विधानसभा निवडणूक: चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक का लढवत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून जात असलेले चंद्रकांत पाटील यंदा विधानसभेची निवडणूक लढवणार असून पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून ते रिंगणात उतरणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कोथरूड हा मतदारसंघ 2009 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. कोथरूड परिसर 2009 पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता आणि या भागावर पूर्वीपासून शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे.
कोथरूड पूर्वी ज्या शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता, त्या मतदारसंघातून 80 च्या दशकात भाजपचे अण्णा जोशी निवडून जात होते. 1990 नंतर युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला आणि तिथून शिवसेनेचे शशिकांत सुतार दोन वेळा तर विनायक निम्हण दोन वेळा निवडून आले.
2009 मध्ये शिवाजीनगरमधून वेगळा होऊन कोथरूड मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे निवडून गेले. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदेंना पराभूत केले होते. 2009 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र 2014 मध्ये युती झाली नव्हती. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव केला.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर कोथरूड मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाला पसंती दिलेली आहे.

फोटो स्रोत, Twitter
'दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे'
चंद्रकांत पाटील हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यानं भारतीय जनता पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता कमीच आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दोघेही विरोध न करता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार अशीच चिन्हं आहेत.
मात्र असं असलं तरी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सारं काही आलबेल नाही. चंद्रकात पाटील यांचं नाव चर्चेत येताच 'दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे' असे फलक कोथरूड परिसरात लावण्यात आलेले आहेत. काही ब्राह्मण संघटनांकडूनही चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात आला आहे.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "कोथरुडमधील आमदार हा ब्राह्मणच असावा अशा आमची मागणी नाही. यापूर्वी देखील चंद्रकांत मोकाटे होते, शशिकांत सुतार होते. तेव्हा आम्ही कधीही आक्षेप नोंदवला नाही. पण यावेळेस चंद्रकांत पाटलांनी हा मतदार संघ निवडला कारण हा ब्राह्मणबहुल सुरक्षित मतदारसंघ आहे. पण चंद्रकांत पाटलांनी पाच वर्षात कोथरुडसाठी, इथल्या मतदारांसाठी काय केलं? यापूर्वी दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण असेल, ब्राह्मणांसाठी आर्थिक विकास महामंडळ, आरक्षण यासंदर्भात त्यांनी आमच्यासाठी काय केलं? आमच्यासाठी तुम्ही भांडत नाही, पण आमची मतं तुम्हाला पाहिजे असतात हा आमचा आक्षेप आहे. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार जाहीर करणार आहोत."

फोटो स्रोत, facebook/medha kulkarni
तर भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांचं म्हणणं आहे, की जातीच्या नावावर काही लोक करत असलेला विरोध हे अपरिपक्वतेच लक्षण आहे. ब्राह्मण समाज विचारी आहे त्यामुळे त्यांना माहीत आहे त्यांचं हित कशात आहे.
पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने चंद्रकांत पाटील यांचे काम करतील असाही खर्डेकर यांचा दावा आहे. "पक्ष जेव्हाही निर्णय घेतो तो पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे पक्षासोबत राहिलं पाहिजे. मेधा कुलकर्णींनी त्यांच्या कारकिर्दीत चांगली काम केलं आहे. त्या देखील पूर्ण निष्ठेने चंद्रकांत पाटलांच्या प्रचारात उतरतील. तसंच त्यांना योग्य प्लेसमेंट पक्ष देईलच," असं खर्डेकर म्हणालेत.
कोथरूडचीच निवड का केली?
हिंदुस्तान टाइम्सचे प्रतिनिधी अभय खैरनार सांगतात, "चंद्रकांत पाटील हे सातत्यानं विधान परिषदेवर निवडून येत असल्यानं त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून दरबारी राजकारणी असल्याची टीका केला जात होती. त्यामुळेच भाजपकडून त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यांच्याकडे स्वत:चा हक्काचा असा मतदारसंघ नव्हता. ते कोल्हापूरचे असले तरी तेथे त्यांच्यासाठी सुरक्षित आणि हक्काचा असा मतदारसंघ नव्हता. मध्यंतरी त्यांना राजू शेट्टींनी त्यांना आव्हान दिले होते, की ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढवल्यास मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवणार. पण अर्थातच ही जोखीम चंद्रकांत पाटील पत्करू शकणार नव्हते. त्यामुळेच त्यांच्यासाठी सुरक्षित असा कोथरूड मतदारसंघ निवडण्यात आला आहे."
कोथरूड मतदारसंघातील सामाजिक समीकरणं पाहिली तर हा मध्यमवर्गीय वरचष्मा असलेला मराठा आणि ब्राह्मणबहुल मतदारसंघ आहे. राज्यात ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या असलेले जे काही मोजके मतदारसंघ आहेत त्यांपैकी एक कोथरूड आहे. 1980च्या दशकात कोथरूड वाढण्यास सुरुवात झाले. पुण्याच्या पेठांमधील बरीचशी मंडळी कुटुंब कोथरूडमध्ये स्थायिक झाली. त्यामुळे या मतदारसंघात ब्राह्मण मतदार मोठ्या संख्येनं आहेत. याशिवाय या मतदारसंघाला लागून असलेल्या मुळशी परिसरातील मराठा मंडळी येथे स्थायिक झाली आहे. तसेच बाणेर, पाषाण या भागात मूळची मराठा मंडळीही आहेत. त्यामुळे मराठा मतदारांची संख्याही मोठी आहे.
अभय खैरनार सांगतात, की या मतदारसंघात मोठ्या संख्येनं असलेला ब्राह्मण मतदार हा प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे आणि त्याचाही शिवसेना-भाजप युतीला या मतदारसंघात फायदा होत आलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुण्यातून शिवसेनेला उमेदवारी नाही
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उतरवत असताना भारतीय जनता पक्षानं पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठ जागा आपल्याकडेच ठेवल्या आहेत. शिवसेनेला शहरातील एकही जागा देण्यात आलेली नाही. गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती.
भाजपनं इथून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उतरवलं आहे. तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदार विजय काळे यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








