You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार : 2 मुलाखती आणि 4 विसंगती
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
23 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अचानक शपथ घेतली अन् सगळ्यांनाच प्रश्न पडला की नेमकं झालं काय. या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही पूर्णपणे मिळत नाहीये. पण आधी शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतींमधून या घटनेच्या दोन परस्परविरोधी बाजू पुढे येत आहेत.
एबीपी माझाला शरद पवारांनी, तर झी चोवीस तासला देवेंद्र फडणवीसांनी मुलाखत दिली. या मुलाखतींमधून 4 विसंगती पुढे येतात:
1) 'पवार-मोदी' भेटीत नेमकं काय झालं?
20 नोव्हेंबर 2019. म्हणजे देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी शपथ घेण्याच्या तीन दिवस आधी.
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांमध्ये चर्चा गंभीर वळणावर असताना पवार-मोदींमध्ये तब्बल 45 मिनिटं ही भेट झाली.
राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली व मदत जाहीर करण्याची मागणी केल्याचं पवारांनी त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर चर्चा झाली नसल्याचंही पवार म्हणाले होते.
मात्र, 2 डिसेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले, "मोदींना शेतकरी संकटाबद्दल बऱ्याच दिवसांपूर्वी वेळ मागितली होती. त्यांनी याच वेळेला वेळ दिली. कदाचित त्यांच्या कार्यलयाला वाटलं असेल, की यावेळी वेळ दिल्यामुळे गैरसमज वाढतील.
"ती बैठक संपल्यानंतर मी उठायला लागलो तेव्हा पीएम म्हणाले, की आपण एकत्र येऊन काम केलं तर मला आनंद होईल. मी म्हटलं आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. पण एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मी म्हटलं राष्ट्रीय प्रश्न आले तर विरोधासाठी विरोध करणार नाही. त्याची चिंता करू नका. मी त्यांना विनम्रतेने सांगून मी निघालो. ज्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही त्याची चर्चा का करायची," असंही शरद पवारांनी मोदींसोबतच्या भेटीबद्दल मुलाखतीत सांगितलं.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी 7 डिसेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत 'पवार-मोदी' भेटीचा ओझरता उल्लेख केला. या उल्लेखातून 'पवार-मोदी' भेटीभोवतीचं शंकेचं जाळं आणखी घट्ट होतं. कारण शरद पवार म्हणत असले की, मोदींशी राजकीय चर्चा झाली नाही, तरी फडणवीसांनी मात्र त्या भेटीबद्दल बोलताना अनेक सूचक विधानं केलीत.
फडणवीस म्हणतात, "शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, हे तेच दोघे सांगू शकतील. ते बोलण्याचा मला अधिकार नाही. पण त्यातल्या काही गोष्टी मला माहीत आहेत. पण त्या योग्य वेळी बोलेन. आज बोलत नाही. सगळ्या गोष्टी आता बोलण्यासारख्या नाहीत."
शिवाय, "मोदी-पवार भेटीतला अर्धा भाग बाहेर आलेला नाहीय. तो भाग योग्य वेळेला बाहेर येईल. तो आज आणावा असं मला वाटत नाही. पण पवार जे म्हणाले, ते पूर्ण त्यांनी सांगितलं नाहीय. अनेक गोष्टी त्यामागे आहेत. पवार आणि पंतप्रधान मोदींचा संवाद, तसेच त्याआधीचा आणि नंतरचा संवाद, याबद्दल मी बोलणं योग्य नाहीय. योग्यवेळी योग्य फोरमवर ते येईल," असं म्हणत फडणवीसांनी महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतरही राजकीय विश्लेषकांना अंदाज बांधण्यास भाग पाडलंय.
2) अजित पवार की फडणवीस.. हात पुढे कुणी केला?
अशीच आणखी एक विसंगती आढळते, ती म्हणजे - अजित पवारांनी फडणवीसांना सत्तास्थापनेबाबत विचारलं की फडणवीसांनी विचारणा केली? हा प्रश्न पडण्याचं मूळही पवार-फडणवीसांच्या मुलाखतीत आहे.
