You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोहन भागवत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जातिभेद नव्हता याचं महात्मा गांधींना कौतुक होतं #पाचमोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
1. 'संघात जातिभेद नव्हता याचं महात्मा गांधींना कौतुक होतं'
महात्मा गांधीजींनी 1947 मध्ये दिल्लीतील संघाच्या शाखेला भेट दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जातिभेद नाही, स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध आहेत, या दोन्ही गोष्टींचे गांधीजींनी कौतुक केलं होतं, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
स्वयंसेवक दररोज सकाळी म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्रात महात्मा गांधींचे नामोच्चारण करतात, त्यांचे स्मरण करतात, असंही ते म्हणाले.
गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संघाच्या संकेतस्थळावर बुधवारी भागवत यांचा लेख प्रकाशित करण्यात आला. ही बातमी नवभारत टाइम्सने दिली आहे.
2. पीएमसी बँकेनेच उघडली 21 हजार बनावट खाती, अनेक घोटाळे उघड
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील अनेक घोटाळे आता उघडकीस येत आहेत.
पोलिसांनी या बँकेविरुद्ध जी तक्रार दाखल केली आहे, त्यात दिलेल्या कर्जाची रक्कम लपवण्यासाठी बँकेने तब्बल २१ हजार बनावट खाती उघडली होती, याचा उल्लेख केला आहे. ही बातमी लोकमतने दिली.
3. महाराष्ट्रातून पाठवलेला 300 टन कांदा उत्तर प्रदेशात जप्त
महाराष्ट्रातून कांदा घेऊन गेलेले ट्रक साठामर्यादेचा भंग केल्याचे कारण देत उत्तर प्रदेशात जप्त करण्यात आले.
त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांवर परिणाम झाला असून, बुधवारी कांदा दर क्विंटलमागे एक हजार रुपयांनी कोसळले. यामुळे गुरुवारी नगर आणि नाशिक बाजार समित्यांच्या आवारातील कांदा लिलाव बंद राहणार आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
4. देशातला ग्रामीण भाग हागणदारी मुक्त: पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त ग्रामीण भारत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत या मोहिमेचा मोठा टप्पा यामुळे गाठला गेला असल्याचंही ते म्हणाले. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.
"मी सगळ्या स्वयंसेवकांचे, सरपंचांचे आणि ज्यांनी या मोहिमेसाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो," मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
5. कपिल देव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
माजी भारतीय कर्णधार कपिल देवने आज(बुधवार) क्रिकेट सल्लगार समिती (सीएसी) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हितसंबंधाप्रकरणी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड(बीसीसीआय)चे एथिक्स अधिकारी डीके जैनने सीएसीला नोटिस पाठवली होती. कपिल यांनी नोटिस मिळाल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घेतला. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.
कपिल देव यांनी प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय आणि बोर्डाचे सीईओ राहुल जौहरी यांना ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. त्यात त्यांनी लिहीले, "अॅड-हॉक सीएसीचा भाग होणे आनंदाची गोष्ट होती. मेन्स क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक निवडणे विशेष होते. मी तत्काळ माझ्या पदाचा राजीनामा देतोय."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)