BSNL-MTNLचं विलिनीकरण - केंद्र सरकारचा निर्णय #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. BSNL-MTNLचं विलिनीकरण; केंद्राचा निर्णय

BSNL-MTNLचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

23 ऑक्टोबरला झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या दोन्ही कंपन्या सरकार बंद करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं बातमीत म्हटलं आहे.

दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

  • महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीचे सर्व ताजे अपडेट्स -इथे क्लिक करा

"भूतकाळात BSNLवर मोठा अन्याय झाला. त्यामुळे BSNL आणि MTNLच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाबरोबरच कामगारांच्या व्हीआरएसची योजनाही आखण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना व्हिआरएसचं आकर्षक पॅकेज देण्यात येणार आहे. व्हीआरएस योजनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 53 वर्षं असेल, तर त्याला वयाच्या साठीपर्यंत 125 टक्के पगार मिळेल," असं त्यांनी म्हटलं आहे.

2. एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

गेली चार वर्षं एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 10 हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले आहेत.

एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या जवळपास 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये आणि अधिकाऱ्यांना 5,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

3. डी. के. शिवकुमार यांना जामीन

कर्नाटकातील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं बुधवारी (23 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सनं ही बातमी दिलीय.

"अंमलबजावणी संचालनालयानं (ED) शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. तपास यंत्रणांकडे कागदपत्रं असल्यानं शिवकुमार यांनी पुराव्यांमध्ये फेरफार केलेला नाही. तसंच त्यांनी साक्षीदारांवर प्रभाव टाकल्याचे दर्शवणारे पुरावे दिसून येत नाहीत," असं न्यायालयानं म्हटलं आहे.

25 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर तसंच तितक्याच रकमेच्या दोन जामीनदारांच्या आधारे न्यायालयानं शिवकुमार यांना जामीन मंजूर केला आहे.

4. रब्बी पिकांच्या हमीभवात वाढ

गहू, मसूर, मोहरी, जव, सूर्यफूल आणि हरभरा या रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

केंद्रीय माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यानुसार गव्हाच्या हमीभावात प्रतिक्विंटल 85 रुपयांची वाढ करून 1,925 रुपये, जवाच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ करून प्रतिक्विंटल 1,525 रुपये, हरभऱ्याच्या दरात 255 रुपयांनी वाढ करून प्रतिक्विंटल 4,875 रुपये, मसूरच्या दरात 325 वाढ करून प्रति क्विंटल 4800 रुपये, मोहरीच्या दरात 25 रुपयांनी वाढ करून प्रतिक्विंटल 4,425 रुपये, सूर्यफुलाच्या दरात 270 रुपयांनी वाढ करून प्रति क्विंटल 5,215 रुपये, असे नवीन हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत.

5. राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी

2017 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी महाराष्ट्रात करण्यात आल्या आहेत, NCRBनं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

2017मध्ये एकूण 925 इतक्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात करण्यात आल्या. देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रातल्या तक्रारींच्या संख्या 22.8 टक्के इतकी आहे.

महाराष्ट्राखालोखाल ओडिशात 494, राजस्थानमध्ये 404 भ्रष्टाचाराच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)