You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एसटी चालवणाऱ्या महिला: ‘मला माझ्या एसटी ड्रायव्हिंगसह जो मुलगा स्वीकारेल, त्याच्याशीच मी लग्न करेन’
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"शीतल पवार.. 23 वर्षांची मुलगी आहे. खूप हुशार आहे. सहा महिन्यांचं वर्ग प्रशिक्षण पूर्ण केलं, पण आता खरी कसोटी ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग आहे. ते सुरू झालं आणि घरचे आता तिचं लग्न ठरवतायेत.
"सासरच्यांना एसटी ड्रायव्हरची नोकरी मान्य नाहीये. त्यामुळे गेले काही दिवस तिच्या घरचे तिला ट्रेनिंगला येऊ देत नाहीयेत. मी खूप समजावलं पण तितका फरक पडला नाही. आता तुम्ही आला आहात, तुम्ही पण बोलून बघा," यवतमाळचे विभाग नियंत्रक S. P. जोशी सांगत होते.
"आज आलीये का शितल?" असं त्यांनी विचारल्यावर तिच्या प्रशिक्षकांनी "हो सर!" उत्तर दिलं.
"सगळ्याच मुली खूप हुशार आहेत. पण शहरांमध्ये आणि गावांमध्ये फरक पडतो. पण प्रत्येकीच्या काही ना काही घरगुती अडचणी आहेत. पण ते सांभाळत सगळ्या येतात ट्रेनिंगला..." हे सांगत असताना एस. पी. जोशी या प्रकल्पामधले अनेक बारकावे आम्हाला समजावून सांगत होते.
एसटी बाहेरगावी घेऊन जात असताना या मुलींसाठी बाथरूम, चेंजिंग रूम आणि इतर सोयींबाबत आम्ही विचारपूस केली. तेव्हा या मुलींचा एसटी ड्रायव्हर बनण्याचा प्रवास किती खडतर आहे, हे जाणवत होतं.
रात्री अपरात्री एसटी घेऊन जिथे ड्यूटी लागेल तिथे इतक्या प्रवाशांना घेऊन जावं लागेल. डेपोमध्येच फ्रेश व्हावं लागेल. रस्त्यामध्ये बाथरूमच्या सुविधा नाहीत.. त्याचं काय करणार? अनेक मुलींची लग्न झालीयेत. त्यांना लहान मुलं आहेत. हे सगळं सांभाळून या मुली ही नोकरी करतील का, असे अनेक प्रश्न डोळ्यांसमोर येत होते.
पाहा व्हीडिओ
या प्रश्नांबरोबरच या मुलींना भेटण्याची उत्सुकता वाढली होती. आम्ही विभाग नियंत्रक कार्यालयातून ट्रेनिंग सेंटरकडे निघालो, तेव्हा या सर्व मुली मैदानात जमल्या होत्या. ड्रायव्हरचा युनिफॉर्म घालून त्या तयार होत्या.
अचानक पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या जणींशी बोलायला वेळ मिळाला. 21 जणी... सगळ्या आदिवासी कुटुंबातून आलेल्या... कुणाच्या घरचे सगळे शेती करतात तर कुणाच्या घरचे मजुरी...!
त्यांच्यापैकीच एक ज्योत्स्ना ठाकरे आम्हाला सांगू लागली, "मी डबल MA झाली आहे. घरचे शेती करतात. MPSCची पण तयारी करतेय. ती करत एसटी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी पात्र ठरले. मग ट्रेनिंग सुरू झालं. अजून ते पूर्णपणे झालेलं नाही.
"तितक्यात लग्नाचं सुरू झालं. जे पाहुणे मला बघायला येतात, त्यांचं एकच असतं 'ही एसटीत ड्रायव्हिंग करणार, मग कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं काय? ही ड्रायव्हरची नोकरी सोड, मग लग्न करू', असं सांगितलं जातं. पण आता मी ठरवलय, जो मुलगा मला या ड्राईव्हिंगसह स्वीकारेल, त्याच्याशीच मी लग्न करणार."
ज्योत्स्नाचं आम्ही ऐकत असताना एका मुलीच्या चेहर्यावर खूप आनंद दिसत होता. तिचे डोळे अत्यंत बोलके होते. तिला काहीतरी सांगायचंय, असं वाटत होतं.
आम्ही तिच्याशी बोललो, तेव्हा ती सांगू लागली: "मी आज एक महिन्यांनंतर ट्रेनिंगला आलेय. माझं मामाच्याच मुलाशी लग्न ठरलं. पण सासरचे ही ड्रायव्हिंगची नोकरी नाही करायची म्हणून अडून बसले होते. पण मी इतक्या दिवसांत त्यांना समजावलंय आणि आता ते थोडे तयार झालेत, म्हणून आज खूप बरं वाटतंय."
