BBC Indian Sportswoman of the Year: तुमच्या आवडत्या महिला खेळाडूला मत द्या #BBCISWOTY

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही ए़डिटर, भारतीय भाषा

"ऑलिम्पिक पदक तुला का जिंकायचंय? असा प्रश्न एका पत्रकाराने मला विचारला. तेव्हा मी त्याला सांगितलं या पदकासाठी मी आयुष्य समर्पित केलं आहे. दररोज या पदकासाठी मी मेहनत करतेय."

हे उद्गार आहेत पी. टी. उषा यांचे. खेळाडूंसाठी ऑलिम्पिक स्पर्धा किती महत्त्वाची असते, हे या उत्तरातून स्पष्ट होतं.

यंदा 24 जुलै पासून ऑलिम्पिक स्पर्धेचा नारळ फुटेल, पण त्याचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. भारतासह जगभरातले खेळाडू क्रीडाविश्वातल्या सर्वोच्च स्पर्धेसाठी तयार होत आहेत.

तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.

2000 नंतर भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत 13 पदकं पटकावली आहेत, त्यापैकी पाच पदकं महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. विरोधाभास म्हणजे, 20व्या शतकात भारताने मिळवलेली सगळी पदकं पुरुष खेळाडूंनीच पटकावली होती.

त्यामुळे ऑलिम्पिक 2020च्या पार्श्वभूमीवर बीबीसीवर आजपासून या खेळांसाठी एक विशेष पान सादर करत आहे.

बीबीसी भारतातल्या सर्वोत्कृष्ट महिला क्रीडापटूंना गौरवणार आहे. क्रीडापटू आणि खेळांसाठीच्या या खास पेजवर देशभरातल्या क्रीडापटूंच्या प्रेरणादायी कहाण्या तुम्हाला वाचायला मिळतील. त्यांच्या संघर्षगाथा, त्यांच्या वाटचालीतले अडथळे आणि त्यावर त्यांनी कशी मात केली, हे सगळं या कहाण्यांद्वारे समजून घेता येईल.

भारताच्या महिला आणि खेळ यांच्यासंदर्भात एक व्यासपीठ तयार व्हावं आणि त्यानिमित्ताने जागरुकता व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

याव्यतिरिक्त पहिलेवहिले बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019 पुरस्कार मार्च 2020 मध्ये घोषित केले जातील. पुरस्कारासाठीचे संभाव्य नामाकनं फेब्रुवारीत वाचकांसमोर मांडण्यात येतील.

भारतीय महिला क्रीडापटूंच्या मौल्यवान योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय महिला क्रीडापटूंच्या दैदिप्यमान प्रदर्शनाची दखल घेण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.

आता रिओ ऑलिम्पिक्सचंच पाहा ना. 2016 साली झालेल्या या स्पर्धेत साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधू या दोघींनीच भारतासाठी पदकांची कमाई केली. संपूर्ण स्पर्धेत भारताला मिळालेली दोन्ही पदकं महिला क्रीडापटूंनीच पटकावली.

ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारी साक्षी पहिली महिली कुस्तीपटू ठरली तर सिंधू ऑलिम्पिक पदक पटकावणारी सगळ्यात तरुण भारतीय खेळाडू होती. जिम्नॅस्ट दीपा कर्माकर ही ऑलिम्पिक पदकाच्या अगदी समीप पोहोचली होती.

सिंधू आणि साक्षी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली नसती तर भारतीत पथकाला ऑलिम्पिकमधून रित्या हाताने परतावं लागलं असतं. 1992 ऑलिम्पिकनंतर असं घडलेलं नाही.

त्यापूर्वी 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सहा पदकांवर नाव कोरलं. यापैकी दोन महिला क्रीडापटूंनी पटकावली. मेरी कोमने भारताला बॉक्सिंगमध्ये पहिलंवहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं.

सायना नेहवाल ही ऑलिम्पिक पदक पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती.

या सगळ्यातून भारतीय महिला क्रीडापटूंचं खेळाला योगदान अधोरेखित होतं. मात्र यासंदर्भात फार चर्चा झालेली नाही.

