You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरण नगरकर असं का म्हणायचे "फक्त द्वेष हे चलनी नाणं कसं होईल?"-ब्लॉग
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"तुम्ही अस्वस्थ कसे होत नाही..." किरण नगरकर थोडे संतापलेच. "आपल्या देशात इतकं सगळं चाललंय आणि तुम्हा लोकांना गप्प बसवतंच कसं? ते आगरकर, कर्वे सगळं विसरून गेलात…? आपली ही परंपरा तुम्ही विसरताच कसे?" मुलाखतीत माझ्या प्रश्नांना उत्तर देताना नगरकर असे एकेक प्रश्न माझ्याच समोर उभे करत होते. दोन दिवसांपूर्वी नगरकर गेले आणि तो प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागला.
तेव्हा उन्नाव आणि कठुआ इथं लहान मुलींवर बलात्कार होऊन काही दिवस उलटले होते. देशभरात थोडंफार आंदोलनाचं, निषेधाचं वारं होतं. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतर प्रथमच थोडंफार वातावरण तयार होत होतं. पण त्यातही सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडे फारसं होत नव्हतं. किरण नगरकर अशा विषयांवर सतत आपलं मत उघडपणे मांडायचे म्हणून त्यांना भेटायचं ठरवलं होतं.
त्यांना भेटण्याचा कोणताच मार्ग माहिती नव्हता. एका पत्रकार मित्राने त्यांच्या घरचा नंबर दिला होता तो सुरू नव्हता. शेवटी त्यांना नंबरसाठी इ-मेलच पाठवला. किरण नगरकरांचं त्याला उत्तर आलं. त्यांचा पत्ताही बदलला होता. तो त्यांनी नीट सांगून कसं यायचं हे सांगितलं. वेळही दिली.
नगरकरांसारख्या इतक्या मोठ्या लेखकानं वेळ द्यायला चटकन हो म्हणणं थोडं आश्चर्यकारक होतंच पण त्यांना भेटायचं म्हणून धाकधूक वाटायला लागली. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे माझा होमवर्क नीट पाहिजे म्हणून त्यांच्या सगळ्या जुन्या बातम्यांची कात्रणं डोळ्यांखालून घातली. काय.. कसं बोलायचं याचा हिशेब करत त्यांच्या फ्लॅटसमोर उभा राहिलो. पण दार उघडून समोर आलेले नगरकर एकदम भारी मोकळ्या स्वभावाचे निघाले. हा कोण मुलगा, मला दुपारचा भेटणार, प्रश्न विचारत बसणार असला एकही विचार त्यांच्या मनात आला नसावा. उलट भरभरून स्वागत करत त्यांनी मुलाखतीला सुरूवात करायला सांगितलं.
उन्नाव, कठुआचे बलात्कार, कदाचित "पद्मावत" की कोणत्या चित्रपटाला तेव्हा होत असलेला विरोध, डोनल्ड ट्रंप यांनी बांधायला काढलेली मेक्सिकोची भिंत असं एकेक विषयांवर बोलणं सुरू झालं. नुकतेच कोणत्यातरी एका निदर्शनात सहभागी झाले होते. त्यावरूनच त्यांनी बोलायला सुरुवात केली.
एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करायला आपण घराबाहेर पडलंच पाहिजे. तुम्ही कितीजण जमता याला काही महत्त्व नाही, तुम्ही घराबाहेर पडून जमता याला महत्त्व आहे. सुशिक्षित लोक सारखे आपल्याच जगात रमायला लागले तर ते धोक्याचं लक्षण आहे. तिकडे अमेरिकेत ट्रंपनी भिंत बांधायला काढली तर तिथले सगळे बुद्धिजीवी आंदोलनात उतरले. आपल्याकडे मात्र असलं काही होत नाही, असं म्हणतच बोलायला सुरुवात केली.
बोलताबोलता आमची गाडी इतिहासावर गेली. नगरकर म्हणाले आपण महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना आजाद यांना कधीच विसरून गेलो आहे. आपल्याला अहिंसेच्या बळावर स्वातंत्र्य मिळालं असताना आज सगळ्यांना हिंसेचा मार्ग जवळचा वाटाला लागलाय.
अरे सामाजिक प्रश्नांसाठी आयुष्य देणारे आगरकर, नामदार गोखले, रानडे, महर्षी कर्वे आपल्याच महाराष्ट्रात होते. त्यांची तरी आठवण ठेवा असं वाटतं. आपण आपला इतिहाससुद्धा वाचायला तयार नाही.
पुढे तर म्हणाले, ज्या समाजाला सामाजिक प्रश्नांवर विचार करायला वेळ नाही तो समाज संपूनच जावा असं मला वाटतं.
आमचं बोलणं सुरू असताना त्यांच्या घराच्या जवळून सतत एका धार्मिक कार्यक्रमाचे आवाज येत होते. त्या आवाजामुळं बोलण्याला त्रासही व्हायचा. एकवेळ अशी आली की आम्हाला बोलताच येईना. त्यावर ते म्हणाले, "बघितलंस. हे सगळं असं झालं आहे. प्रत्येकाला केवळ स्वतःचा विचार करायचा आहे. दुसऱ्याचा कोणालाच विचार करायचा नाही. आपल्यापेक्षा वेगळं मत दुसऱ्याचं असू शकतं असं कुणालाच वाटत नाही. विनोदाची जागा आता द्वेषानं घेतली आहे."