उपजिल्हाधिकारी जोशी सांगत होते ती हीच मुलगी होती शीतल पवार... तिनं सासरच्यांना तिची ड्रायव्हिंगची नोकरी ही किती वेगळी आहे, हे काही प्रमाणात पटवून दिलं होतं. त्याचा तिच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.
रोज 70 किलोमीटरचा प्रवास करून ट्रेनिंगसाठी येणार्या पूजा खैतानची अडचण इतरांपेक्षा निराळी होती. पूजाने जाहिरात बघून नोकरीसाठी अर्ज केला, पण तिला नोकरीचा कॉल आला तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती. पूजासमोर मोठा प्रश्न उभा होता.
पण ट्रेनिंग सुरू व्हायला अजून वेळ होता. पूजाची डिलिव्हरी होऊन तीन महिने झाल्यानंतर प्रत्यक्ष ट्रेनिंग सुरू झालं. पूजा तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन यायची. बाळाला सोबत घेऊनचं तिनं क्लासरूम ट्रेनिंग पूर्ण केलं.
"तो काळ म्हणजे तारेवरची कसरत असेल ना..?" आमच्या या प्रश्नावर पूजा म्हणाली, "नाही, अजून नाही. तारेवरच्या कसरतीसाठी मी त्याला (बाळाला) तयार करतेय. जेव्हा प्रत्यक्षात एसटीच्या गाडीवर ड्युटी लागेल, तेव्हा खरी कसरत असेल. पण इथपर्यंत आले आहे तर तेही होईलच."
ज्योत्स्ना, शीतल, पूजा यांच्यासारखाच प्रचंड आत्मविश्वास सगळ्या जणींमध्ये जाणवत होता. या प्रकल्पाचं पुढे कसं होणार? या मुली इतक्या कठीण परिस्थितीत एसटी चालवतील का?
आम्हाला यवतमाळमध्ये पोहोचताना आणि विभाग नियंत्रक जोशींशी चर्चा करताना पडलेल्या प्रश्नांची हळूहळू उत्तरं मिळत होती. पाऊस थांबला होता. आम्ही एसटी ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी निघालो.
दोन्ही बाजूला स्टिअरिंग असणार्या एसटीत बसलो. ही अशी एसटी बघून थोडी गंमत वाटली. एका बाजूला ट्रेनर आणि दुसर्या बाजूला बस प्रत्यक्ष चालवणारी मुलगी. एसटीचं स्टिअरिंग फिरवण्यासाठी, ब्रेक आणि क्लच दाबण्यासाठी कार चालवण्याच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट ताकद लागत होती. गाडीचं 'जजमेंट' कठीण होतं.
पण या मुलींचे हात स्टिअरिंगवर हळूवारपणे फिरत होते. गाडी पुढे जात होती. एसटीतून आम्ही दारव्हा रस्त्यावर पोहोचलो.
31 वर्षांच्या अनुसूया मढवी गाडी चालवून झाल्यावर मागे येऊन बसल्या. "कठीण असतं ना ही गाडी चालवणं?" असं अनुसूया यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, "काहीच कठीण नसतं. माझ्या लग्नाला 12 वर्षं झाली. मला 10 वर्षांचा मुलगा आहे. इतकी वर्षं मी फक्त घरीच असायचे. घरचे मजुरी करतात.
"माझा मुलगा म्हणायचा, 'आई, आम्हाला शाळेत विचारतात तुम्ही मोठं होऊन कोण बनणारं? आई, तू कोण बनणार ते सांग ना?' तेव्हा माझ्याकडे सांगायला काहीच नसायचं.
"मी आमच्या गावातून यवतमाळ शहरात आले तरी कुणीतरी बरोबर असायचं. मला रस्ता पण 'क्रॉस' करता येत नव्हता. पण आता मी एसटी चालवते. इतका आत्मविश्वास आता माझ्यात आलाय," अनुसुया सांगत होत्या.
"मी सकाळी चार वाजता उठते. 7 पर्यंत सगळी घरची कामं करते आणि 8 ला घरातून निघते. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत ट्रेनिंग करते. घरी पोहोचायला रात्रीचे 8 वाजतात. मग पुन्हा घरची कामं, मुलाचा अभ्यास वगैरे... घरचे मजुरी करत असल्यामुळे माझ्यासाठी ही नोकरी आर्थिक हातभारासाठी गरजेची आहे. पण आता ही आवड निर्माण झालीये.
"या सहा महिन्यात माझा आत्मविश्वास खूप वाढलाय. एवढं करून मी एसटी चालवू शकते. उद्या कुठेही, कशीही ड्यूटी लागली तरी मी एसटी चालवेन आणि चालवणारच...!" अनुसयाच्या चेहर्यावर समाधानकारक हसू होतं.
एसटीच्या खिडकीतून बाहेर बघताना रस्ता वेगाने मागे जात होता. यात नवीन वाटावं असं काहीच नव्हतं. पण 'त्या' एसटीतला प्रवास मात्र नवीन होता... तो प्रवास त्या 21 मुलींच्या यशाचा प्रवास होता!
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)