You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरे यांचे 'केम छो वरली' पोस्टर बदलत्या शिवसेनेची नांदी? - विधानसभा निवडणूक
ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा निवडणूक लढवणारे म्हणून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे उमेदवारी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी टीकेचे धनी झाले आहेत. त्याला निमित्त ठरलं ते आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात लावलेले बॅनर्स.
आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळीत लागलेल्या 'केम छो वरली' अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा लावण्यात आले आहेत.
मात्र एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बहुभाषिक होर्डिंग्ज का नको?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या या बहुभाषिक होर्डिंग्जची पाठराखण केली आहे. असे होर्डिंग्ज का लागू नयेत, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
"देशाचे पंतप्रधान गुजराती आहेत. मुंबईत मराठी लोकांबरोबर गुजराती लोकही राहतात आणि ते शिवसेनेबरोबर आहेत. त्यांच्याही भाषेचा जर वापर केला तर गुन्हा काय? याचा अर्थ मराठीपण सोडलं असा होत नाही," असं संजय राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
शिवसेनेच्या बदलत्या राजकारणाचे लक्षण
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी 'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकातून आपल्या व्यंगचित्रांद्वेर मराठी माणसाचे विषय मांडायला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी इथून बाहेर पडून 'मार्मिक' सुरू केले.
त्यानंतर आज जवळजवळ पाच दशकांनी आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारे बहुभाषिक बॅनर्स लावणं, हे शिवसेनेच्या बदलत्या राजकारणाचे एक लक्षण असल्याचं 'फ्री प्रेस जर्नल'चे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार सांगतात. "निवडणुकीचं राजकारण सर्वांना समावेशक व्हायला भाग पाडतं, हेच यातून दिसून येतंय. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे.
"एकेकाळी जी शिवसेना परप्रांतीयांना शिव्या घालत होती, त्या परप्रांतीयांसाठी शिवसेनेनं मेळावे घेतले. कारण अशी भूमिका घेतल्याशिवाय आपण सत्तेत येऊ शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. वरळी मतदारसंघ आणि एकूणच मुंबईमध्ये गुजराती समाज हा भाजपच्या पाठीशी राहतो. पण आपल्याला तो जवळचा मानत नाही, याची शिवसेनेला जाणीव आहे. तसंच इतके दिवस मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटवण्यात शिवसेनाच आघाडीवर होती."
आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं पारंपरिक राजकारण बदलण्याचा प्रयत्न केला असल्याचंही चुंचूवार सांगतात. "आदित्य हा नवीन पिढीचा माणूस आहे. आदित्यनं शिवसेनेच्या अनेक पारंपरिक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला. व्हॅलेंटाईन्स डेला शिवेसेनेचा विरोध आदित्यचा प्रवेश झाल्यानंतर मावळला. नाईट लाईफबाबत आदित्यने आग्रह धरला. ठिकठिकाणी पक्षाची भूमिका बदलण्यास भाग पाडलं.
"तसंच आमचा पक्ष फक्त मराठी माणसांचा नाही तर गुजराती आणि इतर भाषक व्यक्तींशी संवाद साधण्यास, त्यांना आपलं म्हणायला आम्ही तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांना ही कल्पना होती की आपल्यावर टीका होईल, पण गुजराती माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल जी कटुता आहे, ती दूर व्हायला मदत होईल," ते सांगतात.
वरळी मतदारसंघाचे बदलते स्वरूप
वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवताना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला नको, असाच आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. म्हणूनच एरवी केवळ मराठी भाषिकांवरच भर देणाऱ्या शिवसेनेकडून बहुभाषिकांना सोबत घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. वरळी मतदारसंघ हा मराठीबहुल असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघाचं स्वरूप बदलत चाललं असल्यानं शिवसेनेला गुजराती मतदारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
एकीकडे मराठी भाषिक आता मुंबईच्या उपनगरांकडे किंवा कल्याण-डोंबिवली, वसई-विरारकडे जात आहेत. त्यामुळे मराठी भाषकांची संख्या काही प्रमाणात कमी होत आहे तर गुजराती मतदारांची संख्या मात्र वाढत आहे.
