You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूर दक्षिण पश्चिम: देवेंद्र फडणवीस विजयी, काँग्रेसचे आशिष देशमुख पराभूत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांच्यात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात लढत झाली. या लढतीमध्ये फडणवीस यांनी आशिष देशमुख यांचा पराभव केला.
कशी झाली ही लढत?
1999 पासून ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. 2009 पर्यंत हा मतदारसंघ पश्चिम नागपूर म्हणून ओळखला जायचा. त्यांनंतर या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पूर्वाश्रमीचे भाजपवासी आणि आता काँग्रेसमध्ये पुन्हा परतलेले आशिष देशमुख उभे होते. आशिष देशमुख हे कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखले जातात आणि या विषयावर त्यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत.
या लढतीची पार्श्वभूमी
भाजपमध्ये असताना त्यांनी अनेकदा पक्षाच्या विरोधात आवाज उठवला होता. आशिष देशमुख काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांचे वडील रणजीत देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती.
दक्षिण पश्चिम मतदार संघातून मुख्यमंत्री पन्नास हजार मतांनी विजयी होतील, असा अंदाज नागपूरमधील राजकीय निरीक्षक अतुल पेटकर यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातील संपर्क कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या चित्रानुसार फडणवीस विजयी होणार असं दिसत असल्याचं पेटकर यांनी म्हटलं.
"काँग्रेसने मुख्यमंत्री लढणार असलेल्या मतदार संघात सरप्राईज उमेदवार देणार असं जाहीर केलं होतं. पण त्यांचे सरप्राईज हे आशिष देशमुख यांच्या उमेदवारीमुळे काही टिकलं नाही. मुळात आशिष देशमुख चमकोगिरी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांविरोधात उभे आहेत. आमदार असताना त्यांचा त्यांना फोकस नव्हता. या ना त्या कारणाने प्रसिद्धीत राहणे आशिष देशमुख यांना आवडते," असं विश्लेषण पेटकर यांनी केलं आहे.
2014 च्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नव्हता. भाजप स्वबळावर लढत असतानाही मोदी लाटेमुळे त्यांना भरघोस यश मिळालं होतं.
त्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना 1 लाख 13 हजार 918 मतं मिळाली. तर दुसऱ्या स्थानी राहिलेल्या काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदे-पाटील यांना 54 हजार 976 मतं मिळाली. त्यावेळी फडणवीस यांना मिळालेलं मताधिक्य 58 हजार 942 इतकं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)