भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, EPA
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचं सावट - IMF चा अंदाज
दशकभरापूर्वी आलेल्या आर्थिक संकटानंतर पहिल्यांदाच जगात पुन्हा एकदा अर्थव्यवस्था इतकी सुस्त दिसत असल्याचं निरीक्षण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) वर्तवलं आहे. भारताचा विकास दरही आयएमएफनं घटवला आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीये.
यंदा भारताचा विकास दर 7.3 टक्के राहील, असा अंदाज याआधी IMF नं वर्तवला होता. मात्र, आता यात बदल करून भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार असल्याचं म्हटलंय.
जगाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता एकूण विकास दर 3 टक्के राहील, असंही IMF नं म्हटलं आहे.
दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा आहे, असं IMF च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
2. पीएमसी बँक : तणावामुळं दोन खातेधारकांचा मृत्यू
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध आणल्यानंतर खातेधारकांना आपापले पैसे काढणं कठीण होऊन बसलंय. याच तणावातून मुंबईतील दोन खातेधाराकांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडलीये.
महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. RBI नं पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 40 हजार रुपये केली असली तरी बँक खात्यात मोठी रक्कम अडकलेले खातेधारक तणावात असल्याचं दिसून येतंय.

फोटो स्रोत, Getty Images
ओशिवरा शाखेचे खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत मुलुंड येथील फट्टोमल पंजाबी यांनाही मृत्यूनं गाठलं.
संजय गुलाटी यांचे बँकेत 90 लाख रुपये होते. फट्टोमल यांचे 8 ते 10 लाख रूपये बँकेत होते. मात्र बँकेतून अत्यंत कमी रक्कम काढता येत असल्यानं ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.
3. 'भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील'
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक पक्षांतरं झाली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं, "भाजपमध्ये आलेले नेते पक्षाची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल."
"काळाच्या ओघात पक्षाचा विस्तार करायचा असतो, तेव्हा माणसं जोडावी लागतात," असंही नितीन गडकरींनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी नितीन गडकरींनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, "राज ठाकरे हे सक्षम नेते असून लोक त्यांना प्रतिसादही देतात. मात्र त्यांच्या पक्षाची रणनीति चुकलीये."
"सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं आहे. त्यामुळं राज ठाकरेंना विरोधी पक्षात बसण्याची इच्छा असल्यास जनतेनं विचार करावा," असंही गडकरींनी म्हटलं.
4. 'समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी कलम 370 चा वापर'
लोकांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप पुन्हा पुन्हा कलम 370 चा मुद्दा उपस्थित करत असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
"पंतप्रधान म्हणतात, पवारांनी कलम 370 वर आपली भूमिका स्पष्ट करावी. पण कलम तर आता रद्द करण्यात आलंय. आम्ही समर्थनही केलंय. संसदेत कुणीही विरोध केला नाही. मात्र तो विषय आता नाहीये," असं शरद पवारांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Twitter
यावेळी शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं.
त्यांनी म्हटलं, "प्रफुल्ल पटेलांची चौकशी दुर्दैवी आहे. पटेलांना ओळखणाऱ्यांना हे माहीत आहे की ते उद्योजक आहेत. त्यांच्या वडिलांच्या व्यावसायात 80 हजार कामगार काम करत होते. पटेल असे का करतील? मला खात्री आहे, की ते सर्व नीट स्पष्ट करतील."
5. राज्यात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र येत्या गुरूवारपासून पुन्हा वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अॅग्रोवननं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतलीये. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही भागातूनही पाऊस परतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं असतानाच आता गुरूवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
यंदा देशात आठ दिवस उशिरानं दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वात उशिरा म्हणजे 20 जून रोजी दाखल झाला होता. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनच्या परतीचा प्रवासही जवळपास सव्वा महिन्यानं लांबलाय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








