सुदानमधल्या कंपनीत स्फोट, मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश

सुदानची राजधानी खार्तुममध्ये एका सिरॅमिक फॅक्टरीमध्ये झालेल्या एलपीजी सिलेंडरच्या स्फोटात किमान 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान 130 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या कंपनीत मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. पण या स्फोटात नेमके किती भारतीय मारले गेले आहेत, याचा नेमका आकडा उपलब्ध झालेला नाही.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेविषयी ट्वीट करताना म्हटलं, "काही भारतीय कामगार मारले गेल्याचं आम्हाला समजलंय. आम्हाला या घटनेचं दुःख आहे. याबद्दल आम्ही अधिक माहिती घेत आहोत."

जयशंकर यांनी म्हटलं, "मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात सुमारे 60 भारतीय कामगार काम करत होते. यापैकी 53 जण त्या घटनेच्या वेळी कारखाना किंवा परिसरात उपस्थित होते."

जखमी कामगारांना अल्-अमल हॉस्पिटल, ओमदुरमन टीचिंग हॉस्पिटल आणि इब्राहिम मलिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहितीदेखील परराष्ट्र्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलीये.

भारतीय दूतावासाचे अधिकारी कारखान्याच्या प्रशासनाच्या संपर्कात आहेत. दूतावासाचे अधिकारी मृतांची ओळख लवकरात लवकर पटवण्यासाठी सुदानच्या उच्चाधिकाऱ्यांच्यासोबत काम करत असल्याचंही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आहे.

भारतीय राजदूतांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलंय.

खार्तुममधल्या भारतीय दूतावासाने वेबसाईटवरून या दुर्घटनेविषयी माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार बेपत्ता लोकांपैकी काहींचा कदाचित मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे.

दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 16 भारतीय बेपत्ता आहेत तर 7 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. यापैकी 3 जण आयसीयूमध्ये आहेत.

या कंपनीत काम करणारे 34 भारतीय सुरक्षित असल्याचंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)