You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
RSS कार्यकर्त्याच्या सहकुटुंब हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण पेटलं
- Author, प्रभाकर एम.
- Role, कोलकाताहून बीबीसी हिंदीसाठी
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित (RSS) एक शालेय शिक्षक, त्यांची गरोदर पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाच्या खूनाची घटना घडली. त्यानंतर पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
भाजप आणि संघाच्या नेत्यांनी या खूनावरून पश्चिम बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी थेट ममता बॅनर्जी सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
विजयदशमीच्या दिवशी काही अज्ञात हल्लेखोरांनी शालेय शिक्षक बंधू प्रकाश पाल (वय 35), त्यांची पत्नी ब्युटी पाल (वय 28) आणि मुलगा अंगन पाल (वय 8) यांची धारदार शस्त्राने हत्या केली. पाल यांची पत्नी गरोदर होती. या प्रकरणी वेगवेगळ्या बाजूने तपास करणाऱ्या पोलिसांना आतापर्यंत खून्यांबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही.
तथापि, पोलिसांनी राजकीय द्वेषातून हा खून करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेसुद्धा या प्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.
या घटनेच्या विरोधात भाजप आणि आरएसएसने गुरूवारी एक निषेध मोर्चाही काढला. शिक्षकांच्या स्थानिक संघटनेनेसुद्धा आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या झियागंज परिसरात राहणाऱ्या पाल कुटुंबाच्या तीन सदस्यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.
परिचयातील व्यक्तीवर पोलिसांचा संशय
बंधू प्रकाश शेवटच्या वेळी सकाळी 11 वाजता बाजारातून येताना दिसले होते. पण पुढच्या एका तासातच त्यांच्या घरात कुटुंबातील तिघांचा खून करण्यात आला.
मारेकरी हे पाल कुटुंबीयांच्या परिचयातले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. सर्वप्रथम तिघांना एखादं अमली द्रव पाजण्यात आलं. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.
बंधू प्रकाश यांचे नातेवाईक राजेश घोष सांगतात, "माझ्या घरातील एका सदस्याने दुपारी पावणेबारा वाजता बंधू प्रकाश आणि त्यांच्या मुलासोबत फोनवर संवाद साधला होता. बहुतेक त्यावेळी खूनी त्यांच्या घरातच उपस्थित असावेत."
बंधू प्रकाश यांची हत्या त्यांच्या संघ परिवाराशी संबंधित असल्यामुळे झाली का? पोलिसांनी यापूर्वीच अशी शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
मुर्शिदाबाद (दक्षिण) चे भाजप अध्यक्ष हुमांयू कबीर सांगतात, "बंधू प्रकाश पाल आरएसएसचे सदस्य होते. पण त्यांच्या या राजकीय ओळखीचा कसलाही संबंध त्यांच्या हत्येशी नाही."
सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळात गुन्हेगार उघडपणे बिनधास्त होऊन फिरत असल्याचा भाजप आणि संघाचा आरोप आहे. पाल कुटुंबाची हत्या हा त्याचाच परिणाम असल्याचं ते सांगतात.
दोन्ही संघटनांनी ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक ट्वीट करून या हत्याकांडाबाबत राज्य सरकार आणि तथाकथित बुद्धिजीवींना सवाल विचारला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, "मुर्शिदाबादमध्ये झालेली ही काही पहिली घटना नाही. राज्यात यापूर्वीपासूनच भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या होत आल्या आहेत. यामुळे बंगालमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा दिसून येतो. राज्यातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे."
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेस जिल्हा समितीतील एक नेते सुब्रत साहा सांगतात, "पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. खून वैयक्तिक कारणामुळे झालेला असू शकतो. पोलीस तपासात सगळं समोर येईल."
घरात सामान अस्ताव्यस्त
लालबागचे उपविभागीय पोलीस अधिकारी बरूण वैद्या सांगतात, "या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पण अजूनपर्यंत खूनाचं कारण कळू शकलेलं नाही. आम्ही पाल यांच्या नातेवाईकांशी तसंच शेजाऱ्यांशी बोललो आहोत."
"पाल यांच्या घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आढळलं. हल्लेखोरांसोबत त्यांची झटापट झाल्याचं यातून स्पष्ट होतं," असं वैद्या यांनी सांगितलं.
सध्या पोलीस प्रकाश पाल यांच्या मोबाईलची कॉल लिस्ट तपासत आहेत. पाल कुटुंबाच्या परिचयाच्या व्यक्तीनेच हे खून केल्याचा अंदाज आहे.
या हत्याकांडामुळे परिसरात अवकळा पसरली आहे. प्रकाश यांच्या शेजारी राहणारे विपुर सरदार सांगतात, "हे कुटुंब अत्यंत सभ्य आणि सुशिक्षित होतं. आजपर्यंत त्यांचा कोणत्याच शेजाऱ्यासोबत कसलाच वाद झाला नव्हता."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)