उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर घेणार शपथ

महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला अनुमोदन दिलं आहे.

हॉटेल ट्रायडेंटमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचा ठराव संमत करण्यात आला आणि उद्धव यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं सांगण्यात आलं.

तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या तडकाफडकी शपथविधीनंतर आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे.

अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे, त्यामुळे आमच्याकडे पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे आम्ही सरकार पुढे चालवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने उद्याच (बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी) महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश दिल्याच्या काही तासांनी हे दोन्ही राजीनामे आले आहेत.

या राजीनाम्याभोवतीचे सर्व LIVE UPDATES तुम्ही इथे वाचू शकता.

पाहा ताजे अपडेट्स-

रात्री 11 वाजता: 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.40ला होणार शपथविधी

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंना शपथ देण्याचं निमंत्रण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ 28 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.40 वाजता शिवाजी पार्कवर देण्यात येईल, असं राजभवनाने जारी केलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे.

रात्री 10.55 वाजता:28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंचा शपथविधी- जयंत पाटील

उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्कात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

अन्य मंत्र्यांच्या शपथविधीसंबंधी नंतर निश्चित केलं जाईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

अजित पवार परत येणार का, या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटलं, की अजित पवार हे अजूनही पक्षाचे नेते आहेत.

रात्री 10. 50 वाजता: राज्यपालांना भेटून केला सत्तास्थापनेचा दावा : बाळासाहेब थोरात

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं असं विनंती करणार पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतील. त्यासंबंधीची अधिकृत घोषणा होईल तेव्हा सर्व काही निश्चित होईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

रात्री 10.30 वाजता: देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विरोधात बसू: आशिष शेलार

"आज गरवारे क्लब इथे भाजपच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत विरोधात बसण्याचा आमचा निर्णय पक्का झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय सगळ्यांनी एकमताने घेतला," असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं.

"शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत महाविकास आघाडी स्थापन केल्याचं कळलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांची सर्वानुमते निवड केल्याचं आम्हाला कळलं. आम्ही महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो," असंही शेलार यांनी म्हटलं.

रात्री 8.25 वाजता: अजित पवारांना परत आणूयात : छगन भुजबळ

अजित पवार यांची उपस्थिती नाही, हे आज खटकते आहे. ही आघाडी मजबूत करण्यासाठी त्यांची गरज आहे. माझी विनंती आहे की सगळ्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आणण्याची जबाबदारी घ्यावी, असं मत छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

'सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते,' ही म्हण आपण अजित दादांच्या बाबतीत खरी ठरवूयात, असं आवाहन छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केलं.

रात्री 8.15 वाजता: ज्यांना 30 वर्षे विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की मला या पदावर पोहोचायचं होतं. पण माझ्या कुटुंबानं लोकांसाठी काम करण्याचा कायम संदेश दिला, त्यासाठीच मी ही जबाबदारी स्वीकारली. आज सगळ्यांनी मला साथ दिली यासाठी सगळ्यांचे आभार मानताना सर्व प्रथम मी सोनियाजींचे आभार मानतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचं स्पष्ट केलं.

"ज्यांच्यासोबत 30 वर्षे राजकीय मैत्री होती, त्यांनी मला साथ दिली नाही. पण या काळात ज्यांना राजकीय विरोध केला ते लोक आज माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. मातोश्रीवरून आम्ही बाहेर पडलो असा माझ्यावर आरोप झाला. पण, मातोश्रीवर येऊन जे खोटं बोलले आणि मातोश्रीचा मान ठेवला नाही अशा लोकांसोबत न जाण्यासाठी मी मातोश्रीवरून बाहेर पडलो," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.

रात्री 8 वाजता: बाळासाहेबांचं स्मरण करून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा : शरद पवार

1 डिसेंबरला शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधीचा सोहळा पार पडेल. आज बाळासाहेब असते तर आम्हा लोकांना खूप आनंद झाला असता, असं म्हणत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.

"मी, बाळासाहेब, जॉर्ज फर्नांडीस आम्ही एकत्र खूप काम केलं होतं. मी त्यांच्या घरी गेलो की उद्धव ठाकरे यांच्या आई म्हणजे मीनाताई या आमच्यासाठी चांगल्या खाण्याची सोय करत असत. त्यांना आम्ही 'माँ' म्हणायचो. ठाकरे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते. बाळासाहेबांनी आपल्या राज्याला चांगलं नेतृत्व दिलं, आमचे स्नेही बाळासाहेब आज हयात नाहीत. पण अंतःकरणापासून त्यांचं स्मरण करतो आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो," असं शरद पवार यांनी म्हटलं.

