विधानसभा निवडणूक: काँग्रेसची चौथी यादी: मुख्यमंत्र्याविरुद्ध आशिष देशमुख रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपल्या 19 उमेदवारांची नवीन यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं आतापर्यंत आपले 140 उमेदवार जाहीर केले आहेत.

गुरुवारी (3 ऑक्टोबर) संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या यादीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता इथे देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख अशी लढत पहायला मिळेल.

कणकवलीमधून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसनं आतापर्यंत चार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या यादीत 51, दुसऱ्या यादीत 52, तिसऱ्या यादीत 20 आणि चौथ्या यादीत 19 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसनं आपल्या यादीत फार प्रयोग केल्याचं पहायला मिळत नाही. बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांनाच संधी देण्यात आलीये.

भोकरमधून अशोक चव्हाण आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीये.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून लढणार आहेत. सातारा पोटनिवडणुकीच्या जागेसाठी त्यांचं नाव चर्चेत होतं.

यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, तरुणांना वाव मिळेल असं काँग्रेसने वेळोवेळी म्हटलं होतं, पण 51 जणांच्या यादीत बहुतांश नावं ही प्रस्थापित राजकारण्यांचीच आहेत अशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर यांच्याच नावाचा समावेश आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि काँग्रेसच्या निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नाव पहिल्या यादीत असून ते अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत.

पळूस-कडेगावमधून विश्वजित कदम, तिवसामधून यशोमती ठाकूर, नागपूर उत्तरमधून डॉ. नितीन राऊत, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार, लातूर शहरातून अमित देशमुख यांच्याही नावांचा पहिल्या यादीत समावेश आहे.

माजी मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार असतील.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज यांच्यासह 52 उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने रात्री जाहीर केली.

पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्याची पोटनिवडणूक लढवावी असा आग्रह होता. तरीही चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात राहणे पसंत केलं. त्यांना कराड दक्षिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

विलासराव देशमुखांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांना आधीच उमेदवारी घोषित झाली होती. दुसऱ्या यादीत त्यांचे बंधू धीरज यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील आणि राहुल बोंद्रे या विद्यमान आमदारांनी संधी देण्यात आली आहे.

मुंबईत पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जगदीश अमीन (अंधेरी), अरुण सावंत (दहिसर), राधिका गुप्ते (डोंबिवली), कांचन कुलकर्णी (कल्याण) यांना संधी देण्यात आली आहे.

सांगलीतून पृथ्वीराज पाटील तर पेणमधून नंदा म्हात्रे या काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावतील.

काँग्रेसच्या यादीत पुन्हा प्रस्थापितांचीच नावे का?

वरिष्ठ पत्रकार अलोक देशपांडे म्हणतात, "काँग्रेसच्या पहिल्या यादीवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, इलेक्टिव्ह मेरिट (निवडून येण्याची क्षमता) या निकषावर उमेदवारांना प्राधान्य दिलंय. आता आमदारांची संख्या वाढवणं किंवा आहेत, ते कायम ठेवणं, हेच ध्येय सध्या काँग्रेससमोर दिसतंय."

"काँग्रेस आता पेचप्रसंगात आहे. त्यामुळं आता कुणी तात्विक टीका केली तरी काँग्रेस दुर्लक्ष करू शकते. मात्र, आता निवडून येण्याची पार्श्वभूमी आहे, पैसा आहे, क्षमता आहे, अशा लोकांना उमेदवारी दिल्याचे दिसते." असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात.

"पहिल्या यादीतून दिसतंय की, दिग्गजांची नावं आहेत. कारण दिग्गजांना लढण्यासाठी सोनिया गांधींनी बंधनकारक केलंय. जेवढी ताकद आहे, तेवढी लावण्याची काँग्रेसची तयारी दिसतेय." असेही हेमंत देसाई म्हणाले.

काँग्रेसच्या पहिल्या यादीतही घराणेशाहीला प्राधान्य?

"नवी चेहरे लोकांसमोर घेऊन जाणं बरोबर आहे. मात्र, पहिल्या यादीतले बरेचसे उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. अमित देशमुख, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना आता काढण्याचं कारण काय? आता निवडून येणं, हेच पक्षाचं मोठं काम आहे. निवडून आणणं हे बघावं की, घराणेशाही म्हणून यांना बाजूला करावं? असा प्रश्न काँग्रेससमोर आहे."

अलोक देशपांडे पुढे म्हणतात,"आता समजा अमित देशमुख यांना तिकीट दिलं नाही. त्यांना दुखावून दुसऱ्या कुणाला दिली गेली, तर हातची जागाही जाईल. त्यामुळं या घडीला काँग्रेस मोठे बदल करण्याच्या परिस्थितीच नाही."

"लोकसभेत चांगले निकाल आले असते, तर असे बदल केले गेले असते. आता आहे त्या जागा टिकवून, काही भर घालता येते का, हेच पाहिलं जाईल." असंही अलोक देशपांडे म्हणतात.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "उमेदवार नसेलच तिथं घराणेशाहीला छेद देणं ठिक आहे. मात्र, आता काँग्रेसला प्रॅक्टिकल होणं भागच आहे. जो निवडून येऊ शकेल, त्यालाच उमेदवारी देणं अपरिहार्य आहे."

'महिला धोरण आणणारी काँग्रेस इतिहास विसरली की काय?'

काँग्रेसच्या पहिल्या यादीत केवळ चार महिला उमेदवार आहेत. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी म्हणतात, "आता 288 पैकी फक्त 51 उमेदवार जाहीर झालेत, त्यामुळं पुढल्या यादीत असू शकतात नावं. पण इथून पुढचं राजकारण काँग्रेस जितक्या लवकर समजून घेईल, तेवढं बरं राहील. काँग्रेस जुन्याच पद्धतीनं निवडणुकांकडे, राजकारणाकडे पाहताना दिसतंय."

"पहिलं महिला धोरण आणणारं राज्य महाराष्ट्र होतं आणि तेही काँग्रेसच्या काळातच. त्यामुळं पहिल्या यादीतील महिला उमेदवारांची संख्या पाहता, आपलाच इतिहास काँग्रेस विसरली की काय, असं चित्र आहे." असं प्रतिमा जोशी म्हणाल्या.

प्रतिमा जोशी पुढे म्हणाल्या, "महिला, तरूण पिढी यांना वाव देण्याचं धोरण काँग्रेसनं ठेवलं नाही, तर भाजपचं आव्हान त्यांना पेलता येईल का, याबाबत शंका वाटते."

"काँग्रेसकडे मोठी संधी होती. आता त्या पक्षाकडे गमावण्यासारखं काहीच राहिलं नाही. जे संचित होतं, ते संपलेलं आहे. काँग्रेसच्या वैचारिक किंवा इतिहासाबद्दल काही बोलणार नाही, मात्र संसदीय राजकारणात काँग्रेसनं बऱ्याच गोष्टी गमावल्यात." असं प्रतिमा जोशी म्हणतात.

"आताच्या विधानसभेइतकी वाताहत काँग्रेसची झाली नव्हती. काँग्रेसचा कुठलाही प्रचार दिसत नाही, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यातला कुठलाही केंद्रीय नेता महाराष्ट्रात येऊन गेला नाही. इथे निवडणूक आहे की नाही, हे तरी काँग्रेसला माहित होतं का, याची शंका यावी, अशी स्थिती होती." असं हेमंत देसाई म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)