प्रो कबड्डी 2019: कबड्डी रेफरी आरती बारींनी कसं निवडलं हे करिअर?

आरती बारी, कबड्डी, प्रो कबड्डी
फोटो कॅप्शन, आरती बारी - भारताच्या पहिल्या दोन महिला कबड्डी रेफरींपैकी एक
    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

प्रो कबड्डीचा सातवा हंगाम सध्या सुरू आहे. रोज संध्याकाळी टीव्हीवर दिसणाऱ्या या सामन्यांदरम्यान खेळाडूंबरोबरच मैदानावरची आणखी एक व्यक्ती गेली काही वर्षं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मैदानाबाहेर तिच्या गावी म्हणजे मुंबईत, ती बेस्ट बसस्टँडवर जरी दिसली तरी तरुण मुलं तिच्याबरोबर सेल्फी घेतात. आणि तिचा ऑटोग्राफही घेतात.

आरती बारी असं तिचं नाव. ती आहे भारतातील पहिल्या दोन महिला रेफरींपैकी एक. आणि मागच्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ ती हे काम करतेय.

कबड्डीपटू ते रेफरी

'कबड्डी हा आमचा श्वास आहे. तिच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. जिल्हा स्तरावर आणि काही नॅशनल स्पर्धांमध्ये खेळत होते.

पण, कबड्डी सोडण्याचा विचार सहन होत नव्हता.' आरतीचं या खेळावरचं प्रेम फक्त तिच्या शब्दातच नाही तर चेहऱ्यावरही जाणवत राहतं.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे, असं आपण म्हणतो. त्यामुळे आपल्या मातीवर जसं आपण उपजत प्रेम करतो, तसंच महाराष्ट्राचा ग्रामीण भाग आणि मुंबईतल्या चिंचपोकळी, लालबाग परळ भागातले लोक कबड्डीवर उपजत जीव लावतात.

आरती बारी ही त्यातलीच एक.

आरती बारी, कबड्डी वर्ल्ड कप

फोटो स्रोत, आरती बारी

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय सामन्यात रेफरी म्हणून भूमिका निभावताना

त्यामुळे खेळाडू म्हणून कारकीर्द संपताना तिला कबड्डीचं मैदान सोडायचं नव्हतं. त्याचवेळी लग्नाचंही वय झालं होतं.

'माझं लव्ह मॅरेज आहे. आणि लग्न करण्यापूर्वी मी त्यांना स्पष्टच सांगितलं होतं, एकतर कबड्डी करेन, नाहीतर लग्न करेन. कबड्डीला सोडणार नाही.'

अगदी सहजपणे आरती हे सांगते. विशेष म्हणजे तिचे पती अजय बारी यांनी कबड्डीच्या मध्ये येणार नाही, असं वचन त्यांना त्यावेळी दिलं.

आणि ते आजतागायत पाळलं आहे.

लग्नानंतर झाली रेफरी

त्यामुळे लग्नानंतरही आरती यांचा कबड्डीचा प्रवास सुरूच राहिला. 'कबड्डीचं मैदान सोडायचं नव्हतं. कोचिंग करत होते.

पण, आणखी आव्हानात्मक काय करता येईल याचा विचार मनात सुरू होता. आणि तिथेच रेफरी आणि स्कोअरिंग करण्याचं मनात ठरवलं.'

पण, रेफरी होण्यात खरं आव्हान काय आहे?

आरती बारी, कबड्डी

फोटो स्रोत, आरती बारी

फोटो कॅप्शन, रेफरी होण्यासाठी हवी अचूक नजर आणि आत्मविश्वास

'कबड्डीच्या मैदानात मध्यरेषा, तीन सीमारेषा, बोनस रेषा आणि बगलाईन अशा चार लाईन असतात. आणि दोन्ही बाजूचे खेळाडू प्रत्येकी सात.

अशावेळी यातल्या कुणीही एक जरी रेषेला स्पर्श केला असेल तर काही सेकंदांच्या आत रेफरींनी आपला निर्णय द्यायचा असतो. नजर तर हवीच. शिवाय तुमचा निर्णय खेळाडूंना पटायला हवा.'

आरतीचं म्हणणं खरंच आहे. कारण, कबड्डीमध्ये खेळाडू एकमेकांना भिडतात, आक्रमकपणे खेळतात, हा बॉडी कॉन्टॅक्टचा खेळ आहे. अशावेळी निर्णय देण्यात अचूकता नसेल, तुमचं लक्ष जरा जरी विचलित झालं, तर खेळाडू आणि प्रेक्षकही मैदान डोक्यावर घेतील. तुमचा निर्णय योग्यच आहे हे सांगणारा आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे.

