You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तान्हाजी'ला अमित शाह, शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी दाखवणाऱ्या व्हीडिओवरून वाद #5मोठ्याबातम्या
आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. शिवाजींच्या चेहऱ्यावर मोदी - व्हीडिओवरून वाद
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तान्हाजी' चित्रपटातील दृश्यांचा वापर केलेला एक व्हीडिओ मंगळवारी (21 जानेवारी) दिवसभर चर्चेत राहिला. या व्हीडिओमध्ये 'तान्हाजी' सिनेमातील दृश्यांशी छेडछाड करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभानच्या रूपात दाखविण्यात आलं होतं. एबीपी माझानं ही बातमी दिलीये.
दिल्ली निवडणुकांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओवरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि वाद सुरू झाल्यानंतर 'पॉलिटिकल कीडा' या पेजने वादग्रस्त हा व्हीडीओ युट्यूबवरून काढून टाकला.
"हा व्हीडिओ 'पॉलिटिकल कीडा' नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडीओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजप या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरून भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे," असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
2. अशोक चव्हाण - मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळेच सत्तेत सहभागी झालो
"भाजप हा मुस्लिमांचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि भाजपला सत्तेपासून रोखावे, असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह होता. तसंच महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांचेही तोच आग्रह होता. त्यामुळेच काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला," असं वक्तव्यं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.
नांदेडमध्ये मंगळवारी (21 जानेवारी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (CAA) निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलंय.
याचा एक व्हीडिओ अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात नागरिकत्व कायदा कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात लागू होणार नाही, अशी खात्री त्यांनी उपस्थितांना दिली आहे.
3. उद्धव ठाकरे - 'नाईट लाइफ' हा शब्द आवडत नाही
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'मुंबई 24 तास' पुन्हा सुरू होणार, अशी घोषणा केली होती. यालाच अनेक जण 'मुंबई नाईटलाईफ'ही म्हणत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यासंदर्भात बोलताना मला 'नाईटलाईफ' हा शब्दच आवडत नाही, असं विधान केल्याची बातमी सकाळने दिलीये.
IPS अधिकाऱ्यांच्या एका कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.
"प्रत्येक शहराची एक संस्कृती असते. त्यामुळे 'नाईटलाइफ'चा प्रस्ताव राज्यभर राबवणं योग्य ठरणार नाही. मुंबईत ठराविक ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात हे राबवू शकतो. मुळात मला 'नाईटलाइफ' हा शब्दच आवडत नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, 'नाईटलाइफ'मुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो, असं विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं.
4. संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन राज्यातील शाळांमध्ये होणार
प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज सकाळी घटनेच्या प्रास्ताविकाचं वाचन केलं जाईल. "सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे' या उपक्रमांतर्गत प्रास्ताविकाचे वाचन केले जाईल. 'द इंडियन एक्सप्रेस'नं ही बातमी दिलीये.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून (CAA) देशभरात तसंच राज्यातील विविध ठिकाणी निदर्शनं सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागानं यासंबंधीचा शासनादेश (GR) मंगळवारी (21 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आला. यासंबंधीचा GR 2013 मध्येच प्रसिद्ध करण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असंही या नवीन शासनादेशामध्ये म्हटलं आहे.
5. शाहीन बागेतल्या महिला आंदोलक नायब राज्यपालांना भेटल्या
शाहीन बाग इथल्या आंदोलकांच्या एका प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. नायब राज्यपालांनी ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये.
आपल्या ट्वीटमध्ये बैजल यांनी म्हटलं आहे, "शाहीन बागेतल्या आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर आंदोलनामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा विचार करून आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही आंदोलकांना केलं आहे."
"शाळेच्या वाहनांना आम्ही वाट देऊ, पण आंदोलन सुरूच राहील," अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात शाहीन बाग इथं गेल्या 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)