You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंडी खाल्ल्यास मुलं नरभक्षक होतील - भाजप नेते गोपाल भार्गव : #5मोठ्याबातम्या
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1. अंडी खाल्ल्यास मुलं नरभक्षक बनतील - भाजप नेते गोपाल भार्गव
मध्य प्रदेशमधले भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी राज्य सरकारच्या अंगणवाडीच्या मुलांना अंडी देण्याच्या योजनेवर प्रतिक्रिया नोंदवताना अजब वक्तव्य केलं आहे.
अंडी खाल्ल्यास मुलं नरभक्षक होतील, असं वक्तव्य भार्गव यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही बातमी द टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
"सनातन संस्कृतीमध्ये मांसाहारी जेवण निषिद्ध मानलेलं आहे. आपण जबरदस्तीने कुणालाच खाऊ घालू शकत नाही. लहानपणापासूनच त्यांना हे शिकवल्यास मोठे होऊन ते मांस तर खातीलच, नरभक्षकही बनतील," असं अंडी योजनेवर प्रतिक्रिया देताना भार्गव म्हणाले.
2. देशातीली मूलभूत उद्योगांच्या उत्पादनात 5.2 टक्क्यांनी घसरण
देशातील आठ मूलभूत उद्योगांमधल्या उत्पादनात 5.2 टक्क्यांनी घसरण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही बातमी इंडिया टुडे मासिकाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
सप्टेंबर महिन्यात देशातील आठपैकी सात उद्योगांच्या उत्पादनात कमालीची घट पाहायला मिळाली. कोळशाच्या उत्पादनात 20.5 टक्के, कच्च्या तेलामध्ये 5.4 टक्के आणि नैसर्गिक वायूमध्ये 4.9 टक्के घट झाली. रिफायनरी उत्पादनामध्ये - 6.7 टक्के, सिमेंट - 2.1 टक्के, स्टील - 0.3 टक्के तर वीजेच्या उत्पादनात - 3.7 टक्के इतकी तफावत आढळून आली आहे.
फक्त खतांच्या उत्पादनामध्ये सप्टेंबर महिन्यात 5.4 टक्क्यांची वाढ दिसून आल्याचं आकडेवारीमध्ये समोर आलं आहे.
3. मेरी कोम आयओसी ब्रँड अम्बॅसिडर
सहा वेळच्या विश्व चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोम यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आशिया स्तरावर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून निवड केली आहे. दहा खेळाडूंच्या दूत समूहात मेरी कोम यांचा समावेश करण्यात आला आहे.
या समूहात मेरी कोम यांच्यासह दोन वेळचे ऑलिम्पिक तसंच विश्व स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते युक्रेनचे वासील लामाचेनको, पाच वेळचे ऑलिम्पिक चॅम्पियन ज्यूलिओ क्रूझ या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.
4. चहा प्रकरणावरील आरोपांमागे दृष्ट हेतू - अनुष्का शर्मा
भारतीय क्रिकेट निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी झालेल्या विश्वचषकादरम्यान अनुष्का शर्माला चहा सर्व्ह केल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना हा आरोप दृष्ट हेतूने लावल्याचं अनुष्का शर्मानं म्हटलं आहे.
चहा प्रकरणावरून अनुष्का शर्माला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने ट्विटरवर आपली बाजू स्पष्ट केली आहे. अनुष्का शर्मा म्हणाली, "दृष्ट हेतूंनी हे आरोप केले जात आहेत. आपल्या सोयीप्रमाणे सत्य स्वीकारलं जातं. माझा पती विराटच्या कामगिरीबाबत मला नेहमीच दोषी ठरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेटशी संबंधित गोष्टींसाठी विनाकारण मला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो," असं अनुष्का म्हणाली. ही बातमी द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
5. ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे निधन
ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि सूना असा परिवार आहे. त्यांच्या नावावर 100 पेक्षा अधिक पुस्तकं आहेत. याशिवाय त्यांनी कथा,कांदबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाचे काम केले आहे. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.
काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गुरुवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य जगतातून व्यक्त होत आहे.
साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मसापचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)