You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पृथ्वीराज चव्हाण : शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू #5मोठ्याबातम्या
आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :
1) शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
काँग्रेससाठी सर्व पर्याय खुले असल्याचंही पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे, शिवसेना-भाजप युतीला बहुतम मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
एकत्रित निवडणूक लढवूनही निकालानंतर शिवसेना-भाजपमध्ये अद्याप धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सेना-भाजपपेक्षा कमी जागा आल्या असूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचं महत्त्व वाढलंय.
2) निवडणुकीत हायकमांडची साथ मिळाली नाही - विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हायकमांडची पाहिजे तशी साथ मिळाली नाही, अशी जाहीर खंत काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
"आता नाव सांगत नाही, पण त्यांनी आम्ही म्हणत असतानाही चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे विदर्भात 10 जागांचे नुकसान काँग्रेसला झालं," असं स्वपक्षातील नेत्याचं नाव न घेता वडेट्टीवारांनी निशाणा साधला.
निवडणूक प्रचारासाठी आम्ही ज्या सभा मागितल्या, त्या मिळाल्याच नाहीत, असेही वडेट्टीवार म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र काँग्रेसमधील ते वरिष्ठ नेते आहेत.
3) जनता बँक, बंधन बँकेला आरबीआयनं दंड ठोठावला
पंजाब अँड महाराष्ट्र कॉ-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादले असताना, देशातील आणखी काही बँकांवर दंडात्मक कारवाई केलीय. यात महाराष्ट्रातील जनता सहकारी बँक (पुणे) आणि जळगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. आज तकनं ही बातमी दिलीय.
जनता सहकारी बँक (पुणे) ला एक कोटींचा दंड, तर जळगाव पिपल्स कॉ-ऑपरेटिव्ह बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय.
उत्पन्नाच्या स्रोतांची आणि संपत्तीची माहिती देण्याबाबतच्या आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्याचा ठपका या बँकांवर ठेवण्यात आलाय.
याचसोबत तामिळनाडूमधील मर्कंटाईल बँकेकडून फसवणूक प्रकरणांची नियमांनुसार योग्य माहिती न देण्याबाबत 35 लाखांचा दंड, तर बंधन बँकेवर एक कोटींचा दंड आकारण्यात येणार आहे. बंधन बँकेनंही आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्यानं कारवाई करण्यात आलीय. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.
4) काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांकडून 5 जणांची हत्या
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला, तर एक मजूर गंभीर जखमी झालाय. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
या हल्ल्यात जखमी झालेल्या एका मजुरावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
युरोपियन महासंघाचं 28 खासदारांचं शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
मजुरांवरील हल्ल्यानंतर कट्टरतावाद्यांचा शोध घेण्यासाठी कुलगाममध्ये सुरक्षादलाच्या अतिरिक्त तुकड्यांनाही पाचारण करण्यात आलंय.
5) 'दाव्होस इन द डेझर्ट'मध्ये तब्बल 15 अब्ज डॉलरचे करार
सौदी अरेबियात पार पडत असलेल्या 'दाव्होस इन द डेझर्ट' या शिखर परिषदेत तब्बल 15 अब्ज डॉलरचे करार झाले आहेत. सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
तीन दिवसांच्या उच्चस्तरीय आर्थिक शिखर परिषदेत १५ अब्ज डॉलरहून अधिक रकमेच्या 23 गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत, असं सौदी अरेबियाने जाहीर केलंय.
दरम्यान, या परिषदेत रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेही उपस्थित होते. ते म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी ही तात्पुरती आहे. केंद्र सरकारनं अलीकडेच हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काही दिवसांतच स्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)