi endangering the world's biggest democracy' म्हणजेच 'असिहष्णू भारत, मोदी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला कसे धोक्यात आणत आहेत', असा लेख प्रसिद्ध केला आहे.
या अंकातील लेखामध्ये पंतप्रधानांच्या धोरणांचे विश्लेषण केले आहे. यामध्ये 'नरेंद्र मोदी सहिष्णू, धार्मिक विविधता असलेल्या भारताचं एका हिंदू राष्ट्रात रुपांतर करू पाहात आहे,' असं लिहिलं आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा हे रालोआ सरकारचे महत्वाकांक्षी पाऊल आहे. हे धोरण नरेंद्र मोदींना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करु शकते परंतु हीच धोरणं राजकीय विष ठरू शकतात असं या लेखात म्हटलं आहे.
राज्यघटनेतील सेक्युलर मांडणीचे महत्त्व कमी करण्याचे नरेंद्र मोदींचे प्रयत्न भारताच्या लोकशाहीचं नुकसान करतील आणि ते अनेक दशके सुरू राहिल असंही या लेखात म्हटलं आहे.
धर्म आणि राष्ट्रीयतेच्या आधारावर विभाजन करुन भाजपनं आपली व्होटबँक मजबूत केली आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरचं लोकांचं लक्ष हटवलं आहे. एनआरसीमुळे भाजपला आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी मदत होईल असंही या लेखात म्हटलं आहे.
2015 मध्ये सुद्धा मोदींवर लेख
नरेंद्र मोदींवर लेख लिहिण्याची 'द इकॉनॉमिस्ट'ची ही पहिलीच वेळ नाही. भारताचं कौतुक करणारे लेखही या नियतकालिकाने प्रकाशित केले आहेत. 2015 मध्ये याच नियतकालिकानं 'इंडियाज वन मॅन बँड' अशा नावाने मुखपृष्ठ कथा प्रकाशित केली होती.
हा लेखसुद्धा नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत लिहिला गेला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी 'अच्छे दिन'चं आश्वासन लोकांना दिलं आणि त्यानंतर ते सत्तेत आले असं लिहिलं होतं. त्यांनी रोजगार, बंधुत्व, आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देण्याचंही आश्वासन दिलं होतं मात्र त्यांची प्रगती निराशाजनक वाटावी इतकी संथ आहे, असं या लेखात लिहिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त ताकद आपल्या हातात ठेवली आहे आणि एकट्या माणसाला बदल घडवून आणणं एक मोठं आव्हान आहे. एक प्रकारे या लेखात मोदींकडून अपेक्षा असल्याचं मत मांडण्यात आलं होतं.
2015 च्या मे महिन्यात लिहिलेल्या एका लेखातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्यात आली होती. मोदींच्या दृढनिश्चयावर शंका घेता येणार नाही कारण भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे. हा देश जगातील सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश होत असताना त्याची अर्थव्यवस्थाही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकते असं या लेखात म्हटलं होतं.
भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक करण्यात या लेखात केलं होतं. तसेच ते बाजारपेठेत बदल घडवून आणतील अशी अपेक्षाही त्यांच्याकडून ठेवण्यात आली होती. तसेच मोदी यांनी जगातील कामगार कायदे सोपे करण्यासाठी राष्ट्रीय अभियान चालवलं पाहिजे असा सल्ला देण्यात आला होता.
2017च्या लेखातसुद्धा टीका
'द इकनॉमिस्ट'ने वर्ष 2017 मध्ये सुद्धा एका लेखात मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळातील कामकाज आणि त्या कालावधीत लागू करण्यात आलेल्या आर्थिक धोरणांवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली होती. या लेखामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडून असलेल्या अपेक्षांप्रमाणे त्यांनी कोणतीही आर्थिक सुधारणा केली नाही असं लिहिलं होतं. तसेच पंतप्रधान सुधारकाच्या तुलनेत प्रशासक जास्त आहेत असंही या लेखात म्हटलं होतं. नरेंद्र मोदींनी एक संधी घालवली असंही इकॉनॉमिस्टनं म्हटलं होतं.
2010 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक
2015 च्या मुखपृष्ठ कथेच्या आधी ऑक्टोबर 2015मध्येही 'द इकॉनॉमिस्ट'ने भारतीय अर्थव्यवस्थेवर एक अंक प्रसिद्ध केला होता.
त्यावेळच्या मुखपृष्ठ कथेचं शीर्षक होतं, 'हाऊ इंडियाज ग्रोथ विल आऊटपेस चायनाज' (भारताचा आर्थिक वृद्धी दर चीनच्यापुढे कसा जात आहे?). या लेखात भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक करण्यात आलं होतं. भारतातील खासगी कंपन्या अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे असं त्यात लिहिण्यात आलं होतं.
2010 आणि 2020 च्या दोन्ही मुखपृष्ठ कथांवर सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. दोन्ही मुखपृष्ठ कथांची तुलना करत लोक ट्वीट करत आहेत.
2010मध्ये युपीए सरकार होतं आणि त्यावेळेस देशाच्या जीडीपीच्या वाढीचा दर चांगल्या स्थितीत होता. त्याच्या तुलनेत आज देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे.
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी दोन्ही वेळची मुखपृष्ठं ट्वीट केली आहेत. या ट्वीटमध्ये ते लिहितात, "दोन मुखपृष्ठांची गोष्ट, 2010 आणि 2020, फार काही सांगायचं नाहीये. राष्ट्रदोही हा शब्द ऐकण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. तुमचा शुक्रवारचा दिवस चांगला जावो."'
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)