कलम 370: काश्मीर पर्यटकांसाठी गुरुवारपासून खुले होणार - राज्यपाल सत्यपाल मलिक #5मोठ्याबातम्या

काश्मीर

फोटो स्रोत, ANI

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. काश्मीर गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले

जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविण्याबाबत गृह विभागाने जारी केलेला 2 ऑगस्टचा आदेश जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मागे घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 10 ऑक्टोबरपासून (गुरुवार) होणार आहे.

दैनिक लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, राज्यपाल मलिक यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर आता प्रथमच पर्यटकांना जम्मू-काश्मीरमध्ये जाता येणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील स्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवड्यात करण्यात आली होती. त्यानंतर तिथे पर्यटकांना प्रवेश देण्याचा हा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

2. स्विस बँकेतील खातेदारांची यादी भारताकडे

स्विस बँकेत असलेल्या 75 देशातील 31 लाख खातेदारांची माहिती संबंधित देशांना सोपवण्यात आली आहे. यात काही भारतीय खातेदारांचाही समावेश आहे, ज्यांची यादी बँकेने भारत सरकारला सोपवली आहे, अशी बातमी एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिली आहे.

अनेक भारतीयांनी आपला काळा पैसा स्विस बँकेत लपवून ठेवल्याचं अनेकदा बोललं जातं. तो आता परत येणार का, हा आता प्रश्न आहे.

पैसा

फोटो स्रोत, Getty Images

पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये भारताला आणखी खात्यांची माहिती मिळेल. भारत आणि स्वित्झर्लंड सरकारमध्ये बँकिंग माहितीच्या देवाण-घेवाणीचा करार झाला होता. या करारानुसार भारतीय खातेदारांची माहिती सरकारला देण्यात आली आहे.

3. मला तुम्ही कोथरूडमध्येच अडकवून ठेवलंय - चंद्रकांत पाटील

"माझा एक पाय कोथरूडमध्ये आणि एक पाय मुंबईत आहे. तुम्ही मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवलंय," असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडमधून उभे असलेले भाजपचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Getty Images

"तुम्ही सर्वांनी 'मला राज्यात बिनधास्त फिरा' असा विश्वास दिला असता तर मी तुम्हाला महायुतीची अपडेट माहिती दिली," असं पाटलांनी पुण्यात बोलताना सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे.

4. भाजपने रासपला धोका दिला - महादेव जानकर

"विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षावर अन्याय झाला आहे. भाजपने आमच्यासोबत धोका केला. जागावाटपात आम्हाला दोन जागा सोडण्यात आल्या. मात्र दोन्ही जागांवर कमळाच्या चिन्हावर उमेदवार लढणार असल्याने ते आमचे राहिले नाहीत," अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

महादेव जानकर

फोटो स्रोत, facebook

"भाजपने अन्याय केला असला तरीही स्वाभिमानासाठी महायुतीत राहून प्रचार करणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं. या टप्प्यावर महायुतीतून बाहेर पडणे योग्य दिसणार नाही. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष म्हणूनच आम्ही लढणार आहोत," असं जानकर म्हणाले.

5. राजभवनमध्ये जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईतल्या राजभवनमध्ये SRPFच्या एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासात वाजता राजभवनमधल्या सर्व्हंट क्वार्टर्समध्ये त्यांनी हनुवटीखाली गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मूळ औरंगाबादचे असलेले दत्तात्रय चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक आहे. ही बातमी दैनिक महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)