You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Indian Air Force : भारतीय वायुसेना प्रमुख बी. एस. धनोआंबद्दल या 11 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. हा धाडसी हवाईहल्ला भारताचे वायुदलप्रमुख बिरेंद्र सिंह धनोआ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला होता.
बालाकोट हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी लढाऊ विमानांसोबतच्या डॉगफाईटमध्ये भारताचं मिग-21 विमानं कोसळलं होतं. त्यात भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे होते.
त्यानंतर आता जवळपास चार ते पाच महिन्यांनी अभिनंदन पुन्हा भारतीय वायुसेनेच्या सेवेत दाखल झालेत. त्यांनी पंजाबच्या पठाणकोट एअरबेसवरून मिग-21 विमानातून उड्डाण केलं. यावेळी अभिनंदन यांच्यासोबत भारतीय वायुदलप्रमुख बी. एस. धनोआ हे सुद्धा होते.
निवृत्तीपूर्वीचं हे शेवटचं उड्डाण असल्याचं वायुदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी सांगितलं. धनोआ हे येत्या 30 सप्टेंबर 2019 रोजी निवृत्त होणार आहेत.
पंजाबमध्ये 7 सप्टेंबर 1957 रोजी जन्मलेल्या बिरेंद्र सिंग धनोआ यांना घरातूनच देशसेवाचा वारसा आहे. त्यांचे वडील एस एस. धनोआ हे बिहार कॅडरचे आयएएस अधिकारी होते, तर त्यांचे आजोबा संत सिंग हे ब्रिटीश-इंडियन आर्मीत कॅप्टन होते. बी. एस. धनोआंच्या आजोबांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता, असं द ट्रिब्यूननं म्हटलं आहे.
भारतीय वायुसेनेतील आतापर्यंतच्या 40 हून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत बी. एस. धनोआ यांनी भारताची मान उंचावण्याचं काम केलं.
बी. एस. धनोआंबद्दल महत्त्वाच्या गोष्टी :
बिरेंदर सिंह धनोआ यांच्याबद्दल भारतीय वायुसेनेच्या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.
1. बी. एस. धनोआ यांनी 1 जानेवारी 2017 रोजी वायुसेनेचं प्रमुखपद स्वीकारलं. जून 1978 मध्ये 'फायटर पायलट' म्हणून ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले.
2. धनोआ हे राष्ट्रीय भारतीय सैनिकी महाविद्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.
3. 'किरण' आणि 'मिग-21' ही लढाऊ विमानं प्रामुख्यानं धनोआंनी उडवली आहेत. मात्र, जॅग्वार ते अत्याधुनिक मिग-29 आणि सुखाई-30 एमकेआय असे विविध प्रकारची लढाऊ विमानं उडवण्याचा अनुभव धनोआ यांच्याकडे आहे.
4. धनोआंच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे आहेत. कारगील युद्धादरम्यानची त्यांची कामगिरी सर्वोत्कृष्ट मानली जाते. लढाऊ विमानाच्या पथकाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून धनोआंनी कारगीलच्या उंच डोंगरांवरून शत्रूला मागे सारलं होतं. त्यांच्या नेतृत्वातील पथकानं बॉम्बहल्ल्याच्या ज्या नव्या पद्धती अवलंबल्या, ज्या युद्ध पद्धतीच्या इतिहासात उत्कृष्ट मानल्या गेल्या.
5. वायुसेनेनं 1999 साली कारगील युद्धाच्या आधी धनोआ यांना आपलं कर्तव्य चोख बजावल्याबद्दल पदक देऊन सन्मानित केलं होतं आणि युद्धानंतर त्याच वर्षी शौर्य आणि नेतृत्त्व क्षमतेच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनसाठी प्रतिष्ठित युद्ध सेवा पदक प्रदान केलं होतं.
6. परदेशात भारतीय वायुसेनेच्या प्रशिक्षण टीम स्थापन करण्यासाठी बी. एस. धनोआ यांची विशेष निवड करण्यात आली होती.
7. ऑपरेशनल कमांड्स, संयुक्त प्रशिक्षण संस्था आणि वायुदल मुख्यालयात महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या बी. एस. धनोआ यांनी सांभाळल्यात. यात वायुदल मुख्यालयात टार्गेटिंग सेलचं संचालकपद, वेस्टर्न एअर कमांडचे युद्ध नियोजन आणि फायटर ऑपरेशनचं संचालकपद, वायुसेनेच्या मुख्यालयात एअर स्टाफचे (इंटेलिजियन्स) सहाय्यक प्रमुख अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
8. वायुसेनेचं प्रमुखपद सांभाळण्याआधी बी. एस. धनोआ हे सह-वायुसेनाप्रमुख होते. त्यांनी शत्रूविरोधातील एरियल टार्गेटिंग फिलॉसॉफी विकसित केली आणि सद्यस्थितीत हवाई युद्ध लढण्यास इंडियन एअर फोर्सचे एअर ऑपरेशन्स आणखी कणखर केले.
9. बी. एस. धनोआ हे उत्तम वाचक आणि लेखक आहेत. हवाई शक्ती आणि संयुक्त कारवाया हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय आहेत. तामिळनाडूतील राष्ट्रीय संरक्षण सेवा अधिकारी महाविद्यालयात त्यांनी वरिष्ठ मुख्य प्रशिक्षक (वायु) आणि मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
10. बी. एस. धनोआ यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी 1999 साली त्यांना युद्ध सेवा मेडल (YSM) आणि वायुसेना मेडल (VM), तर 2015 साली विशिष्ट सेवा मेडल (AVSM) या पदकांनी सन्मान केला आहे.
11. भारताच्या राष्ट्रपतींनी धनोआ यांना 1 ऑगस्ट 2015 मानद ADC म्हणून नियुक्त केले होते आणि 2016 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींद्वारे धनोआ यांना परम विशिष्ट सेवा मेडल (PVSM) पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
बी. एस. धनोआ यांची पुढची पिढी मात्र लष्करी सेवेत नाही. त्यांचे पुत्र जसमान सिंग हे विधी विषयातील पदवीधर आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)