You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल, तर त्याचं स्वागतच करतो : शरद पवार #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल, तर त्याचं स्वागतच करतो : शरद पवार
"आज माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर त्याचं स्वागत आहे. मी राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेलो तिथे मला आणि माझ्या पक्षाला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर माझ्यावर अशी कारवाई झाली नसती तरच मला आश्चर्य वाटलं असतं," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या या कारवाईवर टीव्ही 9 मराठीशी बोलताना शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
"ज्या संस्थेचा मी सभासदही नव्हतो, त्यात माझं नाव गोवलं गेलंय. याबाबत अधिक काही बोलण्याची गरज नाही. राज्यभरात माझे सुरू असलेले दौरे सुरुच राहतील," असंही पवार यांनी म्हटलं.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शरद पवारांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि अन्य 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त दिलं आहे.
अजित पवार यांच्यासह दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह एकूण ७० जणांचा यात समावेश आहे.
हा घोटाळा २५ हजार कोटींचा असल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असतानाही या बँकेने साखर कारखान्यांना कर्ज दिले, असा ठपका ईडीने ठेवला आहे.
2. ...तर उमेदवारी अर्जही भरणार नाही : उदयनराजे
साताऱ्यामधून माझ्याविरोधात शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर मी उमेदवारी अर्जही भरणार नाही, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यांनी केवळ मला त्यांचं दिल्लीतलं घर आणि गाडी वापरण्याची मुभा द्यावी, असंही उदयनराजेंनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला असून विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यात लोकसभेची निवडणूकही होईल.
निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी उदयनराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावेळी बोलताना उदयनराजेंनी आपल्याला शरद पवारांबद्दल आजही आदर असल्याचं म्हटलं.
3. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी धोरण आवश्यक- सर्वोच्च न्यायालय
सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी धोरण आखा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
"सरकारने तातडीनं हा विषय हाताळणं गरजेचं आहे. सोशल मीडियासंबंधी न्यायालय धोरण आखू शकत नाही, सरकारलाच ते आखावं लागेल," असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठाने सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली.
काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित मेसेज किंवा ऑनलाइन मजकुरामागे मुख्य व्यक्ती कोण आहे याचा शोध न लागणे गंभीर बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
4. मुंबई-पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) रात्रीपासूनच मुंबईत पावसानं पुन्हा हजेरी लावली.
पुढचे काही तास मुंबई शहर आणि उपनगरात तसंच पालघर, विरार, मिरा-भाइंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अलिबाग या भागांत पावसाचा जोर कायम राहणार, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.
पुण्यातही मंगळवारी (24 सप्टेंबर) रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळील रस्ता, एसएनडीटी परिसर, आघारकर रस्ता, कर्वे रस्ता, डेक्कन, कोथरूड येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.
5. संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मिरला विशेष अधिकार देणारं कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं हे वृत्त दिलंय.
आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी मोहन भागवत यांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर संघाची भूमिका स्पष्ट केली.
लोकांना हद्दपार करण्यासाठी नाही तर भारतीय नागरिक नाहीत अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी एनआरसी आणण्यात आला असल्याचंही भागवत यांनी सांगितलं.
50 परदेशी संस्थांमधील 80 पत्रकार या परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी हे सुद्धा उपस्थित होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)