JNU: 'विद्यापीठं रक्तानं भिजतायत, शिवसेनेचा सामनातून निशाणा' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) विद्यापीठं रक्तानं भिजतायत, शिवसेनेचा 'सामना'तून निशाणा

"विद्यापीठं, महाविद्यालयं रक्तानं भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यातून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतकं निर्घृण राजकारण कुणी केलं नव्हतं," असं म्हणत शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधलाय.

देशात अराजकता निर्माण करणारे राजकारण धोकायदक असल्याची चिंताही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलीय.

"नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ निर्माण झाला असून, त्याविरोधात मोर्चे निघतायत. हिंदू विरुद्ध मुस्लीम दरी पडून दंगली होतील, अशी आशा भाजपला होती, ती फोल ठरली," असा गंभीर आरोप या अग्रलेखातून करण्यात आलाय.

तसंच, "CAA कायद्याचा फटका अनेक राज्यांमध्य हिंदूंनाही बसतोय. त्यामुळं हिंदूही चिडले असून, भाजप विरुद्ध बाकी सर्व अशी स्थिती निर्माण झाल्यानं भाजपची गोची झालीय. त्यामुळंच सूडभावनेतून उपद्व्याप केले जातायत. जेएनयूतील राडा त्याचाच भाग आहे का, अशी शंका येते." असं 'सामना'त म्हटलंय.

दुसरीकडे, जेएनयूतल्या हिंसेचा निषेध करणारे जेएनयूचे माजी विद्यार्थी असलेले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दुसऱ्याच दिवशी टीका केलीय. ते म्हणाले, "मी जेव्हा जेएनयूत होतो, तेव्हा तिथं तुकडे तुकडे गँग नव्हती."

2) CAA : अमित शाह म्हणतात, 'समर्थनार्थ 53 लाखांहून अधिक मिस्ड कॉल'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) समर्थन देणारे सुमारे 53 लाखांहून अधिक मिस्ड कॉल आल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलाय. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.

"CAA च्या समर्थनासाठी 52.72 लाख अधिकृत मिस्ड कॉल आले. एकूण 68 लाख मिस्ड कॉल आले, मात्र त्यापैकी अनेक मिस्ड कॉल अधिकृत नंबरवरुन नव्हते, तर एकाच नंबरवरुन पुन्हा दिलेले होते," असं अमित शाह यांनी सांगितलं.

भाजपनं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत मिस्ड कॉल देऊन समर्थन देता येतं. त्यासाठी भाजपनं 8866288662 हा मोबाईल नंबरही जारी केला होता.

या नंबरवर मिस्ड कॉल देण्यासाठी भाजप नेत्यांनी ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आक्षेपार्ह आवाहनं केल्याचेही दिसून आले होते. त्यामुळं या मुद्द्याभोवती सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे.

3) मोदी सरकारविरोधात 8 जानेवारीला कामगार संघटनांचा देशव्यापी संप

मोदी सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी 8 जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आलाय. यात दहा राष्ट्रीय कामगार संघटनांचा सहभाग आहे. जवळपास 25 कोटी लोक संपात सहभागी होतील, असा दावा संघटनांकडून करण्यात आलाय. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

"8 जानेवारी रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात 25 कोटींहून अधिक लोकांच्या सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. कामगारविरोधी, लोकविरोधी, देशविरोधी धोरणांचा निषेध यातून केला जाईल," असं कामगार संघटनांच्या पत्रकातून सांगण्यात आलंय.

कामगार मंत्र्यांसोबतच्या 2 जानेवारी 2020 रोजीच्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्यानं कामगार आणि विद्यापीठांमधील फीवाढ आणि शिक्षणाचं बाजारीकरणाविरोधात विद्यार्थी यात सहभाग होतील, असाही दावा करण्यात आलाय.

दुसरीकडे, महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी 8 जानेवारीला पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र टाइम्सनं दिलीय. या संपाला राजपत्रित महासंघानं पाठिंबा दिल्याचंही बातमीत म्हटलंय.

4) 'महाराष्ट्र केसरी'तून बाला रफिक शेख, अभिजीत कटके बाहेर

महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्यात यंदा महाराष्ट्राला नवा विजेता मिळणार आहे. लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हे दोन कुस्तीपटू यंदा अंतिम फेरीत दाखल झालेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

माती विभागाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या माऊली जमदाडेनं गतविजेता बाला रफिक शेखला चितपट केलं आणि अंतिम फेरी गाठली, तर 2018 च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता अभिजीत कटके याला मॅट विभागाच्या अंतिम फेरीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं चितपट केलं.

विशेष म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान असून, अर्जुनवीर काका पवारांचे पठ्ठे आहेत. आता काका पवारांच्या या दोन शिष्यांमध्ये आज (7 जानेवारी) पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात अंतिम फेरी पार पडेल आणि राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळेल.

5) प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं निधन

भारतातील प्रसिद्ध चित्रकार अकबर पदमसी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील वरळीला वास्तव्यास असलेले अकबर पदमसी हे काही दिवस कोइम्बतूरजवळील आश्रमात राहायला गेले होते, तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महिविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिसमधून उच्चशिक्षण पूर्ण केलं. पाश्चात्य शैलीनं चित्र रंगवण्यासाठी ते विशेषत: ओळखले जात. 1951 सालापासून त्यांची चित्रकारकीर्द बहरत गेली.

ललिता कला अकादमीचा कलारत्न पुरस्कार, तसंच मध्य प्रदेशच्या कालिदास सन्मानानं अकबर पदमसी यांचा गौरव झाला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)