राहुल बजाज यांच्यावर मोदी सरकारच्या मंत्र्यांचा पलटवार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. राहुल बजाज यांच्यावर मोदी सरकारच्या मंत्र्यांचा पलटवार

मोदी सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं वक्तव्य उद्योगपती राहुल बजाज यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीये.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं, "राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. प्रश्न आणि टीका ऐकून घेतली जात आहे, तिला उत्तर दिलं जात आहे. आपल्या वैयक्तिक आकलनावरून मतं बनवून देशहिताला बाधा आणण्यापेक्षा प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न करणं कधीही चांगलं. "

तर केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करून म्हटलं, की लोकांना मत व्यक्त करण्याची भीती वाटत आहे, या राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं मला वाटत नाही."

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं, "राहुल बजाज अमित शाह यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करू शकतात. तसंच इतरांनाही त्यासाठी प्रेरित करू शकतात, याचा अर्थ देशात आजही लोकशाही मूल्य जिवंत आहेत."

2. सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : बच्चू कडू

सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

त्यांनी म्हटलं, "मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. सिंचनाची अवस्था विदर्भ-मराठवाड्यात खराबच आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान 8 ते 9 प्रकल्पाची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) भेटलेली नाही."

"पुढचे 6 महिने मंत्री, आमदार आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या," अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली आहे.

"सभागृहात बोलताना बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळतो. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि आम्ही प्रश्न मांडायला लागतो, तेव्हा वेळ कमी का होतो?" असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचं बातमीत म्हटलं आहे.

3. हैदराबाद बलात्कार प्रकरण: सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचे आदेश तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या प्रकरणाचा तपास त्वरित पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

लवकर तपास पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार येईल, असं मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

चार दिवसांपूर्वी हैदराबामध्ये डॉक्टर तरुणीला बलात्कारानंतर जाळल्याची घटना समोर आली होती. तिचा मृतदेह गुरुवारी (28 नोव्हेंबर) एका पुलाखाली आढळून आला होता.

4. शेतकऱ्याची स्पष्ट व्याख्या सरकार दरबारी नाही?

शेतकरी म्हणजे कोण, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना देता आलं नसल्याची बातमी द हिंदू या वर्तमानपत्रानं दिली आहे.

शेतकरी कुणाला म्हणायचं, देशभरातील शेतकरी कुटुंबाची संख्या किती, असा प्रश्न राज्यसभेचे खासदार अजय प्रताप सिंग यांना विचारला होता.

याला उत्तर देताना तोमर यांनी म्हटलं की, "शेतकरी हा राज्य सरकारच्या अखत्यारित येणारा विषय आहे." यानंतर त्यांनी शेतजमिनीची मालकी असलेल्या कुटुंबाची माहिती सादर केली.

5. महिलांशी कसं वागावं, हे पुरुषांना शिकवावं लागेल- सरसंघचालक

महिलांशी कसं वर्तन करावं, हे पुरुषांना शिकवावं लागेल, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. NDTV इंडियानं ही बातमी दिली आहे.

"महिला सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सगळं काही सरकारवर सोडता येणार नाही. त्यामुळे स्त्रीच्या सन्मानाची शिकवण घरापासून सुरु करायला हवी," असं भागवत यांनी म्हटलं.

दिल्लीतील लाल किल्ल्यात आयोजित 'गीता प्रेरणा महोत्सव 2019' या कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)