संध्याकाळी 7.50 वाजता: मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव

शरद पवार यांनी आदेशवजा सूचना केली की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्हावं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

या प्रस्तावाला काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं.

संध्याकाळी 7.25 वाजता: महाविकास आघाडीचा ठराव संमत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन करत असल्याचा ठराव मांडला. याला काँग्रेसच्या नितिन राऊत यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.

संध्याकाळी 6.55 वाजता: सगळं ठरल्याप्रमाणे झालं - संजय राऊत

हे सगळं ठरल्याप्रमाणे झालं आहे. भाजपला शरद पवार कळण्यासाठी 100 वर्षं जातील. या सगळ्याचं दिग्दर्शन कोणाचं होतं, हे लवकरच कळेल.

आम्ही सगळ्यांनी मिळून याची स्क्रिप्ट लिहीली होती. पण, याचे मुख्य दिग्दर्शक कोण होते, हे लवकरच उघड होईल, असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.

संध्याकाळी 6.45 वाजता: अजित पवार बैठकीला येणार नाहीत - जयंत पाटील

आज आघाडीचा नेता कोण असेल हेच ठरवलं जाईल. अजित पवार या बैठकीला येणार नाहीत. माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांची मनधरणी करण्यासाठी मी थोड्या वेळाने पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

संध्यकाळी 5.50 वाजता: उद्या सकाळी 8 वाजता शपथविधीला सुरुवात

उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 288 आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल, असं हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकाळी आठ वाजता विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे.

संध्याकाळी 5.40 वाजता: उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल - नवाब मलिक

"सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याचं सिद्ध झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच त्यांनी हा शपथविधी केला होता. हा विजय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विजय आहे.

"आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अपक्षांची बैठक होईल. त्यात नेत्याची निवड होईल. उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील," राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक.

संध्याकाळी 5.25 वाजता: माझा राजीनामा सार्थकी लागला - अरविंद सावंत

"राज्यपाल यांच्याकडे जाऊन आम्ही सरकार स्थापनेची मागणी करू आणि लवकरच आमचे मुख्यमंत्री शपथविधी घेतील. माझा राजीनामा सार्थकी लागला याचा मला अभिमान वाटतो," असं शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची NDAमधून बाहेर पडण्याची अट मान्य करत शिवसेनेचे खासदार असलेले सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

संध्याकाळी 5.20 वाजता: सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला दाद द्यायला हवी - कपिल सिब्बल

संविधानाचं रक्षण करण्याऐवजी केंद्रातलं सरकार संविधानाला धोका निर्माण करत आहे. याला पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जबाबदार आहेत. राज्यपाल हे गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालत होते. म्हणून तर पहाटे शपथविधी झाला. असं करून त्यांनी संविधानाचा अपमान केला.

भाजपला महाराष्ट्रात कर्नाटकसारखी परिस्थिती निर्माण करायची होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने आजचा निकाल देऊन यांचे मनसुबे उधळले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला दाद द्यायला हवी, असं शिवसेनेचे बाजू कोर्टात मांडणारे वकील कपिल सिब्बल म्हणाले.

या सर्वच घडामोडींवर बीबीसीचे कार्टुनिस्ट कीर्तिश यांचा आजचं कार्टून पाहू या -

संध्याकाळी 5.30 वाजता: कालिदार कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष

"होय, माझी हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे. मी आता राजभवनात जाऊन अध्यक्षपदाची शपथ घेणार आहे," असं भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं.

दुपारी 4.30 वाजता: शपथविधी लवकर घ्यावा - पृथ्वीराज चव्हाण

आम्ही काल राज्यपालांकडे मागणी केल्याप्रमाणे महाआघाडीला सत्ता स्थापनेसाठी त्वरित बोलावलं जावं. तसंच, शपथविधी कार्यक्रम लवकर केला जावा ही आमची मागणी आहे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

दुपारी 4.20 वाजता: एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

आज जे घडलं ते होणारच होतं. म्हणूनच, कालच आम्ही 162 आमदारांच्या सह्यांच निवदेन राज्यपालांना दिलं होतं. तसंच सध्याचं सरकार अल्पमतात असून आम्हाला सरकार स्थापनेची संधी द्यावी ही मागणी केली होती. संख्याबळ अपुरं असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, असं शिवसेने विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे म्हणाले.

दुपारी 4.10 वाजता: महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे - वेणुगोपाल

"महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वात नवं सरकार लवकरच स्थापन होईल. आजची घटना ही संविधान आणि न्यायव्यवस्थेचा विजय आहे. उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ नेता म्हणून लवकरच निवड केली जाईल," असं काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांनी सांगितलं.

