जीडीपीमध्ये घसरण: भारताचा जीडीपी वृद्धिदर 5 टक्के, गेल्या तिमाहीपेक्षा 0.8 टक्क्यांची घसरण

फोटो स्रोत, Getty Images
भारताचा जीडीपी वृद्धिदर 5 टक्के आहे. गेल्या तिमाहीपेक्षा 0.8 टक्क्यांची घसरण झाल्याचं अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 8 टक्के इतका होता.
गेल्या सात वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी पीछेहाट आहे. उत्पादन क्षेत्र आणि कृषीक्षेत्रातील घसरणीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचं दिसलं आहे.
अर्थ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्या आपली अर्थव्यवस्था 2.6 ट्रिलियन डॉलर इतकी आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. बॅंकांची स्थिती सुधारण्याबाबत सरकार गंभीर असल्याचं सीतारामण यांनी सांगितलं. बुडित कर्ज वसूल करण्याबाबत पावलं उचलली जातील असं सीतारीमण यांनी सांगितलं.
पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंट बॅंक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांचं विलीनीकरण करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बॅंक ही अॅंकर बॅंक राहील. या बॅंकेची उलाढाल 18 लाख कोटी रुपयांची होईल.
बॅंकांचं प्रशासन सुधारण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल. 250 कोटी रुपयांच्या वर कर्ज घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची परवानगी आवश्यक असणार आहे. त्यामुळे कर्ज बुडण्याची शक्यता कमी केली जाईल.
रिअल इस्टेटची स्थिती सुधारण्याबाबत पावलं उचलणार असल्याचं सीतारामण यांनी सांगितलं.
निर्मला सीतारामण यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज भारताची अर्थव्यवस्था 2.6 ट्रिलियन डॉलरची आहे. 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचं देशाचं ध्येय आहे.
- ग्रॉस एनपीए 8.65 लाख कोटीवरून आता 7.90 लाख कोटी झाला आहे
- आता 14 सार्वजनिक बँका नफ्यात आहेत, 2018मध्ये ही संख्या 2 इतकी होती.
- पंजाब नॅशनल बँक, ऑरिएन्टल बँक आणि यूनायटेड बँक यांचं विलीनीकरण होणार
- कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होणार
- यूनियन बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलीनीकरण होणार
- इंडियन बँक आणि अलहाबाद बँकेचं विलीनीकरण होणार
- बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका राष्ट्रीय बँक म्हणून काम करेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








