You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आण्विक शस्त्रांच्या वापराबाबत भारताचं धोरण बदलत आहे का?-दृष्टिकोन
भारत आण्विक शस्त्रांचा वापर प्रथम करणार नसल्याच्या धोरणाबाबत अजूनही कायम आहे. पण भविष्यात काय होईल त्यावर परिस्थिती अवलंबून आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी म्हणाले.
कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे.
अशात आण्विक शस्त्रांच्या वापराबाबत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
दोन आण्विक शस्त्रसंपन्न देश असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध आणि त्यांच्या धोरणांवर जगभरातील देश लक्ष ठेवून असतात.
जर भारताने एखादा धोरणात्मक निर्णय घेतला तर त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही प्रतिक्रिया येऊ शकतात.
असे निर्णय संपूर्ण विचाराअंती घेतले जातात कारण याचे दूरगामी परिणाम होतात, असं संरक्षण विषयक तज्ज्ञ राहुल बेदी सांगतात.
पर्रिकरही म्हणाले होते...
रालोआ सरकारमधल्या संरक्षण मंत्र्यांनी असं वक्तव्य पहिल्यांदाच केलं, अशातली बाब नाही.
याआधीही मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री असताना त्यांनी प्रथम वापर न करण्याबाबतच्या धोरणाशी सहमत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांना हे धोरण बदलायचं आहे, असंही ते म्हणाले होते.
अर्थात, त्यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
आता राजनाथ सिंह यांनीही 'प्रथम वापर न करण्याच्या धोरणाबद्दल वक्तव्य केलं. याबाबत बोलणारे ते भारताचे दुसरे संरक्षण मंत्री आहेत.
ही गोष्ट भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी बोलली आहे. याचा गंभीरपणे विचार केल्यास भाजप सरकारमध्ये याबाबत काहीतरी विचार चालला आहे, असं म्हणता येईल.
1998 ला भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. त्यावेळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना पत्र लिहिलं होतं. चीनविरोधातील धोरणांतर्गत असं केल्याचं वाजपेयींनी पत्रात म्हटलं.
हे पत्र लीक झालं होतं आणि न्यूयॉर्क टाईम्समध्ये ते प्रकाशित झालं. त्यानंतर मोठा गदारोळ माजला होता.
चीनची भूमिका काय असेल?
जर भारताने आपल्या भूमिकेत बदल केला आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया येऊ शकतात.
सगळ्यात आधी चीन आणि पाकिस्तान यावर प्रतिक्रिया देतील. कारण या क्षेत्रात तीन देशांच्या सीमा एकमेकांशी लागून आहेत. हे तिन्ही देश आण्विक शस्त्रसंपन्न आहेत.
भारताचे पाकिस्तानसोबत जमिनीचे वाद आहेत. त्याचप्रमाणे चीनसोबतही आहेत. त्यामुळे धोरण बदलण्याची स्थिती गंभीर बाब असेल.
अजूनही भारताचं प्रथम वापर न करण्याचं धोरण आहे. रिटेलिएटरी डॉक्ट्रीननुसार, भारतावर आण्विक हल्ला करण्यात आला तरच भारत आण्विक शस्त्राचा वापर करू शकतो.
आण्विक शस्त्राच्या वापराबाबतच्या गंभीर मुद्द्यावर खूप विचार केल्यानंतरच निर्णय घेण्यात येतात. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देताना भावनिक होऊन हे वक्तव्य केलं की काय, असंही असू शकतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)