#MeToo : खासदाराच्या हस्तमैथुनाच्या कथित फोटोमुळं ट्युनिशियात आंदोलन

    • Author, राणा जावाद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, ट्युनिस

शाळेच्या बाहेर हस्तमैथुन करणाऱ्या व्यक्तीच्या कथित फोटोमुळं सध्या ट्युनिशियात #MeToo चळवळ सुरू झालीये. अनेक महिला पुढे येऊन आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक गैरवर्तन किंवा शोषणाच्या घटना उघडपणे सांगू लागल्या आहेत.

#EnaZeda असा हॅशटॅग वापरून ट्युनिशियातल्या महिला आपल्यावरील अन्याय व्यक्त करत आहेत. 'Ena Zeda' हा ट्युनिशियन अरेबिक शब्द. याचा अर्थ 'Me Too' असाच होतो.

शाळेच्या बाहेर हस्तमैथुन करण्याचा आरोप ज्या व्यक्तीवर करण्यात आला आहे, ती व्यक्ती म्हणजे नुकतेच ट्युनिशियाच्या संसदेत निवडून गेलेले खासदार झुव्हेर मकलॉफ.

मकलॉफ यांनी शाळेबाहेर हस्तमैथुनाचा आरोप फेटाळला आहे. आपल्याला मधुमेह असल्यानं बाटलीत लघवी करत होतो, असा दावा मकलॉफ यांनी केलाय.

या कथित घटनेनंतर #EnaZeda असं नाव असलेल्या टी-शर्ट्स परिधान करून मोठ्या संख्येनं महिला ट्युनिशियाच्या संसदेबाहेर जमा झाल्या होत्या. झुव्हेर मकलॉफ यांची चौकशी व्हावी, अशी मागणी या महिलांनी केली. न्यायाधीश या प्रकरणाचा आढावा घेत आहेत.

झुव्हेर मकलॉफ यांचा फोटो दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये काढला गेला होता. ज्या विद्यार्थिनीनं हा फोटो काढला, तिनं मॅकलॉफ यांनी आपल्याला त्रास दिल्याचाही आरोप केलाय.

'लैंगिक शोषण आणि छळ सर्रास होतात'

या घटनेनंतर अस्वात निसा या बिगर शासकीय संघटनेनं '#EnaZeda' नावाचं फेसबुकवर क्लोज्ड ग्रुप सुरू केलं आहे. ज्या महिला लैंगिक गैरवर्तन, शोषण, छळ, अत्याचाराळा बळी पडल्या आहेत, त्या या ग्रुपवर उघडपणे व्यक्त होऊ लागल्यात. त्यांना हा ग्रुप व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा वाटू लागला आहे. त्यांचे अनुभव सांगू लागल्या आहेत. या ग्रुपवरील महिलांचे अनुभव वाचून तो ग्रुप चालविणाऱ्यांसाठी एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यांप्रमाणे आहेत.

"लैंगिक शोषण आणि छळ या गोष्टी सर्रास झाल्या आहेत. काही कुटुंबं हे लपवून ठेवतात. काही कुटुंबांना तर अशा प्रकारांशी कसा लढा द्यायचा, हेच माहीत नसतं," असं रानिया सईद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

रानिया सईद या '#EnaZeda' या फेसबुक ग्रुपच्या मॉडरेटर आहेत.

या फेसबुक ग्रुपमध्ये आजच्या घडीला 25 हजार सदस्य आहेत. शिवाय, हजारो महिलांना यात सहभागी व्हायचं आहे.

बलात्कार, वैवाहिक बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांची माहिती देणार्‍या साक्षीदारांचा महापूर आहे. सैन्य, पोलीस, विद्यापीठं, शाळा, माध्यमं, नातेवाईकांविरोधात आरोप करणारे अनेक अनुभव या ग्रुपवर शेअर केले गेलेत. केवळ महिलांनीच नव्हे, तर पुरूषांनीही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.

लहान मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत कुटुंब दुर्लक्ष करतात याचं अस्वात निसा संघटनेला आश्चर्य वाटतंय.

फेसबुक ग्रुप स्थापन केल्यानंतर सुरुवातीला खूप साऱ्या घटना या काका, भाऊ, शेजारी यांच्याशी संबंधित होत्या, असं सईद सांगतात.

