You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विधानसभा निवडणूक: आदित्य ठाकरे: कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान दिसला नाही #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही - आदित्य ठाकरे
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आतापर्यंत 76 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात शेतकरी आणि बेरोजगाऱ्यांचा आक्रोश प्रचंड आहे. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, पण अद्याप एकही शेतकरी मला दिसून आलेला नाही, असं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
जनआशीर्वाद यात्रा औरंगाबादला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे कर्जमाफीबद्दल बोलत होते. "शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्याची जाणीव होत आहे. या त्रुटी भरून काढाव्या लागतील," असं ठाकरे यांनी म्हटलं.
तसंच शिवसेनेत होत असलेल्या मेगा पक्षप्रवेशावर बोलताना आदित्य म्हणाले की सेनेत "स्किल-बेस्ड इनकमिंगवर भर दिला जात आहे".
2. पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणाऱ्यांनाच देशद्रोही ठरवता? - खरगे
"हिंदूचा मक्ता फक्त भाजपनेच घेतलाय, असं दाखवले जात आहे. आम्ही देखील हिंदू आहोत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काँग्रेसला कितीही शिव्या दिल्या तरी काँग्रेस संपणार नाही," असं काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत म्हटलं आहे.
"पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच होतो आणि आम्हालाच देशद्रोही म्हटलं जात आहे. हे कितपत योग्य आहे," असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
3. स्विस बँकेतील पैशाची माहिती मिळणार
भारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान माहितीची विनाअडथळा देवाणघेवाण पद्धती रविवारपासून लागू होणार आहे. यामुळे भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशासंबंधीची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने दिली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रकाशित केली आहे.
'काळा पैसा'विरोधात केंद्र सरकारच्या लढ्यातील ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. 'CBDT'ने प्राप्तिकर विभागासाठी या संदर्भात एक धोरण आखले असून, या संदर्भात स्विस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.
4. मनुष्यबळ विकास मंत्र्यांना आमंत्रणावरून IIT मुंबईत विद्यार्थ्यांचा विरोध
चरक ऋषींनी अणू-रेणूंचा शोध लावला, तसंच नासानेही संस्कृतच्या पायावर कॉम्प्युटरची यंत्रणा असल्याचं वक्तव्य केलं आहे, अशी वक्तव्य करून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल 'निशांक' चर्चेत आले होते. आता त्यांनाच IIT मुंबईच्या पदवीदान सोहळ्यासाठी आमंत्रण दिल्यावरून संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे.
"देशाच्या एका मोठ्या वैज्ञानित संस्थेत भाषण करताना त्यांनी तथ्यांची मोडतोड करून देशप्रेमासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. ही तार्किक भ्रष्टाचार आहे," असं इन्साईट या विद्यार्थ्यांच्या एका मासिकात म्हटलं आहे.
IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या वक्तव्याचा निषेध करत संस्थेच्या व्यवस्थापनाला विनंती केली आहे की त्यांनी या पदवीदान सोहळ्यासाठी दुसऱ्या पाहुण्याचा विचार करावा. ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
5. बारामतीची सिद्धी पवार मोदींसोबत बसून चंद्रयान 2चं लँडिंग पाहणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) प्रक्षेपित करण्यात आलेलं चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर लवकरच उतरणार आहे. हा क्षण पाहण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, पंतप्रधान मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत बारामतीच्या सिद्धी पवार या विद्यार्थिनीने विजय मिळवला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर शाळेची नववीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी विश्वंभर पवार हिने इस्रोने आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पाच मिनिटात अवघड प्रश्नांची उत्तरं दिली. तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)