शरद पवार म्हणतात पंतप्रधानांनी असं बोलणं शोभतं का? #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. पंतप्रधानांनी असं बोलणं शोभतं का?- शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं मतांसाठी केलेल्या वक्तव्याचा फायदा शेजारील देशाला (पाकिस्तानाला) होत आहे. असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये केलं होतं.

त्यावर शरद पवार अहमदनगर येथे म्हणाले, "पाकिस्तानचे सरकार व तेथील लष्कर भारताच्या विरोधात सतत बोलत राहाते हे त्यांचं धोरणच आहे. हे धोरण त्यांच्या जनतेच्या हिताचे नसून राज्यकर्त्यांच्या हिताचे आहे असं मी म्हणालो होतो. या वक्तव्यामुळे पाकिस्तानला कोणता फायदा झाला?" पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीनं असं बोलणं शोभतं का? अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. 2021मध्ये भारत अवकाशात अंतराळवीर पाठवणार

चांद्रयानानंतर भारत अवकाशामध्ये अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे. डिसेंबर 2021मध्ये भारत अंतराळवीरासह यान पाठवणार आहे असे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी केले. आयआयटी भुवनेश्वरच्या आठव्या दीक्षांत समारोहात के. शिवन बोलत होते.

चांद्रयान मोहीम 98 टक्के यशस्वी झाली. विक्रम लँडरशी अजूनही संपर्क करता आलेला नाही. या प्रकल्पाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान असे दोन भाग होते.

विज्ञानाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्या टप्प्यात आपल्याला पूर्ण यश मिळालं आहे तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण पूर्ण यशाच्या थोड्या जवळ पोहोचलो आहोत. त्यामुळे 98 ट्कके प्रकल्प यशस्वी झाला असं म्हणता येईल. विक्रम लॅंडरमध्ये प्रग्यान नावाचं रोव्हर होतं. 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी केवळ 2.1 किमी अंतर बाकी असताना विक्रमचा संपर्क तुटला होता. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे.

3. आतापर्यंत महाराष्ट्रात 32 टक्के जास्त पावसाची नोंद

21 सप्टेंबर पर्यंतच्या पावसाच्या नोंदीचा विचार करता महाराष्ट्रात 1,257 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात या काळामध्ये सरासरी 954.6 मिमी पाऊस पडतो. परंतु यावर्षी 32 टक्के पाऊस जास्त पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरासरीचा विचार करता दादरा नगर हवेली येथे सर्वात जास्त पाऊस पडला आहे. त्यानंतर सिक्किम, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार येथे जास्त पावसाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल येथे कमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी पाऊस मणिपूरमध्ये झाला आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

4. नव्या मतदारांना 4 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी शक्य

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि अद्याप मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या तरूणांना मतदार 4 ऑक्टोबरपर्यंत आपले नाव नोंदवता येईल.

नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी आणि मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. जम्मू आणि काश्मीरमध्ये 60 जहालवाद्यांची घुसखोरी

गेल्या एक महिन्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये 60 जहालवादी घुसले आहेत अशी माहिती जम्मू-काश्मीर डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली आहे. मात्र दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुणांनी सामील होण्याची संख्या कमी झाली आहे.

गेल्या 45 दिवसांमध्ये केवळ दोन स्थानिक तरूण दहशतवादी संघटनांमध्ये सामिल झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बीएसएफ, भारतीय लष्कर आणि इतर संरक्षक दलांच्या विभागांनी मिळवलेल्या माहितीमधून 60 परदेशी जहालवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीनगरमध्ये काही कट्टरवाद्यांनी हवेत गोळीबार करून स्थानिकांना घाबरवल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. हे वृत्त द हिंदूने प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)