You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उन्नाव : मैत्री, लग्न, बलात्कार आणि जाळून मारल्याची घटना- ग्राउंड रिपोर्ट
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, उत्तर प्रदेशच्या उन्नावहून, बीबीसी प्रतिनिधी
"आमच्या मागण्या मान्य होत नाही आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: येत नाहीत, तोपर्यंत मुलीचे अंत्यसंस्कार करणार नाही," अशी भूमिका उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा आणि काही मागण्या मान्य झाल्यामुळे आता मात्र पीडितेचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी तयार झाले आहेत. कुटुंबीयांनी तरुणीच्या मृतदेहाला शेजारच्या गावात आपल्या परंपरांनुसार दफन केलं आहे.
पीडित तरुणीचा शुक्रवारी (6 डिसेंबर) दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आगीत जवळपास 90 टक्के भाजलेल्या या तरुणीला आधी उन्नावहून लखनौ आणि नंतर दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं. मात्र या तरुणीनं 2 दिवसांत अखेरचा श्वास घेतला.
यापूर्वीच तरुणीच्या घरात शोकाचं वातावरण होतं, तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण गाव सुन्न झालंय. दुसरीकडे गावातल्या आरोपींचे नातेवाईक त्यांना निर्दोष म्हणत आहेत. गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
यादरम्यान या प्रकरणातील 5 आरोपींना सीजेएम कोर्टात दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पीडित तरुणानं उपचारादरम्यान उन्नावमधील न्यायालयात साक्ष दिली होती. यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती.
पीडितेचं घर
उन्नाव शहरापासून जवळपास 50 किमी अंतरावरील बिहार पोलीस स्टेशनअंतर्गत पीडितेचं गाव येतं. गावात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर पीडितेचं कच्च्या मातीचं घर आहे.
तरुणीचे वयस्कर वडील घराबाहेर उभे होते. ते नेहमी मुलीला स्टेशनपर्यंत सोडायला जात, पण गुरुवारी ती एकटीच गेली होती.
"कोर्ट किंवा इतर कामांसाठी ती एकटी किंवा भावासोबत बाहेर जात असे," असं पीडितेची वहिनी सांगते. पीडितेला 5 बहिणी आणि 2 भाऊ आहेत.
प्रेमविवाह आणि गँगरेप
मुलीची शेजारच्याच मुलाशी ओळख होती. त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता, पण नंतर त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं.
तरुणीनं या वर्षीच्या मार्चमध्ये तरुण आणि त्याच्या मित्राविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली होती. यांतील मुख्य आरोपीला अटक झाली आणि काही दिवसांनंतरच त्याची जामीनावर सुटका झाली.
"या दोघांनी लग्न कधी केलं, याची माहिती आम्हाला नव्हती. तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी इथं येऊन आमच्याशी भांडणं केली, आम्हाला मारहाण केली, तेव्हा या दोघांच्या लग्नाबद्दल आम्हाला कळलं. त्यानंतर मुलीनं सांगितलं, की त्या दोघांनी कोर्टात लग्न केलं आहे. पण आता तो तरुण हे लग्न मान्य करण्यास तयार नाहीये."
आरोपींच्या घरची परिस्थिती
तरुणीच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरच मुख्य आरोपी आणि या प्रकरणातील इतर आरोपींचं घर आहे.
एका मंदिराबाहेर अनेक महिला एकत्र आल्या होत्या आणि रडत होत्या. यांतील बहुतेक महिला या आरोपींच्या नात्यातील होत्या. या सगळ्या आरोपींना या प्रकरणात फसवण्यात आल्याचं या महिलांचं म्हणणं आहे.
मुख्य आरोपीच्या आईनं म्हटलं, "माझ्या मुलानं लग्नही केलं नव्हतं आणि तो अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेत सामील नव्हता."
मुख्य आरोपी पीडित तरुणीसोबत एक महिना रायबरेलीला राहिला होता, हा पीडितेचे कुटुंबीय आणि पोलिसांनी केलेला आरोप त्या फेटाळून लावतात.
