You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Indian Air Force : भारतीय वायुसेना - नरेंद्र मोदींनी भाषणात उल्लेख केला ते 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पद नेमकं कसं असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'चा उल्लेख केला आहे.
ते म्हणाले, "लाल किल्ल्यावरून मी एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या विषयाचे अभ्यासक याची मागणी करत आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय केला आहे की, आता आम्ही 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ची व्यवस्था करत आहोत. या पदाच्या निर्मितीनंतर तिन्ही दलांच्या प्रमुखपदी एक प्रभावी नेतृत्व मिळेल."
याशिवाय पंतप्रधान कार्यालयानं ट्वीट केलं आहे की, "लष्कर, नौदल आणि वायुदलातील समन्वय परिणामकारक पद्धतीनं साधण्यासाठी देशात 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदाची निर्मिती करण्यात येईल. यामुळे देशातील सैन्य अधिक परिणामकारकपणे काम करेल."
'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणजे काय?
सध्या देशात लष्करासाठी लष्करप्रमुख, नौदलसाठी नौदलप्रमुख, तर वायूदलासाठी वायुदल प्रमुख ही पदं कार्यरत आहेत. 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' या पदावरील व्यक्ती या तिन्ही दलांचा प्रमुख म्हणून काम पाहिल.
याविषयी सुरक्षाविषयांचे अभ्यासक विजय खरे सांगतात, "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद सरकारला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याचं एकमेक केंद्र असेल. लष्कर, नौदल आणि वायूदल यांचं समन्वय साधून सुरक्षेविषयी सरकारला रिपोर्ट करायचं काम 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' करेल.
पण, या पदाच्या निवडीनंतर संघर्ष उद्भवण्याची चिन्हं असू शकतात, असं मत खरे मांडतात.
"या पदासाठी कशापद्धतीनं निवड होईल, याचं कोणतंही मॉडेल अद्याप सरकारनं दिलेलं नाही. पण या पदाच्या निवडीहून संघर्ष होण्याची शक्यता असू शकते. या तिन्ही दलांचे प्रमुख आजवर राष्ट्रपतींना रिपोर्ट करत असत. आता मात्र ते 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' यांना रिपोर्ट करतील. संविधानानं राष्ट्रपतींना सुप्रीम कमांडर म्हटलं आहे. मग आता या पदामुळे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' सुप्रीम कमांडर होतील का, हाही प्रश्न आहे," खरे पुढे सांगतात.
'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना रिपोर्ट करेल, असंही ते म्हणतात.
'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदाच्या निर्मितीमुळे देशाची लढण्याची क्षमता वाढेल, असं निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सांगतात.
ते म्हणतात, "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ची गेल्या 70 वर्षांपासून गरज आहे. भारतीय सैन्यानं तयार केलेल्या वेगवेगळ्या स्टडी ग्रूप्सनं या पदाच्या निर्मितीची शिफारस केली आली आहे. यामुळे देशाची लढण्याची जी साधनं आहेत, त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं होईल. यामुळे एक माणूस तिन्ही दलांची ताकद एकत्र आणून लढण्याचं नियोजन करेल आणि त्यानंतर ती लढाई चांगल्या पद्धतीनं लढली जाईल. शांततेच्या काळात प्रशासन, ट्रेनिंग यांत तिन्ही दलांमधील समन्वय चांगला होईल. तर युद्धाच्या काळात तिन्ही दलांमध्ये समन्वय साधला जाईल आणि त्यामुळे लढण्याची क्षमता वाढेल."
"अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या प्रगत देशांकडे 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' आहे. आपल्याकडे मात्र राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आजपर्यंत नसल्यानं हे पद निर्माण होऊ शकलं नाही," असं ते पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)