'माझ्या आईनंही मदत केली नाही'

'अस्वात निसा'नं माझा एका 36 वर्षीय महिलेशी संपर्क करून दिला. 14 वर्षांची असताना तिच्या काकानेच तिचा विनयभंग केला होता.

वडिलांनी मारल्यानं ती उन्हाळ्याच्या सुट्टीत काका-काकूंकडे राहायला गेली होती.

"त्यांनी माझं चुंबन घेण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर माझ्या छातीला हात लावला," असं ती सांगते.

ती महिला पुढे सांगते, "हे नक्की काय सुरु होतं, तेच मला समजत नव्हतं. कारण मी अशा विनयभंगाला कधीच सामोरी गेली नव्हती किंवा मला याबद्दल कुणी कधी काही सांगितलंही नव्हतं."

हे असं काही आठवडे सुरुच होतं.

ती सांगत होती, "एका रात्री त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी मोठ्यानं ओरडू लागले. त्यामुळं ते घाबरले. कारण बाजूच्या खोलीत काकू झोपली होती."

तिनं हे नातेवाईकांना सांगितलं. मात्र, त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. काकांनी आपुलकीनं हे केलं असावं, असं म्हणत नातेवाईकांनी तिचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं नाही.

"मीही यातून गेलीये, असं माझ्या आईनंच मला सांगितलं. मला नाही वाटत, यात काही वाईट आहे."

याविरोधात आपण कधीही कुणाकडे तक्रार करू शकलो नाही, असंही आईनं सांगितल्याचं ती सांगते.

"मी त्याच्यावर आरोप केले असते. तो माझा अधिकार होता, मात्र त्यानंतर मला नातेवाईकांपासून दूर जावं लागलं असतं. मला ते नको होतं," असं ती सांगते.

कुटुंब आणि संस्कृती

ट्युनिशियन खासदारांनी 2017 साली कुठल्याही हिंसेविरोधात महिलांचं संरक्षण करणारं एक विधेयक आणलं.

या विधेयकाचं केवळ ट्युनिशियातच नव्हे, तर जगभरात कौतुक झालं. कारण यातील तरतुदीच तशा होत्या. कुठल्याही अत्याचार पीडित महिलेनं एकदा तक्रार केली आणि त्यानंतर तिचं संबंधित तक्रारीबाबत मन बदललं, तरी त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं या विधेयकात म्हटलं होतं.

वकील असलेल्या फडुआ ब्रेहम यांनी महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे अनेक खटले कोर्टात लढवले आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, की हे विधेयक सध्या अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे.

ब्रेहम म्हणतात, कुठल्याही पीडित महिलेसाठी सर्वप्रथम तक्रार नोंदवतानाच अडचणींना सामोरं जावं लागतं. नातेवाईक आणि अधिकारी दोन्ही घटक पीडितेला तक्रार नोंदवण्यास मनाई करण्याचा प्रयत्न करतात.

आरोग्य यंत्रणा देखील पीडितांना अपमानित करते. कारण बलात्काराच्या घटनांना सामोरे गेलेल्यांसाठी हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष नसतात.

बलात्कार पीडितांना न्याय मिळण्यासाठी मानसिक आणि आर्थिक साधनांची आवश्यकता आहे. हे सर्वांसाठी उपलब्ध नाही, अशी खंत ब्रेहम व्यक्त करतात.

#EnaZeda मुळं महिलांना आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व्यासपीठ मिळालंय. त्या लैंगिक अत्याचार आणि हिंसेबाबत उघडपणे बोलत आहेत. हे सर्व ट्युनिशियात कधीच उघडपणे स्वीकारलं गेलं नाही.

या सगळ्यातून आणखी एका गोष्टीचीही आशा व्यक्त केली जातीये, की लैंगिक शिक्षणासाठी घरातून आणि शाळेतून प्रोत्साहन दिलं जाईल.

'#EnaZeda' फेसबुक ग्रुपवरील एका वकिलानं अत्याचार पीडित महिलांसाठी मोफत खटला लढवण्याची तयारी दर्शवलीये.

"काही पालकांनी मुलांसाठी शारीरिक अंगांबद्दल माहिती देणारी अरबी आणि फ्रेंच भाषेतील पुस्तके शेअर केल्याबद्दल आमचे आभार मानलेत. आम्ही आता अधिक जागरूक असल्याचंही सांगितलं," असं सईद म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)