उद्धव ठाकरेः भाजपावरील टीकेचा नक्की अर्थ काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच सत्तास्थापनेबाबतच्या चर्चेसंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. गेले अनेक दिवस फारसे न बोलणाऱ्या फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत काहीही हातचं न राखता शिवसेनेसंदर्भातली आपली मतं मांडली.

चर्चेची दारं सेनेनं बंद केली- देवेंद्र फडणवीस

"अडीच वर्षाचा मुख्यमंत्री अशी चर्चा माझ्यासमोर झाली नाही. याउलट यावरून एकदा आमची चर्चा फिसकटली होती. माझ्यासमोर तरी अडीच वर्षाँचा विषय झाला नाही. पण आमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनासुद्धा विचारलं पण असं काहीही बोलणं झालं नसल्याचं आपल्य़ाला त्यांनी सांगितलं."

"उद्धव ठाकरे यांनी माझे फोन घेतले नाहीत. आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती, चर्चा आम्ही नाही तर शिवसेनेनं थांबवली, शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करण्याचं धोरण स्वीकारलं," असं फडणवीस यांनी म्हटलंय.

"ज्या भाषेत बोललं जातं त्या भाषेपेक्षा जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे," असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं.

भाजप कुठलंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, पुढचं सरकार भाजपच स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. युती तुटली आहे असं मी म्हणणार नाही, आम्ही अजून युतीत आहोत, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- उद्धव ठाकरे

"कोणत्याही टिकेची पर्वा न करता मी लोकांचे मुद्दे मांडत राहिलो. माझ्यावर पहिल्यांदा कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर अमित शहांचा संदर्भ घेऊन खोटे आरोप केले आहेत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीसांच्या मदतीची गरज नाही. तसंच अमित शहांच्या उपस्थितीत आमचा फॉर्मुला ठरला होता, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती," असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट धक्कादायक होतं, त्याचं मला दुःख झालं. खाते वाटप मी मानलं असतं, पहिली अडिच वर्ष तुमची दुसरी तुमची हे मी मानलं असतं. पण पद शब्दात मुख्यमंत्रिपदसुद्धा येतं," असं उद्धव यांनी फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याबाबत म्हटलं आहे.

मी भाजपला शत्रूपक्ष मानत नाही, पण त्यांनी खोटं बोलू नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी दुष्यंत चौटाला यांच्या भाषणाच्या काही क्लिप पत्रकारांना दाखवून अशा टीका शिवसेनेनं मोदी आणि शहांवर केली नसल्याचा दावा केला आहे.

"जेव्हा युती तुटली होती तेव्हा आरएसएसकडून मला संपर्क करण्यात आला होता, आरएसएसनंही सांगावं की खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं," असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

बहुमत नसताना सरकार कसं येणार, असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

तसंच भाजपनं लवकारत लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा किंवा इतरांसाठी सर्व पर्याय खुले करावेत, असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं आहे.

युती ठेवायची असेल तर पहिल्यांदा शपथ घ्या, असं त्यांनी भाजपला उद्देशून म्हटलं आहे.

मी चर्चेला दरवाजे बंद केलेले नाहीत, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये. तसंच मी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं आहे.

अयोध्येचा जो काही निकाल येणार आहे त्याचं क्रेडीट सरकार घेऊ शकत नाही, असा टोला त्यांनी मोदी सरकारला हाणला.

युती राहणार की तुटणार?

देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका आणि त्यानंतर तात्काळ उद्धव ठाकरे यांनी दिलेलं उत्तर यामुळे युतीमध्ये दोन्ही पक्षांमधील ताणलेले संबंध समोर आले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या बोलण्यातून कोणते स्पष्ट संकेत दिले आहेत याबद्दल 'द कझिन ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीकडे मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी युती तोडत आहोत असं आज स्पष्ट सांगितलेलं नाही. मुख्यमंत्रिपदासाठी आधी भाजपची आणि नंतर शिवसेनेची अडीच वर्षे ठरवून त्यांनी तोडग्याच्या दृष्टीने संकेत दिले आहेत. पण यांच्यामधील भिंत तोडणार कोण हाच प्रश्न आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी रा. स्व. संघ किंवा एखादा ज्येष्ठ नेता करू शकतो."

उद्धव यांचा थेट हल्ला

वरिष्ठ पत्रकार संजय जोग यांच्यामते उद्धव ठाकरे यांनी आज युतीच्या भवितव्याबाबत संकेत नाही तर स्पष्ट भूमिकाच मांडली आहे. त्यांनी भाजपवर थेट हल्ला केला आहे असं मत ते मांडतात.

ते म्हणतात, "आमच्यावर खोटे बोलण्याचे संस्कार नाहीत, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी अनेक वाक्य वापरून आपल्याला युतीमध्ये रस नाही असं त्यांनी ध्वनित केलं आहे. तसेच त्यांनी आपले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले असल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांच्या संबंधांमध्ये दुसरा कोणीतरी नेता अडथळा आणत आहे असं त्यांनी सुचवलं आहे. भाजपचंच सरकार येईल असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मलाही पर्याय आहेत असं बोलण्यातून सांगितलं आहे. त्यांचा सिग्नल लाऊड आणि क्लिअर आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)