विधानसभा निवडणूक 2019: भविष्यात भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता- महादेव जानकर #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया :

1. भविष्यात भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता: जानकर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढलीय. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी भाजपला टोला लगावला.

भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा असाच ओघ सुरू राहिला, तर भाजपचाही काँग्रेस होण्याची शक्यता आहे, असं महादेव जानकर म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सध्या राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही असे मत जानकर यांनी व्यक्त केलं. पण जर भाजपने विरोधी पक्षातल्या नेत्यांची आयात सुरूच ठेवली तर भविष्यात भाजपची स्थिती ही काँग्रेससारखी होऊ शकते असं त्यांनी म्हटलं.

नागपुरातील संताजी सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते.

2) कृत्रिम पावसासाठी अमेरिकन विमान भारतात दाखल

राज्यातील काही भागात पुरानं थैमान घातलं असलं, तरी बहुतांशी भागात दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेलं अमेरिकन विमान भारतात दाखल झालंय. एबीपी माझानं ही बातमी दिली.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोमवारपासून (19 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. या विमानाच्या तपासण्या होतील. त्यानंतर प्रयोगाला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

सरकारने 31 कोटी रुपयांची तरतूद करून राज्यातील अवर्षणग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतलाय.

3) कर्नाटकच्या मंत्रिमंडळ विस्ताराची अखेर तारीख ठरली

कर्नाटकमध्ये 22 दिवस एकट्याने सरकार चालवल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत 20 ऑगस्ट रोजी येडियुरप्पा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नवभारत टाईम्सनं ही बातमी दिली.

20 ऑगस्ट रोजी भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर दुपारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 13 मंत्री शपथग्रहण करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 34 पर्यंत ठेवण्यावर भाजपचा भर आहे.

कुणाला कुणाला मंत्रिपद द्यायचं, यावर शिक्कामोर्तब होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबत होता.

4) दूरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचं निधन

दूरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचं निधन झालं आहे. दूरदर्शनने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली. नीलम शर्मा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होत्या. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली.

नीलम शर्मा गेल्या 20 वर्षांपासून दूरदर्शनसोबत काम करत होत्या. दूरदर्शनच्या सुरूवातीच्या निवेदिकांमधील एक नीलम शर्मा होत्या.

तेजस्विनी, बडी चर्चा अशा कार्यक्रमांच्या सूत्रसंचलनामुळे नीलम शर्मा देशभर पोहोचल्या. चार महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यातच नीलम शर्मा यांना 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

5. आदित्य ठाकरेंनाही हवी आहे देशभरात प्लास्टिकबंदी

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका असं आवाहन देशवासियांना केलं आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात प्लास्टिकबंदी व्हावी अशी इच्छा जाहीर केली आहे. यासाठी कायदा तयार करण्यात यावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केल्याचं झी न्यूजनं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)