या प्रकरणात एका महिलेचे पती आणि मुलाला अटक करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितलं, "पहाटे पोलीस आले आणि माझ्या पतीला आणि मुलाला घेऊन गेले. दुसऱ्या मुलांनाही त्यांनी सोबत नेलं. इतका मोठा गुन्हा करणारी व्यक्ती घरात आरामात झोपू शकते का, असा माझा प्रश्न आहे. काहीएक विचार न करता आमच्या मुलांना आरोपी बनवण्यात आलं आहे."
पीडित तरुणीनं मार्च महिन्यात जी FIR दाखल केली होती, त्यात मुख्य आरोपीसोबत या महिलेच्या मुलाचं नावही होतं.
असं असलं तरी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सत्य समोर येण्यासाठी CBI चौकशी करण्यात यावी, अशी आरोपींच्या कुटुंबीयांची मागणी आहे.
दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध
तरुणीला जाळण्याची घटना गुरुवार (5 डिसेंबर) सकाळची आहे. पीडित तरुणी रायबरेलीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे चालली होती. ही गाडी सकाळी 5 वाजता स्टेशनवर पोहोचते.
पीडितेच्या घरापासून स्टेशन जवळपास 2 किमी अंतरावर आहे आणि हा रस्ता गजबजलेला नसतो. यामुळेच जेव्हा या तरुणीला पेटवण्यात आलं, तेव्हा खूप लांबपर्यंत पळूनसुद्धा तिला मदत मिळाली नाही, असं गावातील राम किशोर सांगतात.
गावकऱ्यांच्या मते, "या दोन्ही कुटुंबीयांत दोन वर्षांपूर्वी चांगले संबंध होते. तसंच गावातल्या वजनदार अशा महिलेच्या कुटुंबीयांशीसुद्धा पीडितेच्या कुटुंबीयांचे संबंध चांगले होते. त्यांचं कुटुंब आम्हाला मदत करत असे आणि गरीब असल्याकारणानं आम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत असे, असं पीडितेचे वडील सांगतात. पण पीडित तरुणी आणि आरोपी तरुण यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्यानंतर या कुटुंबीयांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण झाली."
"आम्हाला अनेकदा धमकावण्यात आलं. माझ्या घरी येऊन आम्हाला मारहाण करण्यात आली आणि गाव सोडण्याची धमकी देण्यात आली. मी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली, पण आमचं कुणीचं ऐकून घेतलं नाही," पीडितेचे वडील सांगतात.
बरेच प्रश्न अनुत्तरित
गावातील लोक या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अटक केलेल्या एकाही आरोपीवर यापूर्वी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झालेली नाही. पोलिसही या गोष्टीला दुजोरा दिसतात. इतकंच नाही तर घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या घरी धडक दिली, तेव्हा सगळेच घरी होते.
गावातील ज्येष्ठ नागरिक सीताराम सांगतात, "या मुलांना आम्ही लहानपणापासून ओळखतो. गावात कुणालाही त्रास होईल, असं काही कधी या मुलांनी केलं नाही. त्यामुळे इतका वाईट गुन्हा त्यांनी कसा केला, ते समजत नाही. आमच्या गावात अशी घटना कधीच झाला नाही. तसंच एखाद्याला जिवंत जाळण्यासारखा मोठा गुन्हा आमच्या गावातील कुणी करेल, असं वाटत नाही."
उन्नावच्या या घटनेचा सुरुवातीपासून तपास करणारे पोलीस अधिकारीही गावकऱ्यांच्या मताशी सहमती दर्शवतात. पण, अधिकृतरित्या काहीही बोलण्यास ते तयार नाहीत. इतर काही लोकांप्रमाणेच मीडियासुद्धा पीडितेच्या कुटुंबाविषयी अधिक जिव्हाळा दाखवत आहे, असंही काही गावकऱ्यांना वाटतं.
घटनेच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे.
पोलीस महासंचालक प्रवीण कुमार यांनी म्हटलं, "पीडितेच्या साक्षीनंतर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सगळे पुरावे तपासले जात आहेत. खऱ्या अर्थानं दोषी कोण आहेत, हे शोधणं आमची प्राथमिकता आहे. तसचं दोषींना कठोर शिक्षा देणंही आमची प्राथमिकता आहे."
सध्यातरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण, गावातील दोन्ही कुटुंब आपलीच असल्याकारणाने गावातील लोकांमध्ये दु:खाचं वातावरण आहे.
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)