अचूकता आणि आत्मविश्वास

त्यासाठी रेफरींची होणारी परीक्षाही कठीण असते. जिल्हास्तरीय परिक्षेत आरतीला कबड्डीच्या बिनचूक नियमांबरोबरच देहबोलीविषयीचे प्रश्नही विचारण्यात आले होते.

तोंडी परिक्षेवर या निवड प्रक्रियेचा मुख्य भर होता. आणि परीक्षा पास झाल्यावर आधी मुलींच्या सब ज्युनिअर मॅच आणि मग ज्युनिअर, पुढे सीनिअर...

पुरुषांच्या सामन्यांमध्ये रेफरी म्हणून काम करण्याची संधीही तिला लगेचच मिळाली.

सुदैवाने आरती 2000मध्ये ही परीक्षा पास होईपर्यंत कबड्डी खेळाच्या कक्षा रुंदावू लागल्या होत्या. कबड्डीने सीमोल्लंघन केलं. आणि एशियन गेम्समध्ये कबड्डीचा शिरकाव झाला, पाठोपाठ कबड्डीचा वर्ल्ड कप भरवण्याच्याही हालचाली सुरू झाल्या.

आरतीला त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करता आलं. किंबहुना आरती आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये काम केलेली पहिल्या दोन भारतीय महिला रेफरींपैकी एक आहे. जमुना वेंकटेश आणि आरती या गुजरातमध्ये झालेल्या कबड्डी वर्ल्ड कपमध्ये एकत्र काम करत होत्या. त्यानंतर दोघींना इराण आणि मागच्या आशियाई खेळांसाठी जकार्ताला जाण्याचीही संधी मिळाली.

इराणमधला अनुभव

'इराणमध्ये मुलींच्या सामन्यांना मुलीच रेफरी म्हणून काम पाहतात. मुलांना तिथे प्रवेश नाही. त्यामुळे पुरुषांचे सामने इराणमध्ये करता आले नाहीत.

पण, महिलांच्या सामन्यातून खूप काही शिकायला मिळालं.' इराणमध्ये हिंडण्या फिरण्याचा अनुभवही मूळात खूप शिकवणारा होता.

कबड्डी, आरती बारी, इराण

फोटो स्रोत, आरती बारी

फोटो कॅप्शन, इराणमध्ये खेळाडू घालतात हिजाब आणि घोट्यापर्यंत पूर्ण कपडे

'तिथल्या मुलींना खूप सारं स्वातंत्र्य नाहीए आपण ऐकून असतो. पण, असं असताना त्या मध्यममार्ग शोधून स्वत:ची प्रगती करतात हे पाहून बरं वाटतं.

"कबड्डी त्यांना पूर्ण कपड्यात खेळावी लागते. डोक्यावर हिजाब आणि कपडे अगदी पायाच्या घोट्यापर्यंत. असं असताना, आणि थंडीत किंवा तितक्याच गरमीत पूर्ण कपडे घालून महिला कबड्डी खेळतात. खेळाची मजा लुटतात. मी ही तिथे स्कार्फ घालून वावरायचे," कविता सांगतात.

कबड्डीने आरतीला जग दाखवलं. तिचा मुंबईतल्या दहीहंडी उत्सवातही सहभाग असतो. त्या माध्यमातूनही ती अमेरिकेतील टाईम स्क्वेअरला झालेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या पथकातून सामील झाली.

प्रो कबड्डी लीगमध्ये महिला राज

आणि 2013मध्ये प्रो कबड्डी स्पर्धेचं प्रसारण टीव्हीवर नियमितपणे सुरू झालं. आणि हा ग्रामीण खेळही घराघरात पोहोचला. 2015पासून आरतीही लीगमध्ये रेफरी म्हणून काम पाहतेय. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ती 'फेमस' झाली आहे.

यंदाच्या हंगामात या लीगमध्ये आरतीबरोबरच आणखी तीन महिला आहेत. आरती, मनस्विनी साहू, सस्मिता दास आणि मैत्रेयी राव. एरवीही कबड्डीत महिला रेफरींची संख्या वाढतेय. आणि त्यांनाही यात रस वाटू लागला आहे.

आरतीची मुलगी आता पंधरा वर्षांची आहे. ती घरच्या जबाबदाऱ्यांपासून बरीचशी मुक्त आहे. तिची जी काही स्वप्न आहेत ती कबड्डीसाठी आणि कबड्डीतच. हा खेळ ऑलिम्पिक पर्यंत जावा आणि तिथे रेफरी म्हणून काम करण्याची संधी मिळावी, हे स्वप्न जागेपणी ती बाळगून आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)