You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अभिजीत बॅनर्जी: नरेंद्र मोदी यांनी घेतली नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाची भेट
"मानवी सबलीकरणासाठीचे त्यांचे प्रयत्न ठळकपणे दिसतात. देशाला त्यांच्या कीर्तीचा अभिमान आहे," या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची स्तुती केली.
"आम्ही अनेक विषयांवर सखोल आणि चांगली चर्चा केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा," असं पंतप्रधान पुढे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी अभिजीत बॅनर्जी यांचं "अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे अर्थतज्ज्ञ आहेत. आम्ही त्यांच्या मताशी सहमत असायलाच पाहिजे," अशी टीका नुकतीच केली होती.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर बॅनर्जी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, देश संकटात असताना, सगळ्यांनी एकत्र यायला हवं. सरकारने तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायला हवा, असं मत अभिजीत बॅनर्जी यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केलं.
"देश संकटात असताना एकीचं बळ दाखवायला हवं. नव्या पद्धतीने विचार करायला हवा. विविध क्षेत्रातील जाणकारांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून घ्यायला हवा. अनेक भारतीय तज्ज्ञ चांगलं काम करत आहेत. रघुराम राजन, गीता गोपीनाथ या मंडळींच्या ज्ञानाचा देशासाठी उपयोग करून घेता येईल," असं बॅनर्जी बीबीसीचे व्यापार प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांच्याशी बोलताना म्हणाले.
"अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, असं मी म्हणणार नाही. विकासाचा दर बदलतो आहे. मात्र जी लक्षणं प्रमाण मानली जातात ती चिंताजनक आहेत, हे निश्चितपणे सांगू शकतो," असं ते म्हणाले.
"भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. गुंतवणुकीचा दर घटला आहे. सर्वसामान्य लोकांच्या खरेदीचं दरप्रमाण 2014च्या तुलनेत घसरलं आहे. हे काळजीत टाकणारं आहे," असं बॅनर्जी यांनी सांगितलं.
अभिजीत बॅनर्जी आणि डॉ. एस्थर डुफ्लो यांनी 'Good Economics for Bad Times' हे पुस्तक लिहिलं आहे.
हे पुस्तक का लिहावं वाटलं, असं विचारलं असता बॅनर्जी सांगतात, "अर्थशास्त्राचा अभ्यास करताना, अभ्यासकांबरोबर चर्चा करताना विविध देशांच्या ध्येयधोरणांबद्दल कळतं. परंतु वर्तमानपत्र वाचताना वेगळंच अर्थधोरण अवलंबण्यात आल्याचं लक्षात येतं. या दोन ध्रुवांमधली दरी आम्हाला अस्वस्थ करत असते. लोकांना वाटतं की अर्थशास्त्रज्ञ मूर्ख असतात, त्यांना काही कळत नाही. पण आम्ही तितके मूर्ख नाही, म्हणूनच हे पुस्तक लिहिलं."
'डावं उजवं करत बसलो तर देशाचं नुकसानच'
"सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्सचा पर्याय स्वीकारला. परंतु यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. हा पैसा गरीब जनतेला देता आला असता," असं बॅनर्जी म्हणाले.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बॅनर्जींबाबत केलेल्या विधानाची खूप चर्चा झाली. बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीचे आहेत, असं गोयल म्हणाले होते.
गोयल यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारलं असता बॅनर्जी म्हणाले, "त्यांच्या वक्तव्याचं वाईट वाटलं. ते मला काही म्हणाले, याचं मला वाईट वाटलं नाही. मात्र देशाला आवश्यकता असताना जाणकारांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. गोयल यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे काम केलं तर देशाचं भलं होणार नाही. विचारवंत डाव्या विचारसरणीचा आहे म्हणून त्यांचं ज्ञान-कौशल्य वाईट ही भूमिका चुकीची आहे."
भारतात याल का?
गेल्या काही काळापासून देशाची अर्थव्यवस्था गडबडली आहे, देशावर आर्थिक संकटाचे ढग आहेत, असं माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह विविध अर्थतज्ज्ञांनी सांगितलंय.
मग अशावेळी देशासाठी आर्थिक सल्लागार किंवा कुठलं एक अधिकृत पद दिल्यास स्वीकाराल का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "भारताला माझ्या ज्ञानाची आवश्यकता आहे ,अशी परिस्थिती असेल तर मी सल्ला नक्कीच देईन. त्यासाठी मी तयार आहे. मात्र सध्याच्या घडीला नोकरी सोडून, मुलंबाळं सोडून भारतात येता येणार नाही. रघुराम राजन यांनी तसं केलं होतं. तो त्यांचा त्याग होता."
नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतरची भावना कशी होती, यावर बॅनर्जी सांगतात, "पुरस्कार मिळेल असा विचार केला नव्हता. पुरस्काराबाबत विचार करत बसलो तर आयुष्य असंच व्यर्थ जाईल. नोबेल पुरस्कार मिळाल्याचं कळल्यानंतर आम्हाला दोघांनाही प्रचंड आनंद झाला. परंतु पत्नी एस्थरला अधिक आनंद झाला."
भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये 'अभिजीत बॅनर्जी आणि पत्नी एस्थर यांना नोबेल पुरस्कार' असा उल्लेख करण्यात आला होता. त्या स्वतः एक मोठ्या अर्थतज्ज्ञ असल्याने असा उल्लेख झाल्याने तुम्हाला वाईट वाटलं का, असं विचारलं असता ते म्हणाले, "भारतात अभिजीत बॅनर्जी आणि पत्नी यांना नोबेल पुरस्कार, असं अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटलं होतं. पण जेव्हा मला कळलं की फ्रान्समध्येही असंच झालं आहे, तेव्हा मी चिंता सोडून दिली. तिथे 'एस्थेर डफ्लो यांच्यासह इतर दोघांना नोबेल पुरस्कार', असं लिहिलं होतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)