Geeta Gopinath: भारताच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका कसा?

  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या मते भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज चुकला आहे.
  • 2019-20 मध्ये अर्थव्यवस्थेच्या वृद्धि दर 5 टक्क्यापेक्षा कमी असेल: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
  • 2020-21 मध्ये वाढीचा दर 5.8 इतका राहण्याची शक्यता- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
  • रिझर्व्ह बँकेनेही वाढीचा दर 5% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
  • संयुक्त राष्ट्राने भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 5.7% पासून कमी होऊन 5% झाला आहे.

या आकडेवारीवरून भारताची अर्थव्यवस्था रुळावर नाही हा अंदाज लावता येतो. नरेंद्र मोदी सरकारच्या दाव्यानुसार सकल राष्ट्रीय उत्पन्नच्या (GDP) वाढीचा दर कमी होत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या आकडेवारीचा आधार घेत IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितलं की भारताच्या मंद अर्थव्यवस्थेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीचा जगावर कसा परिणाम होईल याची चर्चा केली आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दावोसने सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सांगितलं की भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत बिगर बँकिग क्षेत्र (NBFC) च्या अडचणींमुळे आणि मागणीत घट झाल्यामुळे वाढीचा दर कमी झाला आहे.

IMF च्या ताज्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये जागतिक पातळीवर आर्थिक वृद्धीचा दर 2.9 टक्के, 2020 मध्ये 3.3 टक्के आणि 2021 मध्ये 3.4 टक्के राहील. तसंच IMF ने भारताच्या आर्थिक वृद्धीचा अंदाज 2019 मध्ये 4.7 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या तीन महिन्यात IMF ने हा दर 1.3 टक्क्यांनी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

2020 आणि 2021 मध्ये तो भारताच्या आर्थिक वृद्धिचा दर 5.8 टक्के आणि 6.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताच्या आर्थिक वृद्धी दरात अंदाजात घट झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांत वाढीचा दर 0.1 टक्के आणि त्यानंतरचा 0.2 टक्के घट झाली आहे.

'कर्ज घेण्याच्या प्रमाणात घसरण'

लोकांनी कर्ज घेण्याच्या प्रमाणात घट झाली आहे असं या अहवालात म्हटलं आहे. कमी उत्पन्न हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे.

एनडीटीव्ही ला दिलेल्या एका मुलाखतीत गोपीनाथ म्हणतात की 2019 मध्ये जागतिक पातळीवर लोकांचा असंतोष वाढला आहे. चिली आणि हाँगकाँग ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.

भारतात सुरू असलेल्या आंदोलनाचा त्यांनी या अहवालात उल्लेख केला नाही. मात्र आंदोलनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो हेही त्यांनी सांगितलं.

भारतात अनेक राज्यात CAA विरोधी आंदोलनं सुरू आहेत. हा कायदा घटनाबाह्य असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. पण मोदी सरकारचं म्हणणं आहे की विरोधक मुद्दामहून लोकांची दिशाभूल करत आहेत.

भारताचा जीडीपी घसरला तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतं असं गोपीनाथ यांना वाटतं. त्या सांगतात की भारताचं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान आहे त्यामुळे भारताच्या घसरणीचा परिणाम जगावर होऊ शकतो.

कोण आहेत गीता गोपीनाथ?

गोपीनाथ हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी इंटरनॅशनल फायनान्स आणि मायक्रोइकॉनिम्समध्ये संशोधन केलं आहे.

IMFच्या प्रमुख क्रिस्टिन लिगार्ड म्हणाल्या, "गीता जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव तर आहेच शिवाय त्यांची बौद्धिक क्षमता आणि या विषयातील ज्ञान उत्तम आहे."

1. या पदावर पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती.

2. गीता यांचा जन्म केरळमधील आहे. केरळ सरकारने गेल्या वर्षी गीता यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सरकारमधील काही लोक नाराजही झाले होते.

3. गीता अमेरिकन इकॉनिमिक्स रिव्ह्यूच्या सहसंपादक आणि नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनिमिक रिसर्चमध्ये इंटरनॅशनल फायनान्स आणि मायक्रोइकॉनॉमिक्सच्या सहसंचालक आहेत.

4. गीता यांनी व्यापार आणि गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट, नाणेधोरण, कर्ज आणि विकसनशील बाजारांच्या समस्या अशा विषयांवर 40 रिसर्चपेपर लिहिले आहेत.

2001 ते 2005पर्यंत त्या शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यपक होत्या. त्यानंतर त्यांची नियुक्ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून झाली.

5. 2010मध्ये त्या या युनिव्हर्सिटीत प्राध्यापक झाल्या त्यानंतर इंटरनॅशनल स्टडीज अँड इकॉनिमक्स या विषयाच्या त्या प्राध्यापक झाल्या.

6. गीता यांचं पदवीपर्यंतच शिक्षण भारतात झालेलं आहे. 1992ला त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अर्थशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीला गेल्या.

7. 1996 ते 2001 या काळात त्यांनी प्रिंसटन युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)