विधानसभा निवडणूक: प्रकाश आंबेडकर आणि नांदेडशी असलेलं त्यांचं जुनं 'कनेक्शन'

    • Author, विनायक गायकवाड
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, नांदेडहून

येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड ही एक राजकीय प्रयोगशाळा बनलीये आणि त्याला तशी कारणंही आहेत. अशोक चव्हाणांच्या रूपात नांदेडनं महाराष्ट्राला मुख्यमंत्री तर दिले. पण त्याचबरोबर किनवट पॅटर्नच्या रूपात प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन महासंघाला यशही नांदेडमध्येच मिळालं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर हे संबंध पण तसे जुने.

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला फटका बसला आणि अशोक चव्हाणांवर त्यांच्याच गडात पराभवाची नामुष्की ओढावली.

त्यामुळे विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी शक्य आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण काँग्रेस आणि वंचितमध्ये आघाडी कधीच शक्य नसल्याचं नांदेडमधील जाणकार सांगतात. यासाठी या दोन्ही पक्षातील दोन बड्या नेत्यांचा म्हणजे अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर यांचा इतिहास कारणीभूत आहे.

दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे सांगतात की, 1986 च्या लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकर नांदेडमधून उभे होते आणि त्याच निवडणुकीत अशोक चव्हाणांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. त्या पराभवाचं शल्य आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेच्या मनात आजही होतं आणि जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या माध्यमातून मैदानात उतरून काँग्रेसला आव्हान दिलं तेव्हा त्यांच्या त्या जखमांना धुमारे फुटले आणि त्याचंच रूपांतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील अशोक चव्हाणांच्या पराभवात झालं.

दैनिक सकाळचे आवृत्ती संपादक दयानंद मानेंच्या मते याच इतिहासामुळे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीच्या चर्चा रंगल्या, नांदेडकरांना स्पष्ट माहिती होतं की हे का शक्य नाही.

वंचित, काँग्रेस आणि भाजप

पण एकीकडे वंचित आणि काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी हे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला गरज असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही ही ठाम भूमिका घेतलीये. तर आता या समीकरणात मुख्यमंत्र्यांनीही उडी मारलीये. नांदेडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी वंचितचा पुन्हा एकदा उल्लेख केला. पुढील विरोधी पक्षनेता वंचितचा राहू शकतो असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम आहे असे आरोप होत असतानाच काँग्रेसच्या आणि अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. फक्त वंचितच नाही तर एमआयएम फॅक्टरही या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे.

नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर दलित आणि मुस्लीम मतदार आहेत. भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे इतकी वर्षं त्यांना काँग्रेस हाच एक पर्याय होता पण आता वंचितच्या सक्रीय राजकारणात येण्यानं त्यांच्यासाठी एक नवा पर्याय उभा राहिलाय असं ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी सांगतात.

लोकसभा निवडणुकीत नांदेडचा गड गमावल्यानंतर अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा आपलं सगळं लक्ष जिल्ह्यावर केंद्रीत केलंय. प्रदेशाध्यक्षपद गेल्यावर आता चव्हाणांची नांदेडमध्ये परीक्षा आहे असं नांदेडमधील लोकमतचे आवृत्ती प्रमुख विशाल सोनटक्के सांगतात.

सकाळचे आवृत्ती संपादक दयानंद मानेंच्यामते भाजपची नांदेडमधली परिस्थितीही फार काही चांगली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गेल्या काही वर्षांत नांदेडमध्ये बूथ पातळीवर काम केलंय. पण हिंदुत्ववादी अजेंड्यामुळे त्यांना नांदेडमधील मुस्लीम आणि दलित मतांपासून दूर रहावं लागलंय. पण वंचितच्या एंट्रीनं आता ही राजकीय गणितं बदलू शकतील.

नांदेडच्या तरूणांची वंचितला का आहे पसंती?

'आम्ही पार कंटाळलोय, जो तो येतो तो आपल्या फायद्याचा विचार करतो. निवडणूक आली का आश्वासनांचा महापूर येतो आणि मग 5 वर्षांत याचं रुपांतर दुष्काळात होतं. आम्ही काय फक्त दुष्काळात जगायचं आणि दुष्काळातच मरायचं का?' नांदेडच्या पीपल्स कॉलेजच्या नीलमनं यक्षप्रश्न मांडला होता.

मराठवाडा आणि दुष्काळ हे दुर्दैवानं झालेलं समीकरण, पण आज तरुणांना यातून मार्ग हवाय. "इतकी वर्षं अशोक चव्हाण होते, कधी मुख्यमंत्री तर कधी खासदार पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही. सध्याचे मुख्यमंत्री फक्त आश्वासनं देतात, जे काही मिळतं ते विदर्भाला," असं विद्यार्थी म्हणत होते.

'मराठवाडा कालही कोरडा होता आणि आजही आहे पण उद्या आम्हाला ही कोरड नकोय आणि म्हणूनच काँग्रेस, भाजपसोडून वंचितचा पर्याय आम्हाला यासाठी जवळचा वाटतो'. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारे नांदेडचे तरूण तावा तावानं बोलत सांगत होते.

मराठवाडा हा दुष्काळग्रस्त प्रदेश. पाण्याची समस्या मराठवाड्यासाठी सगळ्यांत महत्वाची. पण सरकार कोणतंही असो आजपर्यंत अनेक आश्वासनं देऊनही मराठवाड्याच्या समस्या सुटलेल्या नाहीत. वॉटर ग्रीडचा प्रश्न असेल, बेरोजगारी असेल आजपर्यंत आम्हाला अनेक आश्वासनं मिळाली पण पुढे काहीच झालं नाही. इथे काहीच नाही तर मग आम्हा जाणारच ना मुंबई-पुण्याला? प्रदीप सांगत होता.

नांदेडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि नांदेडसाठी अनेक घोषणा केल्या पण येत्या निवडणुकीत या घोषणा समोर ठेवून नांदेडकर आपला कौल देतील की परंपरागत चालत आलेल्या पॅटर्नवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यात मत देतील हे बघावं लागेल. पण नांदेडकरांचा नूर बघता या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हा एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर ठरणार यात शंका नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)