You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा
उद्धव ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर केली होती. त्यानंतर आता सरकारने कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर केली आहे.
राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी आली आहेत. या खात्यांची तपासणी जशी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्या यादीत दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. याआधी, पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही कर्जमाफी पूर्ण होईल.
"जी घोषणा आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात केली होती की, शेतकऱ्यांना ज्यांचं पीक कर्ज 2 लाखांपर्यंतचं आहे, त्यांना आम्ही कर्जमुक्त करू, त्याची पहिली यादी आम्ही सोमवारी जाहीर करत आहोत, याचा मला आनंद आहे," असं ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलं.
"ही यादी सुरुवातीला मर्यादित स्वरूपात असेल. दुसरी यादी 28 फेब्रुवारीला येईल. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल येत्या 3 महिन्यांचा कालावधी आम्ही म्हटलेला आहे पण येत्या एप्रिल शेवटपर्यंत ही योजना आम्ही पूर्ण करू," असंही त्यांनी म्हटलं.
अशी असेल कर्जमाफीची योजना
डिसेंबर महिन्यात नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.
"ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे. मार्च 2020पासून ही योजना लागू होईल," असं ते विधानसभेत म्हणाले होते.
"कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचवली जाईल. या हंगामांचं जे कर्ज जूनमध्ये थकित होईल त्याचंसुद्धा पुनर्गठन करण्यात येईल," असंही ते म्हणाले होते.
"नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल," असंही उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं होतं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या या घोषणेला विरोध केला होता.
"सातबारा कोरा करणार, असं म्हणत होता, ते कधी होणार आहे? सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचा शब्द हे सरकार पाळत नाहीये. त्यामुळे आम्ही सभात्याग करतो," असं त्यांनी म्हटलं होतं.
"सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा या आश्वासनावरून सरकार पलटलं आहेत. ही कर्जमाफी उधारीची आहे. मार्चमध्ये कर्जमाफी करणार आहेत. आता याचे तपशील दिले नाहीत. 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीत शेतकरी सातबारा कर्ज होतो का? आमच्या सरकारनं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. त्यात पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज होतं. पण, आताच्या कर्जमाफीत याचा उल्लेख नाही. या घोषणेचा नेमका फायदा किती शेतकऱ्यांना होणार, याबाबत संभ्रम आहे," असंही ते म्हणाले होते.
अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं होतं, "कोणत्याही अटी-शर्थींशिवाय हे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणताही ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाहीये. बँकांच्या दारात जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांचं थकित कर्ज आपोआप माफ होईल."
'सातबारा कोरा होत नाही'
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मात्र या घोषणेवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले, होते "सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सप्टेंबर 2019पर्यंतचं 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यानं ते पूर्ण होत नाही. पण, गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पिकावर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय. त्यांना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नाही."
तर शिवसेना नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटलं होतं, "देवेंद्र फडणवीस सरकारच्या दीड लाखाच्या कर्जमाफीत 21 टक्के शेतकरी वंचित राहिले होते. आता 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे विदर्भ मराठवाड्यातील 92 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. राजू शेट्टी म्हणतात तसं, ऑक्टोबर 2018मध्ये पडलेल्या पावसामुळे तेव्हाच्या पिकावर घेतलेल्या कर्जाविषयी विचार करण्यात येईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)