Girl Child: जमिनीखाली मडक्यात पुरलेली नवजात मुलगी आता झाली ठणठणीत

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

प्रसूतीवेळेआधीच जन्माला आलेली मात्र थडग्यात एका मातीच्या भांड्यात सापडलेली चिमुरडी आता सुखरुप आहे.

या मुलीला ऑक्टोबर महिन्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा तिची स्थिती अतिशय गंभीर होती. तिला रक्तदोषाचा आजार होता. तिच्या प्लेटलेटस अतिशय कमी होत्या.

आता तिचं वजन वाढत असून, तिचा श्वासोच्छावासही सुरळीतपणे सुरू आहे असं तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर रवी खन्ना यांनी सांगितलं.

या मुलीचे पालक कोण हे अद्यापही स्पष्ट झालं नसून, ठराविक वेळेची पूर्तता केल्यानंतर ही मुलगी एखाद्या जोडप्याला दत्तक घेता येईल.

सध्या ही मुलगी उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सामाजिक कल्याण खात्याच्या अधिकाऱ्याचे तिची देखभाल करत आहेत.

एका गावकऱ्याला स्वत:ची मुलगी दफन करत असताना, ही मुलगी अचानक दिसली. हिंदू संस्कृतीनुसार, मृतदेह जाळून अंत्यसंस्कार केले जातात मात्र लहान मुलांचा मृत्यू झाल्यास त्यांचं दफन केलं जातं.

शेतकऱ्याने 90 सेंटीमीटर (3 फूट) खणलं असता, त्याच्या फावड्याला वस्तू लागल्याचं जाणवलं. ते एक मातीचं भांडं होतं. फावड्याच्या धक्क्याने ते भांडं फुटलं आणि आतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याने ते भांडं जमिनीवर आणलं तेव्हा त्यातून या बाळाला बाहेर काढण्यात आलं.

त्या बाळाला जवळच्या हॉस्पिटलात नेण्यात आलं मात्र दोन दिवसांनंतर त्या बाळाला डॉ. खन्ना यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणी अत्याधुनिक उपचार आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

या बाळाचा जन्म प्रसूतीच्या तारखेच्या आधी झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 30व्या आठवड्यातच तिचा जन्म झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तेव्हा तिच्या शरीरावर सुरकुत्या होत्या. तिच्या शरीराचं तापमानही कमी झालं होतं. तिच्या शरीरातली साखरेची पातळीही कमी झाली होती असं डॉक्टरांनी सांगितलं.

मंगळवारी आम्हा या बाळाला जिल्हा हॉस्पिटल अधिकाऱ्यांकडे सोपवलं. तिचं वजन 2.57 किलो एवढं होतं. बाळ आता बाटलीने दूध पिऊ लागलं आहे. बाळ आता निरोगी असून काळजीचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं.

हे बाळ किती कालावधासाठी जमिनीखाली होतं हे कळू शकलं नाही. हे बाळ जिवंत कसं राहिलं याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं आहे.

या बाळाला तीन ते चार दिवसांपूर्वी जमिनीखाली गाडण्यात आलं असावं असं डॉ. खन्ना यांनी सांगितलं. बाळाचा जन्म होतो तेव्हा त्यांचं पोट, मांड्या, मान इथे काही प्रमाणात चरबी असते. त्या बळावर ते काही काळ जिवंत राहू शकतात असं डॉक्टर म्हणाले.

मात्र काही तज्ज्ञांच्या मते या बाळाला तीन ते चार तासांपूर्वी पुरण्यात आलं असावं. या बाळाची सुटका झाली नसती तर ते आणखी जेमतेम तासभर तग धरू शकलं असतं असं काही तज्ज्ञांना वाटतं.

मातीच्या भांड्याला असलेल्या छिद्रामुळे त्या बाळाला ऑक्सिजनचा, हवेचा पुरवठा झाला असावा असं काहींना वाटतं. हे भांडं घट्ट मातीचं नव्हतं यामुळे बाळाला श्वासोच्छावासाठी वाव मिळाला.

ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला. या बाळाचे पालक कोण याचा शोध त्यांनी सुरू केला आहे.

हे बाळ आणि हे प्रकरण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीरपणे समोर आल्यानंतरही कोणीच या बाळाची जबाबदारी घ्यायला पुढे आलं नाही.

जिवंत बाळाला पुरण्याचं कारण काय यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही शक्यता वर्तवली नाही मात्र भारतात लिंग गुणोत्तर विषम प्रमाण आहे.

महिलांना, मुलींना सामाजिकदृष्या भेदभावाला सामोरं जावं लागतं. मुलींकडे, विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बळ समाजात आर्थिक बोजा म्हणून पाहिलं जातं.

नकोशा मुलींचे गर्भ बेकायदेशीर लिंगनिश्चिती करणाऱ्या क्लिनिक्सच्या माध्यमातून पाडले जातात. मुलगी जन्माला आल्याने त्यांना मारण्याचे प्रकार भारतात नवीन नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)