वरळी मतदारसंघात वरळी सीफेसच्या उच्चभ्रू वस्तीत पूर्वीपासून गुजराती भाषक होतेच. अर्थात त्यांची संख्या खूप जास्त नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वरळीमध्ये जे टोलेजंग टॉवर्स उभे राहिले, त्यामध्ये राहायला येणारे प्रामुख्यानं गुजराती भाषक आहेत. गुजराती भाषकांची या वाढलेल्या संख्येकडे दुर्लक्ष शिवसेना करणार नाही, असाही आदित्य ठाकरेंच्या गुजराती बॅनरचा अर्थ आहे.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गुजराती भाषक
शिवसेना आणि गुजराती भाषकांचे संबंध कसे राहिलेले आहेत त्यावर www.kolaj.in चे संपादक सचिन परब सांगतात की, "संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईवर हक्क कुणाचा? हा सर्वात मोठा भाग होता. मराठी माणसाचा मुद्दा होता की आम्ही कष्टकऱ्यांनी मुंबई घडवली आहे तर गुजराती माणसाचं म्हणणं होतं की मुंबई आम्ही भांडवलदारांनी घडवली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान प्रबोधनकार ठाकरेंनी हिरीरीनं मराठी भाषिकांची बाजू मांडत गुजराती भाषिकांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
"गुजराती भाषिकांचे त्याकाळचे प्रतीक असलेले मोरारजी देसाई यांच्यावर तर कठोर शब्दांत टीका झाली आहे. त्यानंतर शिवसेना स्थापन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषिकांच्या हिताचा मुद्दा लावून धरलाच होता. जसं दक्षिण भारतीयांच्याविरोधात थेट आंदोलन शिवसेनेनं केलं, तसं कुठलं आंदोलन गुजराती भाषिकांविरोधात झालं नाही. पण शिवसेनेच्या आगमनानंतर मुंबईच्या राजकारणातील गुजराती भाषिकांचा महत्त्व हळूहळू कमी होत गेलं ही वस्तुस्थिती आहे," ते पुढे सांगतात.
शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना गुजराती बॅनर्सबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं की, "मुंबई ही बहुभाषकांची आहे म्हणूनच शिवसेना निर्माण झाली. आम्हाला प्राधान्य भूमिपुत्रांना पाहिजे, मग तो कोणीही असो. बाकीचे नको, असं म्हटलं नाही. असो जात-धर्म कोणता, जो जो या संस्कृतीत नटला मराठी... त्या फलकामागे हे वाचलत तर लक्षात येईल की आपुलकी निर्माण केल्याशिवाय कृतशील समाजकार्य निर्माण होत नसते."
लोक काय म्हणतायत?
बीबीसी मराठीने आज 'होऊ द्या चर्चा'मध्ये यावरच नेटिझन्सची प्रतिक्रिया जाणून घेतली.
तेव्हा बहुतांश नेटिझन्सही या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करताना दिसले.
विनय अनिल भोसले म्हणाले, "शेवटी काय तर 'प्रबोधन'कार कमी पडले हीच शोकांतिका."
योगेश सावंत यांनी म्हटलंय की "जो मराठीत व्यक्त होईल, तो माझा मराठी माणूस. मुंबई गुजरातला जाऊ नये, म्हणून ज्या माणसाने (आमचे साहेब) जीवाचे रान केले, मुंबईत मराठी माणसाला मान सन्मान दिला, आज त्यांचीच माणसं "गुजराती", "तेलुगू" पाट्या मुंबईत लावतात. एवढी लाचारी????"
तर दशरथ गरूड यांनी "सयुंक्त महाराष्ट्र दिनाच्या शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार, शेवटी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे संकेत दिसत आहेत," असं म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)