बुलढाणा: पाय बांधलेल्या 90 कुत्र्यांची कत्तल? #5मोठ्याबातम्या

कुत्रे

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :

1) बुलढाण्यात 90 कुत्रे मृतावस्थेत आढळले

बुलडाण्यातील गिरडा-सावलदबारा रस्त्याच्या कडेला जवळपास 90 कुत्रे मृतावस्थेत आढळले आहेत. या कुत्र्यांचे पाय बांधण्यात आले होते, अशी बातमी PTI वृत्तसंस्थेने दिली आहे. इंडिया टुडेवर प्रकाशित या बातमी दिलीय.

"गिरडा-सावलदबारा रस्त्यावर पाच ठिकाणी 100 हून अधिक कुत्रे आम्हाला सापडले. त्यातील 90 हून अधिक कुत्रे मृतावस्थेत होते, तर काही जिवंत आहेत," अशी माहिती पोलिसांनी दिली.

कुजत असलेल्या मृतदेहांमधून दुर्गंधीमुळं हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि वनाधिकाऱ्यांना तातडीनं यासंदर्भात कळवलं. त्यानंतर जिवंत कुत्र्यांची सुटका करण्यात आली.

वनाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत कुत्र्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

2) सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही : न्या. दीपक गुप्ता

सरकारवर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि कुणी टीका केल्यास त्याला देशद्रोह म्हणता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक गुप्ता म्हणाले. सरकारवरील टीकेला देशद्रोह म्हटल्यास परिस्थिती कठीण होईल, असंही ते म्हणाल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

अहमदाबादमधील गुजरात लॉ सोसायटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात न्या. दीपक गुप्ता बोलत होते.

"मतांतरातूनच नवे विचारवंत घड असतात. त्यामुळं मतभिन्नतेचा आदर करायला हवा. सरकार, न्यायव्यवस्था, प्रशासन, लष्कर यांच्यावरील टीकेला देशद्रोह म्हणू शकत नाही. जर आपण या टीका करण्यास विरोध करत असू तर लोकशाहीऐवजी आपण 'पोलीस स्टेट' बनू," असंही न्या. दीपक गुप्ता म्हणाले.

3) मसूद अजहरची पाकिस्तानकडून तुरुंगातून गुप्तपणे सुटका: IB

जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अजहरची पाकिस्ताननं तुरुंगातून गुप्तपणे सुटका केल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेनं दिलीय. त्यानंतर राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील सुरक्षेसंदर्भात गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला सतर्क केलंय. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

मसूद अजहरच्या मदतीनं पाकिस्तानकडून सियालकोट-जम्मू आणि राजस्थान सेक्टरमध्ये मोठी कारवाई केली जाण्याची शक्यताही आयबीनं वर्तवलीय.

मसूद अजहर

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्ताननं राजस्थान सीमेजवळ अतिरिक्त सैन्यही तैनात केल्याची माहिती IBनं दिली. सीमा सुरक्ष दल (BSF) आणि जम्मू, राजस्थानमधील सैन्यालाही सतर्क करण्यात आलं आहे.

4) 'कलम 371' ला हातही लावणार नाही : अमित शाह

ईशान्य भारतातील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 ला हातही लावणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आश्वासन दिलंय. ते नॉर्थ ईस्टर्न काऊन्सिल (NEC) मध्ये बोलत होते. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासह ईशान्य भारतातील आठ राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारीही हजर होते.

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

"जम्म-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर अनेकांनी टीका केली. लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याआधारे ईशान्य भारताला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 371 बद्दल चुकीची माहिती पसरवली जातेय," असं अमित शाह म्हणाले.

"कलम 370 आणि कलम 371 मध्ये मोठा फरक आहे. कलम 370 नैसर्गिकरीत्या काही काळासाठीची तरतूद होती तर ईशान्य भारतासाठीचं कलम 371 ही विशेष तरतूद आहे. मी हे संसदेतही स्पष्ट केलं होतं आणि ईशान्य भारतातील मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की कलम 371 ला हातही लावणार नाही," असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

5) राज्याची पावसामुळे त्रेधातिरपीट

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. त्यातच पुढील काही तासात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

दुसरीकडं, पुरातून सावरणाऱ्या कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पुराचं ढग घोंघावू लागलेत. शनिवारपासून कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

कोल्हापूर

कोल्हापूर आणि सांगली भागातील होणारा जोरदार पाऊस लक्षात घेता, आलमटी प्रशासनासोबत चर्चा झाली आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

पंचगंगा नदीची पातळी 39 फूट 2 इंचांवर पोहोचलीय. इशारा पातळीच्या वर पंचगंगा नदी पोहोचली आहे.

विदर्भात मात्र पूरपरिस्थिती कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस झाला असून आजपर्यंत 1687.1 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पाहा हा व्हीडिओ

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)