एकनाथ शिंदे: काँग्रेसच्या या नेत्याने अनेक आमदारांना शिंदेंसारखीच हॉटेलवारी घडवलीय

डीके शिवकुमार

फोटो स्रोत, Getty Images

2019 मध्ये त्यांना ईडीने एका प्रकरणात अटक केली होती. त्यांनी अनेकदा काँग्रेसला अशा संकटातून वाचवलं आहे. 2001 मध्ये विलासराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता.

तेव्हा डी. के शिवकुमार यांनी आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्याची कामगिरी पार पाडली होती.

2017 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी गुजरातमधील 42 आमदार बंगलोरच्या त्यांच्या रिसॉर्टवर नेण्याची कामगिरी बजावली होती.

काँग्रेसतर्फे अशा प्रकारचं संकटमोचक होण्याची कामगिरी त्यांनी अनेकदा बजावली आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या निमित्ताने त्यांची आठवण होणं अपरिहार्यच. सध्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये आमदारांचं बंड जोरात आहे. पण या रिसॉर्ट पॉलिटिक्समध्ये इतर पक्षही कमी नाहीत. काँग्रेसचे कर्नाटकातले नेते डी.के. शिवकुमार याच कामासाठी ओळखले जातात. काँग्रेसचे संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे.

डी.के. शिवकुमार कोण आहेत?

मागच्या वर्षी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 17मे ला कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा भाजपाकडे 104 जागा होत्या आणि बहुमतासाठी त्यांना 112 जागा हव्या होत्या . बहुमतासाठी बरेच प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य झालं नाही. त्यावेळी काँग्रेसकडून सगळी व्यवस्था झाली होती. ही व्यवस्था करणारे नेते होते डी.के. शिवकुमार.

शिवकुमार वोक्कालिंगा समुदायाचे नेते आहे. कर्नाटकात ते डी.के.एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत.

2017 मध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळी ते चांगलेच चर्चेत होते. त्यावेळी गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सामील होत होते. पक्षाचे चाणक्य आणि गांधी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे अहमद पटेल यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं होतं. तेव्हा सर्व आमदारांना इगलटन रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं. हे रिसॉर्ट शिवकुमार यांच्या मालकीचं होतं. तिथे सर्व आमदारांना ठेवण्यात आलं. त्यामुळे अहमद पटेल यांच्या विजयाला हातभार लावला.

2002 मध्येही जेव्हा विलासराव देशमुखांचं सरकार धोक्यात आलं तेव्हाही महाराष्ट्रातल्या आमदारांना तिथेच ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे तत्कालीन काँग्रेस सरकार वाचलं. त्यामुळे एकूणच हे रिसॉर्ट काँग्रेससाठी लकी आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

राजकीय पटलावर उदय

डीके शिवकुमार आज काँग्रेसबरोबर असले तरी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध निवडणूक लढवून त्यांनी राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. 1985 मध्ये त्यांनी वोक्कालिंगा समाजाचे मोठे नेते एच.डी. देवेगौडा यांच्याविरुद्ध वयाच्या पंचविसाव्या वर्षी शड्डू ठोकला होता.

डीके शिवकुमार

फोटो स्रोत, Getty Images

या निवडणुकीत देवेगौडा मतदारसंघातून लढले आणि दोन्ही जागांवर त्यांना विजय मिळाला. त्यांपैकी सातनूरची जागा त्यांनी सोडली. याच मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणूक लढवून शिवकुमार विजयी झाले. 1989 मध्ये ते दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले आणि बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.

1999 मध्ये त्यांनी पुन्हा देवेगौडा परिवाराविरुद्ध निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी एच. डी. कुमारास्वामी यांचा पराभव केला. शिवकुमार यांचं राजकीय वजन तेव्हापर्यंत बरंच वाढलं होतं.

गांधी कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध

महाराष्ट्र सरकार वाचवण्यात हातभार लावल्यापासून गांधी कुटुंबियांशी त्यांची जवळीक वाढली. ते काँग्रेसचे संकटमोचक झाले. 2009 मध्ये ते कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी 250 कोटींची संपत्ती असल्याचं निवडणूक शपथपत्रात जाहीर केलं. ते कर्नाटकातील सगळ्यात श्रीमंत उमेदवारांपैकी एक होते. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही होते.

गुजरातच्या आमदारांना रिसॉर्टवर थांबवण्याच्या प्रकरणी त्यांच्या रिसॉर्टवर आयकर विभागाने छापा टाकला होता. तेव्हा तिथे काही मिळालं नसलं तरी त्यांच्या दिल्लीच्या घरातून 7.5 कोटी सापडले होते.

पुन्हा एकदा संकटमोचक

मागच्या वर्षी जेव्हा कर्नाटकात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तेव्हाही शिवकुमार यांचं महत्त्व अधोरेखित झालं. विश्वासमताच्या वेळी काँग्रेसचे दोन आमदार प्रताप गौडा पाटील आणि आनंद सिंह बेपत्ता होते. भाजपाने त्यांचं अपहरण केलं असा त्यांनी आरोप केला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जेव्हा विधानसभा अध्यक्ष मोजणी करत होते तेव्हा हे दोन्ही आमदार विधानसभेत आले.

डीके शिवकुमार

फोटो स्रोत, Getty Images

शिवकुमार तेव्हा अगदी प्रवेशद्वारावर उभे होते. भाजपची मदार याच दोन आमदारांवर होती. हे आमदार जेव्हा आले तेव्हा त्यांनी शिवकुमारांकडे दुर्लक्ष केलं. नंतर दुपारी हे आमदार आणि शिवकुमार एकत्र जेवताना दिसले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)