You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAB: नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ IPS अधिकाऱ्याचा राजीनामा #5मोठ्या बातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ IPS अधिकाऱ्याचा राजीनामा
काल राज्यसभेने मंजुरी दिलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ राज्य पोलीस दलातील IPS अधिकारी अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे.
हे विधेयक भारताच्या धार्मिक एकतेच्या विरोधात आहे. मी न्यायप्रेमी लोकांना विनंती करतो की सर्वांनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा. हे सर्व घटनेच्या मुलभूत तत्त्वांविरोधात सुरू आहे, असे नमूद करत अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे. ते 1997च्या तुकडीचे अधिकारी आहेत. नुकतीच त्यांची मानवी हक्क आयोगाच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. सामनाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
2. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला. गेल्या भाजप-युती सरकारमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव समृद्धी महामार्गाला द्यावं असा विचार सुरू होता. मात्र आता नव्या सरकारने नागपूर-मुंबई यांना जोडणाऱ्या या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "समृद्धी महामार्ग हा राज्य आणि देशासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मंत्रिमंडळातील सर्वांची इच्छा होती. ती मागणी पूर्ण झाली असून आता लवकरच कार्यवाही पूर्ण होईल." एबीपी माझानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
3. ज्येष्ठ नागरिकांना त्रास दिल्यास तुरुंगवास
मुलांसमवेत राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा पालकांबरोबर हेतुपुरस्सर गैरव्यवहार करणाऱ्या तसेच त्यांना सोडून देणाऱ्या व्यक्तींना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील असे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. या विधेयकामुळे ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याणकारी कायदा, 2007मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकाद्वारे ज्येष्ठांसाठी एका लवादाची स्थापना करण्यात येणार आहे. 80 वर्षांच्या वरील ज्येष्ठांनी लवादाकडे केलेले अर्ज 60 दिवसांत निकाली काढण्याची तरतूद यात केली आहे. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले आहे.
4. आरेतील वृक्षतोडीची चौकशी करणार
मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीऐवजी अन्यत्र जागा शोधण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. त्यासाठी वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये मेट्रो कारशेडसाठी 2100 झाडे तोडण्यात आली, त्याचीही चौकशी ही समिती करणार आहे.
मेट्रो कारशेडसाठी सध्या निश्चित केलेल्या जागेची पर्यावरण माहिती घेण्यासाठी एक नवा अहवाल मागवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशात या समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. लोकसत्ताने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5. इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त
1993 च्या स्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता अंमलबाजवणी संचालय (ED) ने जप्त केली आहे. यामध्ये त्याचे मुंबई आणि लोणावळामधले बंगले, फ्लॅट, कार्यालय जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्चीने अवैध पद्धतीने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी सोमवारी आरोपपत्र दाखल केले होते.
सुमारे 1200 पानी आरोपपत्रात त्याची पत्नी आणि दोघा मुलांसह 12 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. इक्बाल मिर्चीचे लंडनमध्ये निधन झाले आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)