दुपारी 3.30 वाजता: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ते आमच्यासोबत आले. आज कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं. त्यामुळे आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही, त्यामुळे आपण राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार आहोत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

या मोठ्या घडामोडीचे सर्व LIVE UPDATES तुम्ही इथे वाचू शकता

दुपारी 3.15 वाजता: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा

पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार अस्तित्वात येईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांशी आमचा संपर्क आणि संवाद झालेला आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे. ते आमच्यासोबत आहेत. सर्वकाही ठीक आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दुपारी 2.00 वाजता- मुख्यमंत्री घेणार पत्रकार परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3.30 सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.

दुपारी 1.40 वाजता: महाविकास आघाडीची 5 वाजता बैठक

महाविकास आघाडीचा नेते निवडण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची संयुक्त बैठक संध्याकाळी पाच वाजता हॉटेल ट्रायडेंटमध्ये बोलवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट केली आहे.

दुपारी 12.40 वाजता: अजित पवार म्हणाले...

"राज्यघटनेनं आजच्या भारतीय लोकशाहीला अर्थ आणि आयाम प्राप्त करून दिला आहे. आपलं भविष्यही राज्यघटनाच ठरवेल," असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दुपारी 12.30 वाजता: बाळासाहेब थोरात काँग्रेसचे विधिमंडळ नेते

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या बैठकीत घोषणा की काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.

दुपारी 12.00 वाजता: जयंत पवारच राष्ट्रवादीचे गटनेते - आव्हाड

''स्पीकर कार्यालयाला जे माहिती देतील त्यांनाच व्हिप काढण्याचा अधिकार. जयंत पवारच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. जयंत पाटील यांना व्हिप काढण्याचे अधिकार. भाजप म्हणजे गोबेल्सची पोरं आहेत. सेक्रेटरिएटचा सेक्रेटरी कायद्याला बाजू ठेऊ शकत नाही. रडायचं असेल तर कितीही रडू शकता," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

सकाळी 11.40 वाजता: जवळपास 170 आमदार आमच्याकडे आहेत - एकनाथ शिंदे

"सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. पूर्वीचं सरकार चोरीछुपे, रात्रीचं सरकार आहे. बाळासाहेबांचं स्वप्न साकार होईल. 162 पेक्षा, जवळपास 170 आमदार आमच्याकडे आहेत. राज्याला स्थिर सरकार मिळेल," असं शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

निकालातले पाच महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांचा अर्थ -

यापूर्वी राज्यपालांनी फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्यांच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

त्यावर दोन दिवस झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आज हा निर्णय दिला.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने सोमवारी संध्याकाळी 162 आमदारांची ओळख परेड मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये घेतली. तसंच त्यापूर्वी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जवळजवळ सर्व सह्या असलेलं पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

सकाळी 11.30 वाजता: शरद पवारांचं ट्वीट

"राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

सकाळी 11.20 वाजता: बहुमत सिद्ध करून दाखवू - चंद्रकांत पाटील

"उद्या विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू," असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

सकाळी 11.15 वाजता: फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - काँग्रेस

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. संविधान दिनी, सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मूल्यांचं रक्षण करणारा निर्णय दिला आहे. सत्तेसाठी भाजपची अगतिकता उद्यापर्यंत संपुष्टात येईल. बेकायदेशीर पद्धतीने मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा," असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सकाळी 11 वाजता: सत्य मेव जयते - शिवसेना

"राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून याचिका दाखल केली होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देऊ इच्छितो. या निर्णयाबाबत समाधानी आहोत. संविधान दिनी सरकारस्थापनेसंदर्भात योग्य निर्णय," असं शिवसेना नेते गजाजन कीर्तीकर यांनी सांगितलं.

"सत्य मेव जयते" असं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

"प्रोटेम स्पीकरची नियुक्ती व्हावी. नवनियुक्त आमदारांना शपथ देण्यात यावी. गुप्त मतदान पद्धतीने होऊ नये. लोकशाही तत्त्वांची पायमल्ली होऊ नये. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, सामान्यांना न्याय मिळावा यासाठी आमची विनंती होती. संविधान दिनी, लोकशाही मूल्यांचा विजय झाला आहे. उद्या जल्लोष असेल, 162चा आकडा उद्या वाढलेला असेल," असं शिवसेना खासदार अनिल देसाई म्हणाले.

"घोडेबाजार रोखण्यादृष्टीने न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. लोकशाहीची बूज राखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. प्रोटेम स्पीकरला घटनात्मक चौकटीनुसार कार्यवाही करावी लागेल. विधानसभा निवडणुकांची अध्यक्ष गुप्त मतदान पद्धतीने निवडला गेला असता तर विश्वासदर्शक ठरावाची प्रणाली बदलली जाऊ शकत होती," असं खासदार अनिल परब यांनी सांगितलं.