हा पुरस्कार कशासाठी?

टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने महिला आणि तरुणांच्या खेळातील योगदानावर बीबीसीने लक्ष केंद्रित केलं आहे. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार (थोडक्यात #BBCISWOTY) या विचाराने प्रेरित आहे.

या पुरस्कारासंदर्भात भूमिका विषद करताना बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा यांनी सांगितलं की महिलांना खेळात कारकीर्द घडवण्यासाठी असंख्य अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

"या पुरस्काराची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. भारतीय महिला क्रीडापटूंच्या योगदानाची दखल घेणं आणि त्याचवेळी त्यांचा संघर्षमय प्रवास वाचक-प्रेक्षकांसमोर मांडणं महत्त्वाचं आहे. खेळांमधील महिलांची कारकीर्द उलगडणे हाही त्यामागचा उद्देश आहे.

"तुम्ही सगळे या उपक्रमाला भरभरून पाठिंबा द्याल, याची खात्री वाटते. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019 पुरस्कारासाठीच्या उमेदवारांना तुम्ही मनापासून मतदान कराल, असा विश्वास वाटतो," असंही त्या म्हणाल्या.

पुरस्कार विजेत्या खेळाडूची निवड कशी होईल?

बीबीसीने निवडलेल्या ज्युरीने भारतीय महिला क्रीडापटूंपैकी 2019 वर्षात दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. ज्युरींमध्ये देशातले मान्यवर क्रीडा पत्रकार, क्रीडातज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश होता.

ज्युरी बोर्डाने ज्या पाच महिला क्रीडापटूंना सर्वाधिक मतं दिली आहेत, त्यांची नावं पुरस्कारार्थींच्या संभाव्य यादीत येतील. ही पाच नावं फेब्रुवारीत जाहीर केली जातील.

तुमच्या आवडत्या महिला क्रीडापटूला मतदान करण्यासाठी तुम्ही बीबीसीच्या विविध भारतीय भाषांच्या वेबसाईटवर जाऊ शकाल.

चाहत्यांची सर्वाधिक मतं मिळणाऱ्या भारतीय महिला क्रीडापटूची बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्काराची विजेती म्हणून घोषित करण्यात येईल. मार्च महिन्यात दिल्लीत होणाऱ्या एका विशेष सोहळ्यात विजेत्या महिला क्रीडापटूचा सन्मान करण्यात येईल.

खेळात अतुलनीय कारकीर्द घडवणाऱ्या ज्येष्ठ महिला क्रीडापटूला जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येईल.

पुरस्कार सोहळ्यापूर्वी बीबीसीतर्फे देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. शहरं, गावांमध्ये पसरलेल्या युवा वर्गात भारतीय महिला क्रीडापटूंच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करणं, हे या कार्यक्रमांमागचं उद्दिष्ट असेल.

भारतीय महिला क्रीडापटूंची कामगिरी

शेवटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 57 पदकांची कमाई केली. यापैकी 28 पदकं महिला क्रीडापटूंनी जिंकली आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने दोनदा संघाला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.

स्मृती मन्धाना, हिमा दास, मनू भाकर, राणी रामपाल, सानिया मिर्झा, दीपिका पल्लीकल - भारतीय महिला क्रीडापटूंची यादी न संपणारी आहे.

सानिया मिर्झाने मातृत्वाच्या जबाबदारीनंतर जेतेपदासह दमदार पुनरागमन केलं. विनेश फोगाटने रोम इथं झालेल्या स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरलं.

भारतीय महिला क्रीडापटूंसाठी चित्र आश्वासक होतंय. #BBCISWOTY ही तुमच्यासाठी बदलत्या आणि चांगल्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी आहे.

तर तुमच्या आवडत्या भारतीय महिला क्रीडापटूला बीबीसीच्या वेबसाईटवर जाऊन मतदान करायला विसरू नका. तुमच्या आवडत्या महिला क्रीडापटूला आता तुम्हीही जिंकून देऊ शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)