अजित पवार स्वत: आधी आमच्याकडे आले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एवढंच नव्हे, तर फडणवीस पुढे म्हणाले, "आम्ही सत्तास्थापनेसाठी फक्त शिवसेनेसोबत प्रयत्न करत होतो. आमच्या मनात दुसऱ्यासोबत जाण्याचा विषय नव्हता. मात्र, या सगळ्या प्रयत्नांमध्ये अजित पवार आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की, आम्हाला काँग्रेससोबत जायचं नाही. हे तीन पक्षांचं ((सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी)सरकार चालू शकत नाही. असं आमचं सगळ्यांचं मत आहे.
"मी स्वत: पवारसाहेबांशी चर्चा केलीय. शिवाय आमच्या बहुतांश आमदारांचं मत असंय की, हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही आणि स्थिर सरकार असलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळे भाजपसोबत येण्यास तयार आहोत. आपण सत्ता स्थापन करून स्थिर सरकार देऊ," असंही अजितत पवारांनी आपल्याला सांगितल्याचा दावा फडणवीस करतात.
फडणवीसांच्या दाव्यानुसार अजित पवारांनीच सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला. मात्र शरद पवार सांगतात, फडणवीसांनीच अजित पवारांना चर्चेसाठी बोलावलं.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, "भाजपमधील एक वर्गाला वाटत होतं, की राष्ट्रवादीशी बोलावं. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मला विचारलं, की फडणवीस काही बोलायचं म्हणतात, तर मी जाऊ का? मी म्हटलं, राजकारणात संवाद ठेवला पाहिजे. त्यांना काही सांगायचं असेल, ते स्वीकारायचं की नाही, हा आपला अधिकार आहे. ऐकून न घेणं हे योग्य नाही. तू जाऊन ते काय म्हणतायत ते ऐक."
याच वेळी शरद पवार असेही म्हणाले की, "याच भेटीत फडणवीसांनी सरकार बनवायचं मांडलं असेल. त्यानंतर अजितसोबत भेट झाली, त्यात फडणवीसांशी झालेल्या चर्चेबद्दल सांगयचंय असं त्यांनी म्हटलं. मी म्हटलं, आपण नंतर बघूया. कारण त्या वाटेनं आपल्याला जायचंच नव्हतं.
"ज्यावेळी अजितने फडणवीसांशी बोलणं केलं, त्यावेळी अजितला असं सांगण्यात आलं, की आजच्या आज तुम्ही शपथ घेत असाल तर आम्ही हे करू, अन्यथा करणार नाही. त्यावेळी त्या मोमेंटला त्यांनी हो सांगितलं आणि शपथ घेतली," असं पवार म्हणतात.
म्हणजे, अजित पवार भाजपसोबत जायला उत्सुक होते, असं फडणवीस म्हणतात तर अजितवर दबाव आणण्यात आला, असा अर्थ शरद पवारांच्या बोलण्यातून निघू शकतो.
3) शरद पवारांचा दादांना आशीर्वाद होता की नव्हता?
अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतायत, हे शरद पवारांना माहीत होतं का, या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी सांगणं योग्य होणार नाही. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेच सांगू शकतात. चर्चेच्या काळात जेवढे आमदार अजित पवारांना भेटले, त्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं की, मी पवारसाहेबांशी चर्चा केलीय."
तसेच आगामी राजकीय भूकंपाबद्दल सूचक इशारा देताना फडणवीस म्हणाले, "यामध्ये बिहाइंड द सीन आणि बिटविन द लाइन्स कथा नक्कीच आहेत. त्या योग्ये वळी बाहेर येतील. सगळ्या गोष्टी आताच थोड्या बाहेर यायला हव्यात?"
मात्र, शरद पवारांनी मुलाखतीत सांगितलेला घटनाक्रम त्यांना शपथविधीबाबत काहीही माहीत नसल्याचं दाखवतो.
