बीबीसीच्या नावानं स्विस बँक खातेधारकांची बनावट यादी व्हायरल

बीबीसी
    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

स्विस बँकेतल्या खातेधारकांची बनावट यादी बीबीसीच्या नावानं सोशल मीडियावर शेअर केली जातेय. बीबीसी या यादीला कुठलाही दुजोरा देत नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बनवाट यादीत दावा करण्यात आलाय की, स्विस बँक कॉर्पोरेशननं अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयनं सातत्यानं दबाव आणल्यानंतर भारतीय खातेधारकांची यादी भारत सरकारला सोपवलीय.

या बनावट यादीत सर्वात पहिलं नाव काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं आहे. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा, लालू प्रसाद यादव यांच्यासह पवनकुमार चामलिंग, पी. चिदंबरम, सोनिया गांधी, शशिकला नटराजन, राजीव कपूर, जयकुमार सिंह आणि उमेश शुक्ल यांचीही नावं आहेत.

याच यादीत शेवटी असा दावा करण्यात आलाय की, "स्विस बँक कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीच्या लंडनमधील प्रतिनिधीशी बातचीत केली आणि सांगितलं, स्विस बँकेनं केवळ सर्वांत मोठ्या 10 खातेधारकांचीच नावं भारत सरकारला दिली आहेत." जे असत्य आहे.

फेसबुक पोस्ट

फोटो स्रोत, Facebook

बीबीसी लंडनच्या नावानं ही बनावट यादी सोशल मीडियावर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर केली जातेय. त्यानंतर बीबीसीच्या जबाबदार वाचक/प्रेक्षकांनी या यादीचं सत्य काय, हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

बीबीसीच्या नावानं व्हायरल होणाऱ्या स्विस बँक खातेधारकांच्या यादीला बीबीसी कुठलाही दुजोरा देत नाही.

सोशल मीडियावर बीबीसीच्या नावानं व्हायरल होणाऱ्या स्विस बँक खातेधारकांच्या यादीचं बीबीली खंडन करत आहे.

तसेच, बीबीसीने अधिकृतपणे सांगितलं की, "बीबीसीच्या नावानं व्हायरल होणारी स्विस बँक खातेधारकांची यादी खोटी असून, बीबीसीचा या यादीशी काहीही संबंध नाही. आम्ही आमच्या वाचक आणि प्रेक्षकांना आवाहन करतो की, असे काही व्हायरल होत असल्यास खात्री करण्यासाठी बीबीसीची वेबसाईट पाहावी."

फेसबुक पोस्ट

फोटो स्रोत, Facebook

बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने या व्हायरल यादीची पडताळणी केली असता असं लक्षात आलं की, ज्या स्विस बँक कॉर्पोरेशनचा हवाला देऊन यादी व्हायरल केली जातेय, ती बँक 1998 सालीच बंदी पडलीय.

इंटरनेटवरील माहितीनुसार, स्विस बँक कॉर्पोरेशनची 1872 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये स्थापना झाली होती.

स्विस बँक कॉर्पोरेशन गुंतवणूक क्षेत्रातली बँक आणि आर्थिक सुविधा पुरवणारी कंपनी होती. या बँकेचं 1998 साली यूनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये विलिनीकरण करण्यात आलं होतं.

स्विस बँक कॉर्पोरेशन

फोटो स्रोत, Wikipedia

याआधीही बीबीसीच्या नावानं अशा खोट्या बातम्या पसरव्या गेल्यात.

बीबीसीच्या नावानं सोशल मीडियावर खोट्या याद्या पसरवण्याचं हे पहिलेच प्रकरण नाही. याआधी भारताच्या लोकसभा निवडणुकांवेळी खोट्या बातम्या बीबीसीच्या नावानं पसरवल्या गेल्या. लोकसभेवेळी सर्वेक्षणाची एक यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली होती.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

त्यावेळी खोट्या बातम्या व्हायरल करणाऱ्यांकडून असा दावा करण्यात आला होता की, बीबीसी, सीआयए आणि आयएसआय यांच्या सर्वेक्षणानुसार भारतातील 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळणार आहे.

मात्र, तेव्हाही बीबीसीनं या सर्वेक्षणासंदर्भातील खोट्या बातम्याचं खंडन केलं होतं. कारण बीबीसी कुठल्याही निवडणुकांचं सर्वेक्षण करत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)