"एकेकाळी देशामध्ये टोकाचे विरोधकही एकमेकांशी बोलायचे, गप्पा मारायचे. त्यांच्यात मतभेद असायचे पण संवादही असायचा. एका कार्यक्रमात विचारवंत, लेखक, विरोधक एकमेकांवर कडाडून टीका करायचे पण ते झालं की त्यांच्यात हसतखेळत गप्पा व्हायच्या. आज हे सगळं अवघड झालं आहे. आता राजकारण्यांना आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांना टीका नको असते. कोणी वेगला विचार मांडला तर आपल्या सत्तेला धोका तयार होईल असं त्यांना वाटत असतं म्हणून ते सेन्सॉरशिप लादायला जातात. एकदा तुम्हाला सत्ता मिळाली की तुम्ही कामातून जाता आणि मग सत्ता कधीच जाऊ नये असं तुम्हाला वाटायला लागतं."
बोलताबोलता ते मराठीच्या मुद्द्यावर आले. मातृभाषा नीट शिकल्यावर आपल्याला चार-पाच भाषा सहज शिकता येतात असं नगरकरांचं मत होतं. ते सांगू लागले, "आज जे मराठी मराठीच्या घोषणा देतायंत त्यांची मुलं कोणत्या भाषेत शिकत आहेत हे जरा लक्षात घ्या. आपल्यासारख्या इतर भाषांनाही इतिहास आहे मग त्या भाषांचा सन्मान आपण करायला नको का? खरंतर आपल्या सगळ्याचं वाचन कमी झालंय त्यामुळं इतिहास विसरून गेलोय. सारखा द्वेष करून कसं चालेल. हेट कॅन नॉट बी अ सिंगल करन्सी."
मी म्हटलं, हो तुम्हाला द्वेषाचा चांगलाच अनुभव आहे ना? ते हसले. मग म्हटलं तुमच्या पहिल्याच पुस्तकाला म्हणजे सात सक्कं त्रेचाळीसला विरोध-टीका झाली होती ना? त्यावर ते म्हणाले.. "अरे तुला कसं माहिती हे सगळं... माझ्या प्रत्येक पुस्तकाच्या वेळेस असं झालं आहे. पण लोकांनी माझी पुस्तकं वाचलीसुद्धा."
वाचनाचा विषय डोक्यात आल्यावर ते मध्येच उठून आत गेले आणि एकदोन पुस्तकं दाखवली. "हे बघ हे मी सध्या आता वाचत आहे. तू ही नक्की वाच."
नगरकर सतत आता काय चुकतंय हे सांगत बसतात असा समज होण्याची शक्यता होती. पण तसं नव्हतं. ते या वयोमानानुसार थकले असले तरी कार्यरत होते. मुंबईच्या प्रश्नांवर ते सतत काहीतरी करत असायचे. कधी आयुक्तांना पत्र लिही. कधी खड्डे, वाढत्या इमारतींवर मत मांड असं ते करत राहायचे. पुन्हा नगरकरांना भेटलं आणि मुंबईबद्दल काही न बोलणं असं होणं शक्यच नाही. नगरकर खरेखुरे पक्के 'बॉम्बे बॉय' होते. मुंबईला सलग सत्तर वर्षं त्यांनी अनुभवलं होतं. ते मुंबई जगले होते.
मुंबईबद्दल किती बोलू नको किती असं झालं होतं त्यांना. "पण आपण या शहराची वाट लावलीय... वाट..." असं रागानं म्हणाले. त्यावेळेस आलेला संताप त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. ते म्हणाले, "या शहरातली मैदानं कधीच गेली आहेत. जरा जागा दिसली की टॉवर बांधलेच. आता ते रस्ते पण काढून टाका. कशाला हवेत रस्ते. त्या जागेवर टॉवर बांधून टाका. चाळीतल्या लोकांना एका कोपऱ्यात एक उंच इमारत बांधून दिली जाते आणि उरलेल्या जागेवर श्रीमंतांची घरं बांधली जातात. हे असं किती करणार? दोन इमारतींच्यामध्ये हवा खेळायला तरी जागा हवी ना..."
भरपूर बोलणं झाल्यावर निघायची वेळ झाली. मगाशी दाखवलेली पुस्तकं नक्की वाच असं सांगून त्यांनी निरोप घेतला.
पुढेही नगरकर असेच मुंबईच्या विषयावर, देशातल्या विषयांवर आपली मतं मांडत राहिले. इ-मेल-फोनवर पुन्हा भेटूया असं सांगायचेही पण ते झालं नाही.
गेल्या वर्षी #Metoo मोहीमेच्या काळात त्यांच्यावर आरोपही झाले. तीन महिला पत्रकारांनी नगरकरांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला होता. हे आरोप त्यांनी फेटाळले. आपण नेहमीच महिलांना समान अधिकार आणि वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केलं असल्याचं ते म्हणाले होते. ट्विटरद्वारे त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले होते.
किरण नगरकर आता आपल्यात नाहीत. मराठी, इंग्रजीमध्ये एकाचवेळी मोठा वाचकवर्ग लाभलेल्या दुर्मिळ लोकांमधले ते एक होते. एकेकाळी मुंबईच्या सभोवार, पिझा बाय द बे, गेलॉर्डसारख्या रेस्टोरंट्समध्ये नगरकर, कोलटकर यांचा वावर असायचा. आता मुंबईला त्यांच्या नसण्याची सवय करून घ्यावी लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)