सकाळी 10.40: सुप्रीम कोर्टाचा आदेश - उद्या विधानसभेत विश्वासदर्शकप्रस्ताव घ्या

न्या. रमण्णा यांनी कडून निकालाचं वाचन सुरू.

  • लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक. नागरिकांना स्थिर सरकार मिळणं हा अधिकार. याचिकेच्या सुनावणीदरम्यान अनेक प्रश्न उपस्थित झाले. 
  • आपण उत्तराखंड, बोम्मई, जगदंबिका पाल खटल्यांचा अभ्यास केला आहे. घोडेबाजार रोखण्यासाठी कारवाई आवश्यक. 
  • 27 नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव व्हावा, प्रोटेम स्पीकरची नियुक्ती व्हावी, असे निर्देश.
  • गुप्त मतदान व्हायला नको. सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण आणि प्रसारण व्हावं. उद्यापर्यंत सर्व आमदारांचा शपथविधी व्हावा आणि मग विश्वासदर्शक ठराव
  • उद्या बुधवारी पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी व्हावेत, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची गरज नाही. प्रोटेम स्पीकर आमदारांना शपथ देतील.
  • सदनातील सगळ्यात वरिष्ठ व्यक्तीला प्रोटेम स्पीकर म्हणून निवडलं जातं. सभागृहाचा सर्वाधिक काळ सदस्य राहिलेल्या व्यक्तीला प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं जातं.

सकाळी 10.30: सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू

सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू. फडणवीस-अजित पवार सरकारचा निर्णय थोड्याच वेळात येणार.

सकाळी 9.50: विश्वासदर्शक ठरावापासून दूर का पळतंय?-संजय राऊत

"भाजप बहुमत आहे म्हणतंय मग विश्वासदर्शक ठरावापासून दूर का पळतंय? आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला संधी मिळायला हवी. भाजपने लपूनछपून शपथविधी उरकला. आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास सर्व आमदार पोहोचलो. आमचा आकडा 162 आहे," असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

"काल तीन पक्षांनी मिळून आमच्याकडे किती आमदार आहेत ते सिद्ध केलं. कोण काय मिळेल याकडे लक्ष देत नाही. अदृश्य होते असं म्हणतील. 40 म्हणतील. लोक काहीही बोलतात. कायद्याची गोष्ट केली तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आहेत. राज्यपालांना खोटी चिठ्ठी दाखवली. एका भगतसिंगाने देशासाठी जीव समर्पित केला तर एकाने लोकशाहीची हत्या केली," असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "आम्ही आतापर्यंत संयमाने वागत आहोत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता हिरावून घेऊ शकत नाही. खरं बहुमत कोणाकडे आहे, हे जनतेला कळावं यासाठी सत्याचा प्रयोग. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्यानुसार बहुमताचा आकडा आहे त्यांना सरकार स्थापनेची संधी दिली जाते. राजभवनात जे घटनेचे पालक आहेत, मात्र त्यांनी लोकशाहीची हत्या केली. अशी सत्ता मिळवलीत, तर देशात अराजक माजेल असा इशारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. काल तीन पक्षांचं ऐक्य ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी शहाणं व्हावं. लोकशाहीची तिरडी उचलली आहे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा."

"जयंत पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते आहेत. मी शिवसैनिक आहे. मला मॅन ऑफ मॅच, मॅन ऑफ द सीरिज कळत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार," असा दावा राऊत यांनी केला.

सकाळी 9.30: अजित पवारच राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते - आशिष शेलार

आम्हाला हे सांगण्यात आलं आहे की अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आहेत आणि विधानसभेत त्यांनी जारी केलेला व्हिप पक्षाला पाळावा लागेल, असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी ANI वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.

सकाळी 9 वाजता: 26/11च्या मृतांना श्रद्धांजली

आज 26/11च्या मुंबई हल्ल्याला 11 वर्षं झाली. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस स्मारकावर पोहोचले.

सुप्रीम कोर्टात काय झालं?

सत्तास्थापनेसाठी फडणवीस-अजित पवार यांना निमंत्रण देण्याच्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाला महाविकास आघाडीने शनिवारी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. त्यावर रविवारी तातडीने सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेतली.

या खटल्यात एकीकडे आहेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्याने स्थापन झालेलं महाराष्ट्र सरकार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद करत आहेत तर कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू मांडत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांनी भूमिका मांडली तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी काही भाजप आणि अपक्ष आमदारांची बाजू मांडत असल्याचं सांगितलं.

मात्र विधानसभेत लवकरात लवकर विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी राज्यपाल मुख्यमंत्र्यांना आदेश देऊ शकतात का, असा युक्तिवाद कोर्टात सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)