पवार म्हणतात, "सकाळी 6 वाजता मला फोन आला...तेव्हा विश्वासच बसेना. मी टीव्ही लावला तर सगळं दिसायला लागलं... लोकांचा असा समज होईल की, माझ्या संमतीनंच अजित पवारांनी शपथ घेतली. म्हणून मला महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता. म्हणून मी पहिला उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यांना विश्वास दिला की, आपल्याला ज्या रस्त्यानं जायचं नाही, त्यात तसूभरही बदल केला जाणार नाही. हे लोकांना सांगण्यासाठी आपण दोघांनी पत्रकार परिषद घ्यायला हवी. त्यातून माझा अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचा संदेश गेला."
4) फडणवीस-अजित पवार चर्चा नेमकी सुरू कधी झाली?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली हे निश्चित, पण ती कधी झाली, याला महत्त्व आहे. कारण शरद पवार मान्य करतात की त्यांनी सुरुवातीला भाजपसोबत चर्चा करायला अजित पवारांना हिरवा कंदील दिला होता, पण नंतर त्यांनी गांभीर्याने शिवसेनेकडे मोर्चा वळवला.
पण देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की राष्ट्रवादीची चर्चा शिवसेनेसोबत अखेरच्या टप्प्यात आलेली असताना अजित पवारांची भाजपसोबत चर्चा सुरू होती.
शरद पवार म्हणतात, "अजितची फडणवीसांशी भेट झाल्यानंतर त्यानं झालेल्या चर्चेबद्दल मला सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हटलं, आपण नंतर बघूया. कारण त्याचवेळी संजय राऊत स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही सोबत यायला तयार आहोत. मग भाजपपासून शिवसेना वेगळी होऊन सोबत येत असेल, तर महाराष्ट्रात वेगळी स्थिती निर्माण करू शकू."
शिवसेनेच्या स्पष्ट होकाराची तारीख नेमकी कळू शकत नसली, तरी एक गोष्ट निश्चित की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागणीनुसार शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची घटना घडली ती अरविंद सावंतांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्यानं. ही घटना काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी शिवसेनेच्या स्पष्ट होकाराची मानली जाते. म्हणजे, 11 नोव्हेंबर 2019. कारण याच दिवशी अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.
म्हणजेच, शरद पवारांच्या दाव्याचा तारखांशी मेळ घालायचा झाल्यास अजित पवारांची फडणवीसांसोबतची चर्चा 11 नोव्हेंबरपूर्वीपर्यंत झाली. आणि शरद पवारांना त्याची कल्पना होती, असं त्यांनी स्वतः मान्य केलंय.
मात्र देवेंद्र फडणवीस यांचा दावा शरद पवारांच्या दाव्याशी विसंगत ठरतो. कारण ते म्हणतात, "अजित पवारांनी सत्तास्थापनेसाठी आमच्याशी शपथविधीच्या (23 नोव्हेंबर) एक-दोन दिवस आधीच चर्चा केली. त्याआधी फारतर राष्ट्रवादीकडून काही संकेत मिळत होते, आमच्याकडून काही संकेत जात होते. किंवा पवारसाहेब आणि आमच्या नेतृत्वाच्या स्तरावर झाले असतील. पण काँक्रिट अजित पवार आमच्याकडे 23 नोव्हेंबरच्या एक-दोन दिवस आधी आले आणि सोबत येण्यास तयार असल्याचं सांगितलं."
त्यामुळं अजित पवार हे भाजपच्या कधी संपर्कात आले, याबद्दल देवेंद्र फडणवीस हे सांगतात तो घटनाक्रम आणि शरद पवार सांगतात तो घटनाक्रम विसंगत दिसून येतो. इथंही नेमकं कुणाचं खरं, असा सहाजिक प्रश्न इथंही उपस्थित होतो.
एक निश्चित आहे की अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)