You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना-भाजप युतीची घोषणा कागदावर, जागावाटपाचा उल्लेख का नाही?
विधानसभेसाठी युती करत असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेनं एका संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकामध्ये जागावाटपाचे तपशील मात्र देण्यात आले नाहीत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीनं हे पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय.
जेव्हाही दोन मोठे पक्ष एकत्र येतात तेव्हा ते याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतात. पण यावेळी शिवसेना-भाजपनं युती तर केली पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. यावरून शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
"ही युती होईल की नाही याबाबत संभ्रम होता. पण शेवटी युती झाली. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आणि भाजपनं अद्याप जागांबाबतची घोषणा केली नसावी," असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांना वाटतं.
शिवसेना अखंड राहावी या हेतूनेच उद्धव ठाकरे यांनी युती केली. जर युती झाली नसती तर त्यांच्या पक्षातूनही काही लोक बाहेर पडतील अशी भीती देखील त्यामागे असू शकते पण युती झाल्यामुळे आता ती भीती उरलेली नाही असं उन्हाळे यांना वाटतं.
"युतीची घोषणा झाली तरी मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटला असं म्हणता येत नाही. आज आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहणार ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचं काय करायचं याबाबत दोन्ही पक्ष काहीच बोलत नाहीयेत.
"सध्या देशभरात मोदींची हवा आहे, त्यांचं तंत्र आणि करिश्मा पाहता भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे. हे सगळे फॅक्टर विचारात घेऊनच दोन्ही पक्षांनी निर्णय घेतलेला दिसत आहे. पण युती झाल्यामुळे दोन्ही पक्ष खूप आनंदात आहेत असं दिसत नाही, असं उन्हाळे सांगतात.
'इनकमिंगमुळे ताणाताणीची शक्यता'
गेल्या काही दिवसात काँग्रेस-राष्ट्रवादीमधून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेते दाखल झालेत. यामध्ये हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
या नेत्यांच्या जागांबाबत शिवसेना-भाजपमध्ये काय वाटाघाटी होतात, हा मुद्दा युतीनंतरही तसाच राहिला आहे.
यावर लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक विनायक पात्रुडकर म्हणतात, "भाजपचे 10 ते 15 आमदार शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मात्र, भाजपमध्ये इनकमिंग झालीय. या जागांवर ताणाताणी होऊ शकते. शिवसेनेला कुठल्या जागा ऑफर केल्या जातात, हाही मुद्दा आहे."
"काँग्रेस-राष्ट्रवादीतून झालेल्या इनकमिंगमुळे भाजपला जागांचं नीट व्यवस्थापन करावं लागणार आहे," असं प्रशांत दीक्षित सांगतात.
'जागावाटपाबाबत तणाव'
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सांगतात, शिवसेना भाजपमध्ये युतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपाबाबत दोन्ही पक्षात तणाव नक्कीच आहे.
काही जागांवर अजूनही मतभेद असण्याची शक्यता आहे. काही जागांबद्दल अजूनही चर्चा सुरू असल्यामुळे त्यांनी जागावाटप जाहीर केलं नाही.
भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत 122 जागा जिंकल्या पण त्यांच्या पूर्णच आमदारांना तिकीट मिळेल अशी शक्यता वाटत नाही. तसेच त्यांच्याकडे आयारामांची संख्याही भरपूर आहे असं उन्हाळे सांगतात.
युतीचा फॉर्म्युला काय ठरला आहे असं विचारलं असता पाटील यांनी सांगितलं की सहमती हाच फॉर्म्युला आहे.
रविवारी (29 सप्टेंबर) भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणातील जागावाटपासंबंधी चर्चा झाली.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेनं काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करायला सुरूवात केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)