मराठी व्यावसायिक तुषार अत्रेंची अमेरिकेत अपहरण करून हत्या #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.

1. मराठी आयटी व्यावसायिकाची अमेरिकेत हत्या

भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तुषार अत्रे यांची अमेरिकेत अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. याविषयीची बातमी NDTVने दिली आहे. 50 वर्षीय तुषार यांची सिलीकॉन व्हॅलीमध्ये अत्रेटेक या नावाने कंपनी होती.

त्यांचं मंगळवारी राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. त्यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये सापडला.

तुषार हे यशस्वी आणि लक्षाधीश उद्योजक होते.

2. संजय निरूपम : प्रचारात सहभागी होणार नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर संताप व्यक्त केला आहे. तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

निरुपम यांनी एक ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.

काँग्रेसमधील खदखद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा बाहेर आली आहे. पक्षाला आता माझी गरज वाटत नाहीये, असं ट्वीट करत संजय निरुपम यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मी सुचवलेल्या नावांकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं असं म्हणत कोणत्याही प्रचारात सहभागी न होण्याचा पवित्रा निरुपमांनी घेतला आहे.

ज्या प्रमाणे पक्षश्रेष्ठी माझ्याशी वागत आहेत, ते पाहता पक्ष सोडण्याची वेळ फार दूर आहे, असं वाटत नाही, असं सूचक विधानही निरुपम यांनी केलं आहे.

3. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली असून त्यांची 3500 कोटींची संपत्ती आणि दहा खाती गोठविण्यात आली आहेत. ही बातमी टीव्ही9 च्या वेबसाईटने दिली आहे.

पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणारे एडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अट केली आहे.

पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवा यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, गृहनिर्माण क्षेत्रातील 'एचडीआयएल' समूहाशी निगडित कर्ज घोटाळ्यामुळे र्निबध आलेल्या 'पीएमसी बँके'च्या ठेवीदारांना खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादेत रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी वाढ केली असून ती आता 10 हजारांवरून 25,000 रुपये करण्यात आली असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

4. छोटा राजनच्या भावाला दिलेलं 'महायुती'चं तिकीट अखेर कापलं

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे भाऊ दीपक निकाळजे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असंही म्हटलं जात होतं. पण रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने काल दिलेलं हे तिकीट आज मागे घेतलं आहे. ही बातमी नेटवर्क18 लोकमतने दिली आहे.

सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधून दीपक निकाळजे निवडणूक लढवणार होते. आता या जागेवर रामदास आठवलेंनी नवा उमेदवार दिला आहे.

5. पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्ली हायकोर्टाने माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या न्यायलयनीन कोठडीत वाढ केली आहे. INX मीडिया घोटाळा प्रकरणी सध्या ते अटकेत आहेत. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेत चिदंबरम यांनी आरोप केला आहे की सीबीआय जाणूनबुजून त्यांच्या कोठडीत वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की त्यांचा जामीन नाकारण्याचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय चुकीचा होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)