You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांना आव्हाड म्हणतात, 'माफ करा साहेब...पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मी माझ्या जातोय माझ्या विठ्ठलासाठी-जितेंद्र आव्हाड
"मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी, मी जातोय पवार साहेबांसाठी. माफ करा साहेब ह्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही तुमचे नाही ऐकणार", अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडी कार्यालयात जाणार आहेत. कार्यकर्त्यांनी तिथे जमू नये असं आवाहन पवार यांनी केलं आहे. मात्र यावेळी तुमचं ऐकणार नाही असं आव्हाडांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांना जमण्याचं आवाहन केलं आहे. टीव्ही 9ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे. या कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी.
परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन आणि इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे असं पवार यांनी ट्वीट करून म्हटलं होतं.
त्याला प्रत्युत्तर देताना आव्हाडांनी ट्वीट करून म्हटलं की, "माफ करा साहेब ह्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही तुमचं ऐकणार नाही. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही पाहिल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा- तरी तुम्ही लढताय. वय वर्ष 79. हे सगळं तुम्ही आमच्यासाठी सोसलंय.
उद्यासाठी माफ करा. ह्या सगळ्यात आपण एकटेच लढत आलात. सगळ्या संकटांवर मात केलीत. या लढाईत तुम्हाला साथ द्यायला महाराष्ट्र तयार आहे. साहेब 35 वर्ष तुम्ही सांगाल ते ऐकलं. पण यावेळेस माफ करा" असं आव्हाडांनी म्हटलं आहे. दरम्यान ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
2. राज्यात मुलींचा जन्मदर वाढला
राज्यात गेल्या सहा वर्षात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढलं असल्याचं राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
2013 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण एक हजार मुलांमागे 900 होतं. 2015 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 907वर पोहोचलं होतं. 2018च्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण 916 असं सुधारलं आहे. गेल्या वर्षी राज्यातील शहरी भागात हजार मुलांमागे मुलींची संख्या 920 होती. सीआरएसच्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचं प्रमाण 965 असून, हे संपूर्ण राज्यात अव्वल आहे.
3. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रविकांत तुपकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
तुपकर हे शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जायचे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीपासून काडीमोड घेतल्यापासून तुपकर यांचं पक्षातलं वजन वाढलं होतं.
लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी मिळण्यासाठी शेट्टी यांनी आघाडीकडे मागणी केली होती. परंतु फार आग्रह न धरल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकरता सोडण्यात आला. त्यामुळे नाराज तुपकर भाजपच्या दिशेने निघाले असल्याची चर्चा आहे.
4. स्मगलिंगमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका
टेक्सटाईल, तंबाखूजन्य पदार्थ, तयार कपडे, कॅपिटल गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या पाच प्रमुख क्षेत्रात होणाऱ्या स्मगलिंग अर्थात तस्करीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं 1.17 ट्रिलिअन नुकसान झाल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'ने हे वृत्त दिलं आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिकी) आणि कमिटी अगेन्स्ट स्ट्रगलिंग काऊंटरफिइटिंग अॅक्टिव्हिटीज डिस्ट्रॉइंग इकॉनमी यांनी यासंदर्भात संशोधन केलं.
5. सलमान खान जोधपूर न्यायालयात हजर होणार?
काळविटांच्या कथित शिकारीप्रकरणाच्या सुनावणीसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी जोधपूर न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. दरम्यान सलमानला गॅरी शूटरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. 'अमर उजाला'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
काळवीटाच्या शिकारीप्रकरणी दोषी ठरवल्याने सलमानने याचिका दाखल केली होती. कनिष्ठ न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा ठोठावली होती.
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र कुमार सोंगारा यांनी चार जुलैला सुनावणीदरम्यान 27 सप्टेंबरला सलमानला हजर राहण्याचे आदेश दिले होते. हजर न राहिल्यास सलमानचा जामीनही रद्द होऊ शकतो.
मात्र तरीही सलमान न्यायालयासमोर हजर न होण्याचीच चिन्हं आहेत. सलमानच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केल्याचं पोलीस आणि प्रशासनाचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)