विरोधक मारक शक्तीचा वापर करत असल्यामुळे भाजप नेत्यांचा मृत्यू : साध्वी प्रज्ञा #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. विरोधक मारक शक्तीचा वापर करत असल्यामुळे भाजप नेत्यांचा मृत्यू - साध्वी प्रज्ञा

विरोधक भारतीय जनता पक्षाविरुद्ध मारक शक्तीचा वापर करत असल्यामुळे भाजपच्या नेत्यांचे मृत्यू होत आहेत, असे वक्तव्य खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे. भाजपचे दिवंगत नेते अरूण जेटली आणि बाबुलाल गौर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांनी हा तर्क मांडला. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

"लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला एक महाराज भेटले होते. सध्या वाईट काळ सुरू असल्याचं महाराजांनी सांगितलं. विरोधी पक्ष मारक शक्तीचा प्रयोग करत असल्याचं या महाराजांनी सांगितलं," असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं.

भाजपचं नुकसान व्हावं म्हणून हे सगळं सुरू आहे. तसंच महाराजांनी आपल्यालाही काळजी घेण्यास सांगितलं असल्याचं प्रज्ञासिंह यांनी सांगितलं.

2. मंदीतून सावरण्यासाठी RBI ची मोदींना साथ; केंद्राला देणार 1.76 लाख कोटी!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या राखीव फंडातले तब्बल 1 लाख 76 हजार कोटी रुपये केंद्र सरकारला देणार आहे. RBI च्या संचालक मंडळाच्या सोमवारी (26 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. ही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

या बैठकीनंतर आरबीआयने म्हटलं, की बोर्डाने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 1 लाख 23 हजार 414 कोटी रुपये ही अधिक्याची रक्कम 2018-19 साठी असणार आहे. याशिवाय अधिक्याच्या सुधारित वाटप व्यवस्थेतील तरतुदींनुसार 52 हजार 637 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

3. विधानसभेत राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करू- पंकजा मुंडेंचा निर्धार

मोदीजींनी लोकसभेत काँग्रेस मुक्त भारत केला आता विधानसभेत राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करू असं विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. महाजनादेश यात्रेच्या आष्टी इथल्या सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

'पाच वर्षांत एकतर विरोधीपक्ष होताच कुठे हे माहीत नाही. या विरोधी पक्षासारखा बकवास विरोधी पक्ष राजकारणाच्या इतिहासात कधी पहिला नाही,' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

4. फितुरी करून पक्ष सोडतात ते सूर्याजी पिसाळ - जयंत पाटील

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत संपूर्ण आयुष्य आमच्या पक्षात घालवलं, ज्यांना शरद पवारांनी दिशा दाखवली ते जर पक्ष बदलण्याचा विचार करीत असतील तर त्यांचा पराभव शरद पवारांचे मावळे करतील. हे सगळे सूर्याजी पिसाळ असून जनताच त्यांना धडा शिकवेल," अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील हे अनुपस्थित राहिले. यामुळे पाटील यांनी डॉ. पाटील पिता-पुत्रांचा अप्रत्यक्ष समाचार घेत सडकून टीका केली.

ही बातमी ईटीव्ही भारत मराठी वेबसाईटने दिली आहे.

5. चिदंबरम अडचणीत, सीबीआय कोठडीत वाढ

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणातील चिदंबरम यांच्याविरोधातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सीबीआय कोर्टाने त्यांच्या कोठडीत 4 दिवसांनी वाढ केली आहे.

30 ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीनं आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे.

सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ केली. येत्या 48 तासांत चिदंबरम यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)