You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे: अडीच वर्षांच्या चिमुकलीला चावे घेऊन संपवलं, आरोपी POCSO अंतर्गत अटकेत
- Author, हलिमाबी कुरेशी
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
"मी बाई बाई म्हणून आवाज दिल्यावर माझ्याकडे बघत प्रतिसाद दिला आणि जीव सोडला," मुलीच्या आईचे हे वाक्य ऐकून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल.
पुण्यात अडीच वर्षाच्या एका चिमुकलीचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून झाल्याची घटना आज बाहेर पडली नि अख्खं शहर हादरलं. पुण्यात मालधक्का चौक परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील ही चिमुकली होती. आईवडिलांबरोबर झोपलेली असताना आरोपीने तिला उचलून नेलं नि तिला एका रेल्वे बोगीत नेऊन मारहाण केली, तिच्या शरीराचे चावे घेतले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. आरोपीने तिला त्याच अवस्थेत टाकून तिथून पळ काढला.
रेल्वे पोलिसांना रेल्वेच्या बोगीत ही मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली, तेव्हा तिच्या डोक्याला मोठी जखम झाली होती. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान बुधवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
तिच्या शरीरावर चावे असल्याने पोलीस या प्रकरणात डेंटल फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत आहेत. या तज्ज्ञांचा अहवाल महत्त्वाचा ठरेल, असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितलं.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी प्रथमेश गायकवाड या 19 वर्षांच्या संशयित आरोपीला अटक केली आहे.
नेमकं काय झालं?
या चिमुकलीच्या सावत्र वडील आणि मामांचं दहीहंडी उत्सवादरम्यान आरोपी प्रथमेश गायकवाडबरोबर भांडण झालं होतं, त्याला त्यांनी मारहाणही केली होती. त्या रागातून आपण त्या मुलीचा खून केल्याचं कबूल केल्याचं पुणे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
घटना घडली त्या रात्री पीडित मुलगी तिच्या आईजवळ झोपली होती. सकाळी उठल्यावर ती दिसली नाही म्हणून आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांत गेल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना एक मुलगी सापडली असून ती ससून रुग्णालयात दाखल आहे.
तेव्हा ससूनला गेल्याचं या आईने सांगितलं. "मुलीला आधी पाहिल्यावर कळलं नाही, तिचे केस काढण्यात आले होते. शरीरावर जखमा होत्या. डोळा काळा-निळा झाला होता, गालावर, कानावर चावे होते. मी बाई बाई म्हणून आवाज दिल्यावर माझ्याकडे बघत प्रतिसाद दिला आणि जीव सोडला..." असं सांगत तिच्या आईने हंबरडा फोडला.
आरोपी मुलीला घेऊन जातानाचं CCTV फुटेज पोलिसांना मिळालं, त्याआधारे आरोपी प्रथमेशला अटक करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.
शवविच्छेदन अहवालात बालिकेचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झालं. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या अनेक बातम्या दिवसभरात चालल्याने हे प्रकरण मोठं झालं होतं. मात्र पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय, असं पोलिसांनी सांगितलं.
मात्र आरोपीने मुलीला चावे घेणं हीदेखील लैंगिक विकृती असू शकते, त्यामुळे या आरोपीवर पॉक्सो (Protection of Children from Sexual Offences Act) म्हणजेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 8 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुन्हा भीतीचं वातावरण
पुणे स्टेशन परिसर, मालधक्का तसेच बंड गार्डन या परिसरात मोठ्या प्रमाणात फुटपाथवर झोपड्यांमध्ये स्थलांतरित कुटुंबं अनेक वर्षांपासून राहत आहेत. तुम्हाला घर मिळवून देऊ, या स्थानिक राजकारण्यांच्या आश्वासनामुळे अनेक जण 25-25 वर्षांपासून या परिसरात फुटपाथवरच राहत आहे. पीडितेचं कुटुंब देखील या परिसरात वास्तव्यास आहे.
वीस दिवसांपूर्वी याच परिसरात राहणाऱ्या शबनम शेख यांच्या घरात एक अज्ञात व्यक्ती शिरली होती. "तो माझ्या मुलीला घेऊन जायचा प्रयत्न करत होता. मुलीने आरडाओरड केल्याने मी जागी झाले. हे पाहून त्याने पळ काढला," असं शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "या घटनेनंतर माझी मुलगी कोणत्याही अनोळखी माणसाला बघितलं तरी घाबरते, थरथर कापते... बाबा आयेंगा," असं म्हणते.
मात्र या ताज्या घटनेमुळे या परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे. पूजा काळे यांचे आईवडील सोलापुरातून काम धंद्यासाठी पुण्यात आले होते. जवळपास 27 वर्षांपासून त्या इथे राहत आहेत. या घटनेनंतर त्यांनी सरकारकडून संरक्षणाची मागणी केली आहे.
"मला माझ्या नातींची काळजी वाटते. आमच्याकडे वोटिंग कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, अशी सगळी कागदपत्रं आहेत. निवडणूक आली की नेते घर देण्याचं आश्वासन देतात. पण काही होत नाही," असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)