राज ठाकरे यांना भाजपबरोबर यायचं असेल तर ही अट मान्य करावी लागेल: चंद्रकांत पाटील

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1.तर राज ठाकरे यांना भाजपसोबत घेऊत - चंद्रकांत पाटील

मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आधी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सत्तेच्या खुर्चीसाठी ते एकत्र येऊ शकतात तर सत्यासाठी आम्ही का एकत्र येऊ शकत नाही? असं म्हणत मनसेसोबत युतीचे संकेत दिले होते.

2. सत्तेत बसलेली लोकं खरी तुकडे-तुकडे गँग: चिदंबरम

माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गुरुवारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. लोकशाही निर्देशांकात भारताने 10 स्थानांची घसरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सध्याच्या सरकारमध्ये लोकशाही संस्था शक्तिहीन झाल्या आहेत आणि सत्तेत असलेली लोकं खरी 'तुकडे-तुकडे गँग' आहेत, असा आरोप चिंदबरम यांनी केला आहे.

भारताचा लोकशाही निर्देशांकात 10 स्थानांनी घसरला आहे. गेल्या दोन वर्षातल्या राजकीय घडामोडी जवळून पाहिलेल्या व्यक्तीला हे माहिती आहे की, लोकशाहीची हत्या झाली आहे. लोकशाही संस्था दुर्बळ झाल्या आहेत. तसंच, जे सत्तेत आहेत तेच खरे 'तुकडे तुकडे गँग' आहेत, असा आरोप त्यांनी भाजपवर लावला आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने प्रसिद्ध केली आहे.

3. कृषी आयटीआय सुरू होणार: अजित पवार

औद्योगिक क्षेत्रात वाढलेलं डिजिटलायझेशन, ऑटोमेशन, दररोज विकसित होणारे तंत्रज्ञान, जागतिक उद्योगाची आजची गरज लक्षात घेऊन राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रशिक्षणात मुलभूत बदल करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

आगामी तीन वर्षांत आयटीआय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. त्यासाठी 12 टक्के निधी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे तर उर्वरित 88 टक्के निधी खासगी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व प्रशिक्षण सेवेद्वारे उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.

4. मंत्रिपद न मिळाल्याने राजू शेट्टी वैफल्यग्रस्त: सदाभाऊ खोत

माजी खासदार राजू शेट्टी यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या मागे आता माणसे राहिली नसून ते आता 5 वर्षे काय 25 वर्षे हातकणंगले मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

शेट्टी एकदा भाजपबरोबर राहिले. या निवडणुकीत ते आघाडीबरोबर होते. या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे होतं. त्यांना राज्यमंत्रिपदाचा निरोप होता. म्हणून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, असं खोत म्हणाले. ही बातमी पुढारीने दिली आहे.

5. राज्यात आता स्मार्ट गावे: हसन मुश्रीफ

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामविकास विभागामार्फत 'कै. आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना' राबविण्यात येणार असून त्यातील तालुकास्तरीय विजेत्या गावांना 20 लाख रुपये आणि जिल्हा स्तरावरील ग्रावांना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे केली.

जागतिक व्यापार केंद्रात आयोजित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेत मुश्रीफ बोलत होते. या योजनेतून सध्या असलेल्या पुरस्काराच्या रकमेतही वाढ करण्यात येईल. या योजनेत तालुकास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना 10 लाख ऐवजी 20 लाख रुपये देण्यात येतील. तसेच जिल्हास्तरावर चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना 40 लाख ऐवजी 50 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)